गुरुवार, १८ जून, २०२०

एका खेळीयाने नादिया - Perfect Ten कोमानेच

एक गोष्ट


लहान वयात दैदिप्यमान यश

प्रचंड प्रसिद्धी

रसिकांचं अलोट प्रेम - लोकप्रियता

पैसा आणि प्रतिष्ठा.


आणि मग 

दुर्दैवाचे फेरे 

होत्याचं नव्हतं होणं

असह्य घुसमट, एकाकीपणा

अतीव नैराश्य - असहायता


त्यानंतर...........


... नाही ही गोष्ट तुम्हाला वाटतंय तशी संपत नाही. ती व्यक्ती त्या परिस्थितीच्या वणव्यातून झळाळी प्राप्त झालेल्या सोन्यासारखी बाहेर येते. तेजानी तळपणारं अस्सल बावनकशी सोनं! आणि काळाच्या दगडावर आपलं नाव कायमचं कोरून जाते - नादिया कोमानेच!

१९७६ च्या माँट्रियाल ऑलिम्पिक्स मध्ये जेव्हा "अनईव्हन बार्स" ह्या कम्पल्सरी प्रकारासाठी "नादिया कोमानेच" हे नाव जेव्हा पुकारण्यात आलं तेव्हा त्या १४ वर्षांच्या, जेमतेम ५ फूट उंचीच्या चिमुरडीला कल्पनादेखील नव्हती की आपण पृथ्वीतलावरच्या सर्वांत मोठ्या क्रीडा-मंचावर परफॉर्म करत आहोत. तिच्याच शब्दांत सांगायचं तर "I didn’t care about pressure and I didn’t comprehend the consequences". आपल्या प्रशिक्षकांनी सांगितलेलं "रूटीन" कुठेही न चुकता पूर्ण करायचं इतकी सहज - सोपी इच्छा घेऊन नादियानी त्या अनईव्हन बार्स वर झेप घेतली.

लोअर बार ला हलका स्पर्श करून तिने वरच्या बारवर झेप घेतली आणि पुढचे काही क्षण आलम दुनिया आपले श्वास रोखून जिमनॅस्टिक्सच्या एका नव्या तारकेचा उदय राहिली. एका अप्रतीम "हॅंडस्टॅन्ड" नंतर खालच्या बारला एका थरारक "स्पिन" घेऊन नादिया दोन्ही पाय घट्ट रोवून जमिनीवर आली आणि प्रेक्षकांच्या कौतुकाचा बांध टाळ्यांचा कडकडाट करत फुटला. तेव्हाचे "लाँजाईन्स" कंपनीने बनवलेले स्कोरबोर्ड्स जास्तीत जास्त ९.९५ चा स्कोर दाखवणारे होते. आणि नादियाच्या ह्या अचाट कामगिरीनंतर गुणफलकावर आकडा झळकला "1.00"! 


Nadia Comaneci

Courtesy: https://www.theguardian.com/

इकडे नादिया "लोकं खूप टाळ्या वाजवतायत" म्हणून खुष होती. दूरचित्रवाणीवरची निवेदिका म्हणाली "she was swimming in an ocean of air". संघातल्या एका मुलीने "तिकडे बघ" अशी खूण केल्यावर तिचं लक्ष गुणफलकाकडे गेलं!!! मानवीच नव्हे तर यांत्रिक देखील सीमा ओलांडून रोमानियाची नादिया कोमानेसी जिमनॅस्टिक्सच्या कुठल्याही प्रकारात "परफेक्ट टेन" मिळवणारी पहिली खेळाडू ठरली होती. कोणालाच वाटलं नव्हतं की रोमानियाची एक १४ वर्षीय चिमुरडी साक्षात ऑलिम्पिक्सला "अजून एक स्पर्धा" मानत अभूतपूर्व अशी कामगिरी करेल!! नादिया म्हणते "I never thought about making history. I was too busy putting my attention into making it".


आणि जणू काही ही कामगिरी पुरेशी "ऐतिहासिक" नव्हती म्हणून त्याच स्पर्धेत तिने अजून एकदा नाही दोनदा नाही तब्बल सहा वेळा म्हणजे एकूण सात वेळा "परफेक्ट टेन" गुणांची रास ओतली. आतापर्यंत बाहुल्या जमवणार्‍या पोरीला जणू आता ऑलिम्पिक पदकं जमवण्याचा छंद लागला होता. सर्वसाधारण, बीम आणि अनईव्हन बार्स अशी ३ सुवर्ण १ संघिक रौप्य आणि फ्लोर रूटीन मध्ये १ कांस्य अशी पाच पदकं मिळवून नादिया परत घरी आली ती जिमनॅस्टिक्सची राणी बनूनच !

