संपलेला शिमगा.... उरणारं कवित्व
संपला एकदाचा... क्रिकेटच्या नावाखाली गेले तीन महिने चालू असलेला शिमगा संपला.... नाही नाही... टी-२० किंवा वनडे क्रिकेट वाईट अजिबात नाही. खरंतर आयपीएल अपेक्षेपेक्षा खूपच रंगतदार झाली. रंगतदार आणि दर्जेदार देखील. पण आता बॅट्समनची वाढत चाललेली दादागिरी अगदी बघवत नाही. हातातल्या २-२ किलोच्या सोट्यांच्या जोरावर मिस हिट सुद्धा प्रेक्षकांच्यात जाते म्हणल्यावर बॅट्समनचा कॉन्फिडन्स काहीच्या काहीच वाढलाय. स्विच हिट, ऑफ किंवा लेग स्टंपच्या मैलभर बाहेर जाऊन खेळणे, रिव्हर्स हिट, स्कूप.... निरनिराळी अस्त्रं फलंदाजांच्या भात्यात जमा होत आहेत. फील्डिंग रिस्ट्रिक्शनस, फ्री हिट, वाईड चेंडूचे नियम, ठणठणीत पिचेस, बाऊन्सरवरचे निर्बंध - केवळ प्रेक्षकांना भरपूर रन्स काढलेल्या बघायला आवडतात म्हणून फलंदाजांना अजून अनुकूल परिस्थिती निर्माण केली जात आहे.
पण हे खरं क्रिकेट नाही. आता काही लोकं म्हणतील की असे शॉट मारणं हे बॅट्समनच्या सुधारलेल्या स्किल्सचं द्योतक आहे. पण मग हेच धुरंधर बॅट्समन विकेटवर थोडं गवत असलं किंवा बोलरला थोडा जास्त टर्न वा बाऊन्स मिळाला की उघडे का पडतात?
फास्ट फूड हे तुमचं पोषक जेवण होऊ शकत नाही. आणि काही दिवस झालं तरी त्याचे दुष्परिणाम दिसतातच. अस्सल क्रिकेट हे आंब्याचं लोणचं, वाईन, किंवा रागदारीसारखं मुरल्यावरच चांगलं लागतं.
आज जमवलेलं लोणचं पुढच्या सीझनला खावं म्हणतात. चांगली २०-२२ वर्षं आपलं यौवन जपलेली वारुणी जेव्हा काही क्षण आपल्या जिभेवर रेंगाळून गळ्यातून जाते तेव्हाची तृप्ती काही औरच. एखादा कसलेला गवई जेव्हा मारव्याच्या सुरांनी आपल्या काळजाला हात घालतो तेव्हा त्याचे सूर त्यानी अनुभवलेल्या प्रेमात आणि प्रेमभंगात, मिलनात आणि वियोगात, उन्मादात आणि अगतिकतेत भिजून आपल्याला भिडत असतात.
कसोटी क्रिकेट म्हणजे तरी वेगळं काय आहे हो? खुद्ध डॉन ब्रॅडमन म्हणाला होता "Reading poetry and watching cricket were the sum of my world, and the two are not so far apart as many aesthetes might believe." सौ टके की बात! काव्यात आणि कसोटी क्रिकेटमध्ये फरक असा नाहीच. कसोटी खेळणारा आणि गाजवणारा क्रिकेटर हा ताकदीचा मारवा पेश करणार्या गायक / वादकाइतकाच कसलेला खेळाडू नाही तर कलाकार असतो. पाच दिवस चालणारा हा जगातला एकमेव खेळ! शारीरिक तंदुरुस्ती आणि खेळातल्या कौशल्याच्या कितीतरी पलिकडे जाऊन खेळाडू कडून संयम, चिकाटी, एकाग्रता आणि मानसिक कणखरपणा ह्यांची पराकाष्ठा मागणारा खेळांपलिकडला खेळ.
कल्पना करा - १८व्या शतकात ज्या कुणा महाभागाच्या सुपीक डोक्यातून ह्या खेळाची कल्पना निघाली असेल त्यानी ती आपल्या मित्रांना कशी सांगितली असेल?
