सोमवार, ६ जुलै, २०२०

त्रिगुणात्मक त्रिदेव

"A pack of wolves lead by a lion is more dangerous than a pride of lions lead by a wolf"

नाभिषेको न संस्कारः सिंहस्य क्रियते वने | विक्रमार्जितसत्त्वस्य "स्वयमेव मृगेंद्रता" ||

खेळाच्या दुनियेत देखील ही मृगेंद्रता कॅप्टनला स्वतः कमवावी लागते. तीर्थरूपांच्या खर्चानी "आपल्या टीमचे तरुण तडफदार नेतृत्व" असल्याचे फ्लेक्स गावभर लावून खेळातलं नेतृत्व मिळवता येत नाही आणि मिळालं तरी निभावता येत नाही. क्रिकेटसारखा खेळ तर जितका मैदानावर खेळला जातो त्याहीपेक्षा कणभर अधिकच मनात आणि बुद्धीने खेळला जातो. आणि अश्या वेळी एखादा वाघाच्या काळजाचा आणि लांडग्याच्या धूर्त डोक्याचा कर्णधार पराभवाला विजयात बदलू शकतो.

आज तीन खेळिये आणि त्यांच्या तीन गोष्टी. तिघांचाही पराक्रम वादातीत. तिघांनीही निर्णायक टप्प्यांवर आपल्या नेतृत्वाने भारतीय क्रिकेटला आणि त्याहून महत्वाचं म्हणजे खेळाडूंच्या विचारांना नवी दिशा दिली - नवा आत्मविश्वास, नवा दृष्टिकोन दिला.



पहिली गोष्ट १९८१ साली मेलबर्न कसोटीत घडलेली. भारताच्या कर्णधाराला डेनिस लिलीच्या गोलंदाजीवर बॅटीची कड घेतलेली असताना देखील LBW देण्यात आलं. अजून कोणी असता तर धुसफुसत, अंपायरला शिव्या घालत का होईना निघून गेला असता. पण हा कर्णधार असा ऐकून घेणारा नव्हता. त्याने आपल्याबरोबर आपल्या सलामीच्या साथीदाराला - चेतन चौहानला घेऊन पॅव्हिलियनकडे चालायला सुरुवात केली. ऑस्ट्रेलियन प्रेक्षक त्यावेळी त्याची हुर्यो उडवायला लागले. पण तो असल्या गोष्टींना भीक घालणारा नव्हता. एरवी अंपायरनी आऊट द्यायची वाट न बघता तो चालू लागायचा आणि म्हणूनच ह्यावेळेच्या त्याच्या रागाला त्याच्या प्रामाणिकपणाची धार होती. हा कर्णधार कातडीच्या रंगाला, श्रीमंतीला किंवा आडदांड शरीराला घाबरून दबून जाणारा नव्हता. इंग्लंड - ऑस्ट्रेलिया ह्या त्यावेळच्या श्रीमंत आणि प्रगत देशांच्या खेळाडूंच्या काय किंवा विंडीजच्या भयप्रद तोफखान्याच्या काय - डोळ्याला डोळा भिडवून त्यांच्याच अंगणात त्यांनाच खुन्नस दाखवायला शिकवणारा तो कर्णधार होता सुनील मनोहर गावसकर!



सुनील गावसकर म्हणजे बावनकशी सोन्यासारखं शुद्ध तंत्र, सह्याद्रीच्या कडेकपार्‍यांसारखा अभेद्य बचाव, अप्रतीम पदलालित्य आणि मुंबई क्रिकेटच्या रक्तात भिनलेला मूर्तिमंत खडूस चिवटपणा. मार्शल, होल्डिंग, गार्नर, लिली, थॉम्पसन, हॅडली, इम्रान सारख्या धडकी भरवणार्‍या गोलंदाजांसमोर हेल्मेट न घालता नुसता टिकणारा नव्हे तर त्यांच्या नाकावर टिच्चून धावांची रास ओतणारा गावसकर हे भारतीय क्रिकेटला पडलेलं स्वप्न होतं. लॉर्ड्सवर लुंगी कुर्ता घालून इंग्रजांच्या पोकळ अभिमानाला फाट्यावर मारणार्‍या सुनील गावसकरने भारतीय क्रिकेटला बलाढ्य प्रतिस्पर्ध्यासमोर पाय रोवून निडरपणे उभं राहायला शिकवलं.

दुसरी घटना क्रिकेट पंढरी लॉर्ड्सची. २००२ ची नॅटवेस्ट ट्रॉफी फायनल. आणि कुठल्याही भारतीय क्रिकेटषौकीनाच्या मनात कायमचं घर करून राहिलेलं दृश्य! तो टीशर्ट फिरवताना आपल्या कॅप्टनने उच्चारलेले ते प्रेमळ शब्द कोणाला ऐकू गेले नसतील पण त्या शब्दांनी फक्त फ्लिंटॉफच्या किंवा इंग्लिश क्रिकेटच्याच नाही तर भारतीय क्रिकेट आणि पर्यायाने भारतीयांना कमी लेखणार्‍या प्रत्येकाच्या कानठळ्या बसल्या असतील.



