खासियत खेळियाची १ - फ्लिकचा सम्राट
मला ना... १९८९-९० सालापासून एक विचित्र रोग जडलाय. चांगला २३-२४ वर्षं टिकला. २०१३ मध्ये एक लस टोचली आणि वाटलं की आता कमी होईल दुखणं. पण मुळापासून गेलेलं नाही हो. दरवर्षी १९ - २० एप्रिल तारीख आली की मला अजूनही ताप येतो! ४-५ दिवस तर टिकतोच टिकतो. आयच्यान! सचिनज्वर किंवा तेंडुलकरोना म्हणतात त्याला! मग काय... तो आठवडा जुन्या मॅचेस, काही खास इनिंग्सचा डोस घेतो दिवसातून दोन-तीन वेळा. एकदा तो कोर्स पूर्ण झाला की मग ऑलमोस्ट वर्ष निघतं.
एक तर आपली केस जरा वाया गेलेलीच आहे... एखाद्या क्लासिकल वाल्याला "तीव्र मध्यम", "कोमल गंधार", "तिश्र जातीतला कायदा","पुरिया धनश्री" वगैरे शब्द ऐकल्यावर जे "कुछ कुछ होता है" फीलिंग येतं ना... तसंच आपल्याला "हुक", "स्मॅश", "सिंगल हॅन्डेड बॅकहँड क्रॉसकोर्ट", "स्लॅमडंक" वगैरे ऐकून येतं! त्यातून बोरिस बेकरपासून ते विराट कोहलीपर्यंत इतक्या लोकांनी इतक्या वर्षांत आपल्याला इतका बिघडवलाय की ज्याचं नाव ते! आणि हे तर आपलं खूप खूप जुनं दुखणं - सचिन रमेश तेंडुलकर! २४ एप्रिलला त्याचा वाढदिवस!
तेंडल्याचे काही फटके तर अजूनही लख्ख आठवतात. अब्दुल कादिरला लाँगऑन वरून भिरकावून देणारा... शोएबला थर्डमॅनपलिकडे पोचवणारा... कास्प्रोविक्झला साईटस्क्रीनवर "डिपॉझिट" करणारा... साक्षात शेन वॉर्नला dancing down the wicket येत लेगस्टंपच्या बाहेरून मिडविकेटवरून फेकून देणारा... किती किती फटके आणाल डोळ्यांसमोर? स्ट्रेटड्राईव्ह म्हणजे तर ''उपमा कालिदासस्य'' सारखं "स्ट्रेटड्राईव्ह तेंडुलकरस्य" म्हणावा इतका तेंडल्याचा हक्काचा शॉट.
पण अजून एक शॉट असा आहे की ज्याचे सगळे कॉपीराइट्स साहेबांकडे आहेत. आणि नसते तरी काही फरक पडला नसता कारण पृथ्वीतलावर असा शॉट दुसरा कोणी मारू शकतच नाही. तो म्हणजे right hand over left फ्लिक! एकच चीज वेगवेगळे गायक आपल्या रंगात आणि ढंगात गातात तसा एकच फ्लिक - पण प्रत्येक बॅट्समनचा वेगळा... लक्ष्मण फ्लिक करणार म्हणजे overpitched बॉलला हलक्या हाताने थोपटणारा... मार्क वॉचा फ्लिक म्हणजे एखाद्या कसलेल्या violinist नी नजाकतीने बो फिरवावा तसा... लाराचा म्हणजे कलिप्सो डान्सरसारखं फूटवर्क करून मनगट वापरून चौकार मारणारा. पण आमच्या साहेबांच्या फ्लिकची बातच न्यारी.
बॉल मिडल-लेगवर किंचित overpitched पडायचा अवकाश.... फ्रंटफूट - बॅकफुट वगैरे भेदभाव न मानता तेंडल्या मिडविकेट - स्क्वेअरलेगला बॉल पाठवून द्यायचा. नातवाच्या केसांतून हात फिरवत आजोबांनी हलकेच टप्पल मारावी तसा तेंडल्या बॅटीने तो चेंडू कुरवाळायचा. बॅट - बॉलची भेट होताना त्या अर्ध्या क्षणात उजवा "bottom hand" डाव्याच्या वर यायचा. पुन्हा ह्या फ्लिकची रेंज वाईड लॉंगऑन ते डीप फाईनलेग अशी जवळपास ११०-१२० डिग्रीची असायची आणि टायमिंग तर केवळ लाजवाब. कित्येक वेळा टप्पा तितका जवळ नसेल तर हा माणूस बॉल अगदी पोटाजवळ आल्यावर असा फ्लिक मारायचा. ताशी १४०-१५० किमी वेगाने बोलिंग करणार्या बोलरला असं बॅट गोल फिरवून फ्लिक वगैरे मारणं म्हणजे मूर्तिमंत माज होता. पण तो माज म्हणजे एखाद्या सणकी तलवारबाजाची आक्रमकता नव्हती तर एका कसलेल्या योद्ध्याचा आत्मविश्वास होता. हा फ्लिक प्रचंड कंट्रोलमध्ये मारला जायचा. ह्यावर कधी सिक्सर मारली गेली नाही. ह्या फ्लिकने कधी बोलरचा तेजोभंग केला नाही पण दर वेळी बोलरच्या आत्मविश्वासाला खिंडार नक्कीच पाडलं.
सचिन तेंडुलकरची महानता वगैरे विषय बाजूला ठेवू. निव्वळ फिजिक्सचे सिद्धांत लावले तरी हा माणूस करामती जादूगार होता. दीड किलोची जड बॅट जादूच्या कांडीसारखी वापरून त्यानी ज्या कलाकृती निर्माण केल्या त्यांना तोड नाही. लताबाईंचं "अल्ला तेरो नाम" ऐकताना आणि सचिनचा फ्लिक बघताना पडणारा प्रश्न सारखाच ---- नास्तिकांना देवाच्या अस्तित्वाचा अजून काय पुरावा हवाय?
त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने काही आठवणींना उजाळा मिळाला... और क्या चाहिये?
© - आशुतोष थत्ते
(छायाचित्रे espncricinfo.com वरून साभार)



0 टिप्पण्या:
टिप्पणी पोस्ट करा
याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]
<< मुख्यपृष्ठ