महाभागः हे बघा... आधी एक टीम बोलिंग करेल. त्यांनी १० विकेट्स घेतल्या की दुसरी टीम बोलिंग करेल. असं दोन वेळा करायचं. त्यात जी टीम जास्त रन्स करेल ती जिंकेल.
मित्रः दोन वेळा? अरे ४० विकेट्स पडायला कितीतरी वेळ लागेल.
महाभागः तुला कुठे ७:४१ ची चर्चगेट फास्ट पकडायची आहे? लागूदे की वेळ. पाच दिवस पुरेसे होतील?
मित्रः पाच दिवस? आणि इतकं करून पाच दिवसात ४० विकेट्स नाही पडल्या तर? कोण जिंकलं कोण हरलं ते कसं ठरवणार?
महाभागः अरे भावा.... पाच दिवस जिवाचं रान करून खेळल्यावर हार-जीत मॅटर करेल असं वाटतं तुला?
मित्रः म्हणजे???
महाभागः म्हणजे मित्रा, पहिल्या दिवशी ताज्या पिचवर फास्ट बोलर्स चेंडू स्विंग करतील... बॉल जुना झाला की बोलरचे वार झेलून तावून सुलाखून निघालेला बॅट्समन डिवचलेल्या नागासारखा फणा काढेल. मग दुसरा दिवस बेट्समनचा. तिसर्या दिवसानंतर पिच खराब होत जाईल. बॅट्समनला रन्स करणं मुश्किल होईल. आणि तेव्हाच दोन्ही संघांवर दुसर्या इनिंग्जचं प्रेशर असेल. पिच बदलेल.. कदाचित हवामान बदलेल.. परिस्थिती बदलेल. बोलर आणि बॅट्समनचे सवाल-जवाब पुन्हा सुरू होतील. स्पिनर्सनी विणलेल्या जाळ्याचा गुंता क्लोझ-इन फील्डर्सच्या गराड्यात राहून सोडवताना बॅट्समनला घाम फुटेल. डावपेच बदलतील. हल्ले - प्रतिहल्ले, डाव - प्रतिडाव, शह - काटशह. मित्रा हा खेळ फक्त मैदानात नाही तर खेळाडूंच्या डोक्यात आणि हृदयात खेळला आणि लढला जाईल. अरे पाच दिवसांच्या अश्या द्वंद्वानंतर कोण जिंकलं कोण हरलं हा प्रश्न महत्त्वाचा असेल असं वाटतं तुला?
सोट्यासारखी बॅट हातात घेऊन चौकार षटकारांची आतषबाजी करणं एकवेळ सोपं पण बोलर्सची रग जिरवून पिचवर ठाण मांडून दिवसाच्या शेवटी शतक कमावणं महाकठीण. बॅट्स्मनला बाद करण्यात कितीही अपयश आलं तरी त्याच उमेदीनी त्याच त्वेषानी आणि त्याच जोशानी "षटकानुषटकं" टिच्चून गोलंदाजी करणं हे सोपं काम नाही.
कसोटी क्रिकेट हा खर्या अर्थानी प्रतिभावंतांचा प्रांत "Dominion of the Virtuous."
आत्ता ऑस्ट्रेलियात जे चालू होतं ती स्टार्टर्स होती.... सूप - सलाड! खरी गंमत आहे १७ डिसेंबरला. ५ कोर्स ५ दिवसीय सामन्यांची मील! अॅडलेड, मेलबर्न, सिडनी आणि ब्रिस्बेन अश्या चार पंगती. मेन्यू पण भन्नाट आहे. कोहली, मयंक अगरवाल आणि वॉर्नरचा मसालेदार रस्सा आहे आणि पुजारा, पृथ्वी शॉ, लाबुशेन आणि स्मिथचा शांत करणारा दहीभात. कुलदीप, अश्विन आणि नेथन लायनची स्पॅघेटी मॅकरोनी. नशिबात असेल तर रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणेचे डेझर्ट्सपण मिळतील. पण ह्या सगळ्यांत तोंडाला पाणी सुटणारा मेन्यू आहे तो फास्ट बोलर्सचा. बुमराह, शमी, उमेश यादव / इशांत शर्मा विरुद्ध स्टार्क, कमिन्स, हेझलवुड / पॅटिसन. सीरीजचं भवितव्य ठरवणार ती ही सहा-आठ लोकं.
