क्रिकेटचा Forrest Gump

Courtesy - www.sportskeeda.com
१९९६ चा वर्ल्डकप. मोहाली मध्ये चाललेला ऑस्ट्रेलिया वेस्ट इंडीज उपांत्य सामना. पहिली बॅटिंग करताना ऑस्ट्रेलियाची परिस्थिती ४ बाद १५ झालेली. मार्क वॉ, मार्क टेलर, रिकी पाँटिंग आणि स्टीव्ह वॉ पहिल्या १० ओव्हर्सच्या आत बाद झालेले. वर्ल्डकपचा उपांत्य सामना. समोर अॅम्ब्रोस, वॉल्श आणि बिशप! म्हणजे गब्बरसिंग, मोगॅम्बो आणि शाकाल एकत्र! आणि ऑस्ट्रेलियाकडून क्रीजवर स्ट्युअर्ट लॉ आणि मायकल बेव्हन! म्हणजे तीन मातब्बर व्हिलन्ससमोर जुना सैफ अली खान आणि मोहनीश बहल उभे केल्यासारखे होते. अरे कच्चे खातील रे ते तीन दैत्य तुम्हा jiला असं म्हणत असतानाच हा सहा नंबरवर खेळायला आलेला इसम रंग दाखवायला लागला.
बघता बघता बेव्हननी स्ट्युअर्ट लॉ बरोबर १३८ रन्सची पार्टनरशिप केली आणि ऑस्ट्रेलियाला २०७ पर्यंत पोहोचवला. मग पुढे ज्याला "सारा शहर लॉयन के नाम से जानता था" अश्या शेन वॉर्नने विंडीजचा गेम केला. पण तेव्हापासून डोक्यात बसला (डोक्यात गेला हे सत्याच्या जास्त जवळ जातं) तो मायकल बेव्हन.
ह्याच्या फलंदाजीत आकर्षक काहीच नव्हतं. खरंतर डावखुरे फलंदाज म्हणजे नैसर्गिक नजाकत असणारे. पण ह्याच्या फलंदाजीत नजाकत शोधणं म्हणजे कतरिना कैफमध्ये अभिनय शोधण्यासारखं होतं. पण ती फलंदाजी विलक्षण प्रभावी होती. चेहर्यावर कुठल्याही भावाचा अभाव. राग, लोभ, प्रेम, द्वेष, मत्सर, ममता वगैरे भानगडी ह्याला माहिती असतील की नाही अशी शंका यावी. पुन्हा फिटनेस असा की हा माणूस आहे की duracell लावलेला बाहुला असा प्रश्न पडावा. टेन्शन, प्रेशर वगैरे प्रकारच नाही. समोर विकेट गेलेल्या असूदेत, Asking rate वाढत असूदे, बोलर आग ओकत असूदे. ह्याला काही फरकच पडायचा नाही. कुठलीही अति रिस्क न घेता गणिती डोक्यानी मायकेल बेव्हनने ऑस्ट्रेलियासाठी कितीतरी सामने खालच्या फलंदाजांना साथीला घेत समोरच्या टीमच्या घशातून काढल्या आहेत.
बेव्हननी निव्वळ कष्टांनी खेळाडू आपल्या संघाला कसा अॅसेट ठरू शकतो ह्यांचं मूर्तिमंत उदाहरण ठेवलं. थंड डोक्यानी लक्ष्य गाठणारा वनडे क्रिकेटमधला पहिला स्पेशालिस्ट finisher निर्विवादपणे बेव्हन होता. तो कसोटी क्रिकेटमध्ये चालला नाही हीच गोष्ट त्याच्या कष्टांचं महत्व अधोरेखित करते. अश्या क्रिकेटच्या Forrest Gump ला त्याच्या ५० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने ५३.५८ च्या अॅव्हरेजने आणि ७४.१६ च्या स्ट्राइक रेटने शुभेच्छा!

2 टिप्पण्या:
Wah Toshya! Bevan was the real (painful) finiaher...
U bet. One of the most effective that the game has ever seen
टिप्पणी पोस्ट करा
याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]
<< मुख्यपृष्ठ