अतिशय कठिण परिस्थितीत सौरव गांगुली कर्णधार झाला. दादा काही फार मोठा मुत्सद्दी होता असं नाही. काहीतरी अफलातून डावपेच लढवून त्याने सामने जिंकले असंही नाही. पण त्यानी एका "टीम ऑफ चँपियन्स" ला एक "चँपियन टीम" बनवलं. निदान ती वृत्ती, ती जिगर तर रुजवलीच रुजवली. सचिन बाद झाल्यावर गुमानपणे टीव्ही बंद करून आपापल्या कामाला लागण्याच्या सवयीतून आपल्याला बाहेर काढलं ते सौरव चंडीदास गांगुली ह्या माणसानं. युवी, सेहवाग, भज्जी, धोनी, रैना, झहीर अश्या गुणी खेळाडूंना पंखांखाली घेऊन दादानी एक मजबूत संघ घडवला. टॅलेंटपेक्षा महत्त्वाची असते ती जिंकण्याची तीव्र इच्छा... संघभावना... देशासाठी खेळण्याचा अभिमान...लढाऊ वृत्ती.... शेवटपर्यंत हार न मानणं....१००% प्रयत्न करणं. आणि हेच गुण दादानी भारतीय क्रिकेटमध्ये रुजवले. "आपण कुठेही कोणाहीविरुद्ध जिंकू शकतो" हा विश्वास निर्माण केला तो दादानीच. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार होणं हा खरंतर काटेरी मुकुटच. पण दादानी तो सांभाळलाच नाही तर तो अभिमानाने मिरवला !

सौरव गांगुलीने लॉर्ड्सच्या बाल्कनीत टीशर्ट काढून फिरवणे हा मेलबर्नला १९८१ मध्ये घडलेल्या प्रसंगाचा पुढचा एपिसोड होता.

तिसरा प्रसंगदेखील इंग्लंडमधलाच. बर्मिंगहॅममधली चॅम्पियन्स ट्रॉफी फायनल जिंकायला पावसामुळे इंग्लंडला २० ओव्हर्समध्ये फक्त १३० धावा करायच्या होत्या. २०-२० च्या जमान्यात इंग्लंडसारख्या तगड्या बॅटिंग लाइन अप साठी हे आव्हान अवघड नक्कीच नव्हतं. पण स्टंप्सच्या पुढे कितीही धुरंधर बॅट्समन असले तरी स्टंप्सच्या मागे भारताचा अनुभवी, चलाख आणि धूर्त कर्णधार होता - महेंद्रसिंह धोनी. त्यानी ह्या आधी भारताला २००७ चा टी-२० आणि २०११ चा वनडे विश्वचषक जिंकून दिले होते.



जे धोनीनी २००७ पासून अनेकदा केलं होतं तेच तो पुन्हा एकदा करत होता. ढगाळ वातावरणात स्पिनर्सवर जास्त विश्वास ठेवणे, मधूनच डीप गली सारख्या पोझिशनला फील्डर ठेवून बॅट्समनला गोंधळात टाकणे, बॅट्समन रंगात यायला लागला की स्पिनर्सना आपला वेग अजूनच कमी करायला लावणे, एका एका रनसाठी त्यांना घाम गाळायला लावणे - सगळे डावपेच धोनीने वापरले आणि ज्या थंडपणे तो बॅटिंग करताना मॅच संपवायचा त्याच थंडपणाने त्याने इंग्लंडच्या तोंडातला घास हिरावून घेतला. २०१३ चा भारत हा १९८१ च्या गावसकरनी दिलेल्या आत्मविश्वास आणि २००२ मध्ये गांगुलीने दिलेल्या खुनशीच्या खांद्यावर उभा राहून क्रिकेटविश्वावर पुन्हा एकदा आपला ठसा उमटवत होता.




सुनील गावसकर (१० जुलै), सौरव गांगुली (८ जुलै) आणि महेंद्रसिंह धोनी (७ जुलै) ह्या तिघाही महान कर्णधारांचा वाढदिवस एकाच आठवड्यात यावा हा किती छान योगायोग. भारतीय क्रिकेटच्या ह्या तीन दिग्गजांना त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा आणि त्यांच्या कर्तृत्वाला सलाम!

© - आशुतोष थत्ते

1 टिप्पण्या:

२६ फेब्रुवारी, २०२२ रोजी ५:३३ AM वाजता वाजता, Blogger Unknown म्हणातात...

मी प्रथमच तुमचे पोस्ट वाचले. मला ते खूपच आवडले.

 

टिप्पणी पोस्ट करा

याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]

<< मुख्यपृष्ठ