पण पहिल्या कसोटीनंतर कोहली नसताना भारताला आपला खेळ खूप उंचवावा लागेल. त्याच्यासारखा बॅट्समन एकवेळ मिळेल... पण त्याच्यासारखा "अॅटिट्यूड"??? आणि ऑस्ट्रेलियात तुमचा अॅटिट्यूड तुमच्या क्रिकेट कौशल्यापेक्षा जास्त कामी येतो. त्यामुळे कोहली नसताना ऑस्ट्रेलियन्सच्या नजरेला नजर भिडवण्याची हिंमत असणारा कोणीतरी पुढे आला पाहिजे. भारताची एक जमेची बाजू की ह्यावेळी आपल्या बहुतेक सगळ्याच खेळाडूंना ऑस्ट्रेलियात खेळण्याचा अनुभव आहे. आणि ऑस्ट्रेलिया दौर्यात हा अनुभवच कामी येतो. त्यात ऑस्ट्रेलिया देखील गेल्या दौर्यातल्या पराभवाचा वचपा काढायला उतावीळ असेल. प्रत्येक सामन्याचं प्रत्येक सेशन जिंकण्याच्याच इराद्यानी खेळलं तरच त्यांच्यापुढे टिकाव लागणार आहे. टक्कर कांटे की होगी!
आता वनडे आणि टी-२० चे स्नॅक्स खाऊन झाले - आता खरी मेजवानी. आयपील मुळे भारतीय आणि ऑस्ट्रेलियन खेळाडूंमध्ये खूप छान मैत्रीपूर्ण संबंध आहेत वगैरे भ्रम १७ तारखेपासून दूर व्हायला लागतील. वाघानी नखं काढून ठेवली तरी तो शिकार करणं सोडत नाही. तुम्ही एखाद्या ऑझी बोलरला एकवेळ आया बहिणींवरून शिव्या दिल्यात तरी तो कदाचित "not giving this a flying F**k mate" म्हणत तुमच्याकडे दुर्लक्षही करेल. अशी शिविगाळ तो डायपर भिजवत असल्यापासून ऐकत असतो. पण त्याला पुलचे दोन चौकार मारा आणि नाही त्याने नागासारखा फणा काढला तर सांगा. बस्स.... धवन किंवा शॉ चे दोन चौकार बसायचा अवकाश... खात्री आहे की स्टार्क निम्म्या पिचपुढे येईल आणि म्हणेल "डू दॅट अगायन अँड आयल नॉक योर हेड ऑफ माएट"!
तो देवियों और सज्जनों... १७ तारीखसे कृपया अपनी लॅपटॉप बंद कर लें और कुर्सीकी पेटी बांध लें. तयार व्हा कोहली आणि स्टार्क, पुजारा आणि कमिन्सची द्वंद्व पाहण्यासाठी...तयार रहा बॅगी ग्रीनचा माज बघण्यासाठी..... तयार रहा रहाणे अन टिम पेनमधला बुद्धिबळाचा डाव बघण्यासाठी.... "जीतेगा भई जीतेगा" आणि "गो ऑझी" चे नारे ऐकण्यासाठी... हातापायाची बोटं मोडणार्या बाउन्सर्स आणि यॉर्कर्ससाठी.......स्लिप्समधे घेतल्या जाणार्या अप्रतीम झेलांसाठी...... स्टम्प माइकमधून ऐकू येणार्या स्लेजिंगसाठी.....तयार रहा भर थंडीत घाम फोडणार्या आक्रमक क्रिकेटसाठी.
कारण ज्याला आपण क्रिकेट म्हणतो ते पांढर्या कपड्यांत आणि ५ दिवस खेळलं जातं!

0 टिप्पण्या:
टिप्पणी पोस्ट करा
याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]
<< मुख्यपृष्ठ