१२ नोव्हेंबर १९६१ रोजी रोमानियातल्या ऑनेस्टी शहरात जॉर्ज आणि स्टेफानियाला एक गोंडस मुलगी झाली. स्टेफानियानी तेव्हा बघितलेल्या एका रशियन चित्रपटातल्या नायिकेच्या नावावरून तिचं नाव ठेवण्यात आलं नादिया  (म्हणजे आशा - hope). लहानपणापसूनच पोरीत कमालीची "एनर्जी" होती. धाकला भाऊ एड्रियन आणि ती प्रचंड दंगा करायचे. उड्या मारून मारून घरातल्या कोचाच्या स्प्रिंगा बाहेर आल्या तेव्हा आई बापानी हिची "जिरवायला" नादियाला जवळच्याच एका जिमनॅस्टिक्सच्या वर्गात घातलं आणि वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी नादियानी आपली पहिली "कार्टव्हील" केली. लवकरच बेला कारोलीसारख्या निष्णात प्रशिक्षकाच्या हातात हा हिरा गवसला आणि बेला आणि त्याची बायको मार्ता ह्यांनी नादियाच्या कौशल्याला पैलू पाडायला सुरुवात केली. त्या वयात नादिया आठवड्यातले सहा दिवस रोज चार तास सराव करायची. पोरीला कशाचीच भीती म्हणून नव्हती. तिचा "बॅलन्स" अचाट होता. ४ फूट उंच आणि अवघ्या ४ इंच रुंदीच्या बीम वरून नादिया फेरफटका मारल्यागत चालायची. वयाच्या सातव्या वर्षी बेलानं तिला राष्ट्रीय ज्युनियर जिमनॅस्टिक्स स्पर्धेत उतरवलं. स्पर्धेतली सर्वांत छोटी स्पर्धक नादिया १३ वी आली. स्पर्धेनंतर बेलानं आपल्या चिमुकल्या शिष्येला एक छानशी बाहुली दिली आणि सांगितलं "ह्यापुढे कधीच १३ वं यायचं नाही हा बेटा". आणि पुढच्याच वर्षी बेला कारोलीच्या ह्या ८ वर्षांच्या बाहुलीनं रोमानियन राष्ट्रीय ज्युनियर जिमनॅस्टिक्स स्पर्धा जिंकली !! अर्थातच हा पराक्रम करणारी नादिया सर्वांत लहान खेळाडू होती. दोनच वर्षांत ती रोमानियाच्या राष्ट्रीय संघात निवडली गेली. दहाव्या वर्षी नादिया युगोस्लावियामध्ये Friendship Cup Meet ही आपली पहिली आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळली. बल्गेरिया होऊन ती परत आली ती दोन सुवर्णपदकं आणि खूप सार्‍या बल्गेरियन बाहुल्या घेऊनच. 


युरोपियन स्पर्धेचं खुल्या गटाचं सर्वसाधारण विजेतेपद मिळवणारी नादिया सर्वांत छोटी खेळाडू होती. आणि मग माँट्रियाल ऑलिम्पिक्समध्ये तिनी जो इतिहास घडवला तो आपण पाहिलाच! साहजिकच ह्या कामगिरीनंतर नादियावर प्रसिद्धीचा आणि कौतुकाचा वर्षाव झाला. बीबीसी, असोशिएटेड प्रेस, UPI - सगळ्यांनीच तिचा यथोचित गौरव केला. रोमेनियन सरकारनी तर त्या १४ वर्षांच्या चिमुरडीला "Hero of Socialist Labor" हा आपला सर्वोच्च नागरी सन्मान दिला !! आणि हो - तोपर्यंत तिच्याकडे २०० पेक्षा जास्त बाहुल्या जमा झाल्या होत्या.

                                                      50 stunning Olympic moments: Nadia Comaneci's perfect 10s – in ...

पण ह्या कौतुकाच्या वर्षावात न्हाऊन निघतानाच तिच्या वैयक्तिक आयुष्यात मात्र काही वाईट गोष्टी घडल्या. ऑलिम्पिक्सनंतर थोड्याच दिवसांत तिच्या आई - वडिलांचा घटस्फोट झाला. हुकुमशाही राजवटीतल्या रोमेनियन जिमनॅस्टिक्स असोसिएशननं तिला बेला कारोलीकडे शिकायला मनाई केली आणि दुसर्‍या प्रशिक्षकाकडे सराव करायला सांगितलं. आई - वडील विभक्त झालेले आणि बापासारखी माया करणारा प्रशिक्षकही दुरावलेला. "ऑलिम्पिक चॅम्पियन" असली तरी १४ वर्षांची छोटी पोर होती हो ती! घडल्या घटनांनी पोरगी पार खचून गेली. आणि तिनी नैराश्याच्या भरात ब्लीच खाल्लं !! 

तेव्हा नादिया रोमेनियाच्या गळ्यातली ताईत होती. रोमेनियन जनतेच्या खचलेल्या, पीडित चेहर्‍यांवरची स्मिताची रेषा होती. रोमेनियातल्या हुकुमशाही सरकारनं तिला पुन्हा कारोलीकडे प्रशिक्षण घ्यायची परवानगी दिली. पण ७८ च्या जागतिक स्पर्धेत प्रेक्षकांना दिसली ती एक बेढब, फुगलेली, सुटलेली नादिया! आपल्या हातखंडा "अनईव्हन बार्स" वरून ती पडली. पण त्यातही बीम मध्ये तिनी सुवर्णपदक मिळवलंच. ७९ साली तिचं नाव हुकुमशहा निकोल सोसेस्कूच्या मुलाशी जोडलं गेलं. ती प्रसिद्धी, ती लोकप्रियता एक कोवळं आयुष्य खुडत होती. समजायला लागल्यापासून जिमनॅस्टिक्स आणि फक्त जिमनॅस्टिक्सवर प्रेम केलेल्या एका कोवळ्या आयुष्याची वाताहत होत होती. 

पण अश्या परिस्थितीतही नादियाची मेहनत, सराव आणि प्रशिक्षण चालूच होतं. सगळी दु:ख, सगळ्या वेदना बाजूला ठेऊन एका सच्च्या खेळियाप्रमाणे नादिया पुन्हा जिद्दीने सरावाला लागली. ७९ च्या युरोपिय चॅम्पियनशिप्समध्ये पूर्णपणे फिट, जिगरबाज आणि यशासाठी भुकेल्या नादियानी सलग तिसर्‍यांदा सर्वसाधारण विजेतेपद मिळवून न भूतो न भविष्यति अशी कामगिरी केली. त्याच डिसेंबरच्या जागतिक स्पर्धेत मनगटाला झालेल्या जखमेची पर्वा न करता, डॉक्टरांचे आदेश धुडकावून, हॉस्पिटलमधून पळून जाऊन नादियाने सांघिक प्रकारात बीम वर ९.९५ ची कामगिरी करून रोमानियाला आपलं पहिलं सांघिक सुवर्णपदक मिळवून दिलं. १९८० च्या मॉस्को ऑलिम्पिक्समध्ये तिनी २ सुवर्ण आणि २ रौप्य पदकं मिळवली.  बुखारेस्टच्या स्पर्धेत पाच सुवर्णपदकं कमावून तिनी वयाच्या विसाव्या वर्षी जिमनॅस्टिक्सला थाटातच रामराम ठोकला. 

My sister was named after her ..1980 Photo - Nadia Elena Comăneci ...Nadia Comaneci 1980 Moscow Olympics | Nadia comaneci perfect 10 ...Nadia Comaneci 1980 – www.cardsoflegends.com

दुर्दैवानी तिच्या कारकीर्दीत रोमानियात हुकुमशाही राजवट आणि अराजक होतं. ज्याला संधी मिळेल तो देश सोडून पळून जायचा प्रयत्न करत होता. बेला कारोली आणि मार्थानंदेखील देश सोडला आणि ते अमेरिकेला पळून गेले. पण नादिया त्यांच्याइतकी नशीबवान नव्हती. ती नुसती प्रसिद्धच नव्हे तर नॅशनल आयकॉन होती. तिच्यावर सरकारची करडी नजर होती आणि तिचा प्रत्येक फोन कॉल टॅप केला जात होता. आपल्याच देशात ती बंदिवानाचं आयुष्य जगत होती. तिला कुठल्याही पाश्चिमात्य देशांत जायला बंदी घालण्यात आली. तिला ८४ च्या लॉस एंजलिस ऑलिम्पिक्सला जायची परवानगी देण्यात आली पण तिथेही सरकारची तिच्यावर सतत पाळत होती. मॉस्को आणि क्यूबा सोडून ती कुठेही जाऊ शकत नव्हती. १९८४ ते १९८९ तिनी रोमेनियन जिमनॅस्टिक्स संघाची प्रशिक्षक म्हणून काम केलं. आणि ८९ मध्ये तिला एक संधी मिळाली. कॉन्स्टन्टाइन पानाइत नावाच्या एका इसमाच्या मदतीने, फक्त आपल्या धाकट्या भावाला कल्पना देऊन, आपली सगळी दौलत - आपली पदकं मागे ठेऊन नादिया - जिमनॅस्टिक्सची सुवर्णकन्या - एका सामान्य निर्वासितासारखी ऐन मध्यरात्री कडाक्याच्या थंडीत ६ तास चालत हंगेरीच्या सीमेपर्यंत पोचली. तिथल्या अधिकार्‍यानी तिला ताबडतोब ओळखलं आणि तिला ऑस्ट्रियाच्या सीमेपर्यंत जाण्याची परवानगी दिली. ऑस्ट्रियातल्या अमेरिकन दूतावासातून परवानगी मिळवून ती अमेरिकेत मोकळा श्वास घ्यायला दाखल झाली! न्यूयॉर्कहून ती आली ती आपली कर्मभूमी माँट्रियालला. नशीबानी जागतिक जिमनॅस्टिक्समध्ये नादियाचे काही चांगले मित्र होते. बार्ट कॉनर आणि अ‍ॅलेक्झँडर स्टेफूनी तिला खूप मदत केली. तिला अमेरिकेत आणणारा पानाइत मात्र तिचे पैसे घेऊन पळून गेला.

नंतर नादिया माँट्रियालमध्येच कॉनर आणि त्याच्या परिवारासोबत राहिली. पुन्हा जिमनॅस्टिक्सच्या सरावाला सुरुवात केली. बार्ट कॉनर अ‍ॅकॅडमीमध्ये ती मुलांना जिमनॅस्टिक्स शिकवू लागली. तिनी मॉडेलिंगही केलं. पुढे तिने बार्ट कॉनरशी रोमेनियातच लग्न केलं. बुखारेस्टमधला हा लग्न सोहळा राजेशाही थाटात पार पडला. अरे हो... एक किस्सा सांगायचाच राहिला ! मॉन्ट्रियाल ऑलिम्पिक्स आधीच्या एका सराव स्पर्धेत नादियानं मुलींचं विजेतेपद मिळवलं. बक्षीस समारंभाच्यावेळी तिथल्या फोटोग्राफरला काय हुक्की आली... त्यानी "जोडा कसा छान दिसेल" म्हणून मुलांच्या विजेत्याला तिच्या गालाचं चुंबन घ्यायला सांगितलं आणि त्यांचा फोटो काढला. त्याला तरी काय कल्पना की पुढे काही वर्षांनी हे दोघं चर्चमध्ये पाद्र्यासमोर मध्ये एकमेकांचं चुंबन घेतील? कारण तो मुलांचा विजेता होता बार्ट कॉनर !!!


नादियाचं "letters to a young gymnast" हे आत्मचरित्र खूप गाजलं. नादिया सध्या अमेरिकेची नागरिक आहे आणि नॉर्मनमध्ये बार्ट कॉनर अ‍ॅकॅडमी चालवते, समुपदेशक आणि जिमनॅस्टिक्स स्पर्धांची म्हणून काम करते. बर्‍याच सेवाभावी संस्थांशी ती निगडीत आहे. आंतरराष्ट्रीय "स्पेशल ऑलिंपिक्स फेडरेशन" ची ती उपाध्यक्ष आहे. जन्मभूमी रोमेनियात तिचं खूप चांगलं काम आहे. "ऑलिम्पिक ऑर्डर" हा आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक कमिटीचा सर्वोच्च सन्मान १९८४ आणि २००४ असा दोन वेळा मिळवणारी ती एकमेव खेळाडू आहे.

आपण नेहेमीच सेलेब्रिटीजच्या वैयक्तिक आयुष्याच्या आपल्या अज्ञात अश्या वाईट बाजूबद्दल बोलतो. पण सेलेब्रिटीजदेखील शेवटी माणसंच असतात. काही माणसं परिस्थितीच्या वादळात पणतीसारखी विझून जातात, काही मशालीसारखी तळपतात तर काही मात्र दीपस्तंभासारखे सगळे वादळ- वारे झेलून, सगळ्या संकटांना तोंड देऊन दहा अंगुळे वर उरतात. 

नादिया एका दीपस्तंभासारखी सगळ्या संकटांना पुरून उरली. फीनिक्स सारखी राखेतून भरारी घेत पुन्हा तिनं जग जिंकलं. जिमनॅस्टिक्स सारख्या खूप छोटी "शोकेस लाइफ" असणार्‍या खेळात तिनी असा ठसा उमटवला आणि असा विक्रम नोंदवला जो कधीच कोणालाच पुसता येणार नाही. कारण जगातली "पहिली परफेक्ट टेन गर्ल" एकच होती, एकच आहे आणि कालांतापर्यंत एकच असेल शब्दशः Living Legend असलेली "नादिया कोमानेच"!

Nadia Comaneci Style, Clothes, Outfits and Fashion • CelebMafia

© - आशुतोष थत्ते