शनिवार, २३ मे, २०२०

एका खेळीयाने - राहुल द्रविड

प्रसंग १:
"मुझे भगवान के लिये छोड दो... मैं तुम्हारे हाथ जोडती हूँ... पाँव पडती हूँ !!" तश्या परिस्थितीतही ग्लॅमरस दिसणार्‍या हिरॉइनची आर्त विनवणी.
"जानेमन... तुम्हें अगर भगवान के लिये छोड देंगे तो हम क्या करेंगे?" गुटखा खाल्ल्यासारखे दिसणारे दात विचकत व्हिलनची विचारणा ! त्याच्या साथीदारांची "हा हा हा" अशी तद्दन फुटकळ साथ. व्हिलन हिरॉइनच्या जवळ येतो.... तोंडी (लोणचं) लावण्याइतपत तिच्याशी चाळा करतो आणि तिच्या पदराला (हल्ली हा प्रकारच गायब झालाय हिरॉइनच्या अंगावरून) हात घालणार इतक्यात.........
"धाsssssssssssड"..... दार, भिंत, छत, जमीन अगदीच नाही तर गेलाबाजार एखादी काच फोडून हीरोची एंट्री. "कुत्ते कमीने....अगर रोमाको छूनेकीभी कोशिश की तो मैं तेरा खून पी जाऊंगा" वगैरे नेहेमीची वाक्यं. मग देssssssssssमार हाणामारी...व्हिलनच्या पिस्तुलातल्या सहा गोळ्यांना हीरो त्याच्या पिस्तुलातून १३२ गोळ्यांचं उत्तर देणार... उगाच २०-२५ टाळकी फोडणार.... लाखो रुपयांचं फर्निचर तोडणार आणि एकदाचा रोमाला त्यांच्या तावडीतून सोडवणार. की हे दोघे बागेत बागडायला मोकळे ! (आजकाल डायरेक्ट बेडरूम गाठतात म्हणे).

प्रसंग २:

"मुझे भगवान के लिये छोड दो... मैं तुम्हारे हाथ जोडती हूँ... पाँव पडती हूँ !!" तश्या परिस्थितीतही ग्लॅमरस दिसणार्‍या हिरॉइनची आर्त विनवणी.
"जानेमन... तुम्हें अगर भगवान के लिये छोड देंगे तो हम क्या करेंगे?" गुटखा खाल्ल्यासारखे दिसणारे दात विचकत व्हिलनची विचारणा ! त्याच्या साथीदारांची "हा हा हा" अशी तद्दन फुटकळ साथ. व्हिलन हिरॉइनच्या जवळ येतो.... तोंडी (लोणचं) लावण्याइतपत तिच्याशी चाळा करतो आणि तिच्या पदराला (हल्ली हा प्रकारच गायब झालाय हिरॉइनच्या अंगावरून) हात घालणार इतक्यात.........
"टकटकटक"...दारावर कोणीतरी "नॉक" करतं ! व्हिलनचा चमचा दार उघडतो तर समोर सुटाबुटातला (हीरो असूनही) स्वच्छ दाढी केलेला, केस व्यवस्थित कापलेला (चक्क) सुशिक्षित दिसणारा इसम उभा असतो.
"आपमेंसे मि. शाकाल कौन है?" नम्र विचारणा.
"जब पडता है अकल का आकाल.. तब मौत बनके आता है शाकाल..." असंच काहीसं म्हणत शाकाल समोर येतो.
"मैं राज मेहरा" हीरो चं इंट्रोडक्शन - "सर आपने रोमाको किडनॅप क्यों किया है जान सकता हूँ?"
आणि मग बराच वेळ वाटाघाटी....वादविवाद. थोडं देणं थोडं घेणं - निगोसिएशन्समध्ये अगदीच परिस्थिति चिघळली तर क्वचित चढलेला हीरोचा आवाज... आणि मग हताश व्हिलनसमोरून रोमाच्या अंगाला न खरचटता तिला घेऊन जाणारा हीरो !

काय म्हणताय? कसा "मेथॉडिकल" वाटला ना अप्रोच? सगळं कसं शिस्तीत. उगाच हाणामारी नाही.. .रक्तपात नाही फुटलेल्या काचा नाहीत की तुटलेली हाडं नाहीत .... उद्दिष्ट साधलं गेल्याशी मतलब ! दोन्ही प्रसंगात आणीबाणी तीच, साधलेलं उद्दिष्टही तेच! पण दोन्हींतली पद्धत मात्र जॅकी चॅन आणि आण्णा हजारेंइतकी वेगळी. पण शेवटी टाळ्या, शिट्ट्या कशाला पडतात? तिकिटं कोणाच्या नावावर खपतात? डोक्याला किक कोण देतो? "ब्रेनी" हीरोला आजकाल विचारतो कोण?

Rahul Dravid - a tale of perseverence — CricketMash


आपला आजचा खेळिया असाच "ब्रेनी" हीरो. खरंतर जन्मजन्मांतरीचा "साईड हीरो" ! आपल्या पहिल्याच कसोटीत ह्याला शतकासाठी आणि ते ही लॉर्डसवरच्या शतकासाठी फक्त ५ धावा कमी पडल्या. आणि तेव्हापासून आजतागायत त्याला दर वेळेस ५ धावा कमीच पडत आल्या आहेत. ह्यानी १४५ रन्स कुटल्या तेव्हा कोणीतरी १८३ मारल्या... ह्यानी १५३ मारल्या तेव्हा कोणी १८६ मारल्या... त्यानी १८० मारल्या तेव्हा अजून एकानी २८१ मारल्या ! दर वेळेस त्याच्या वाटेला आली ती साईड हीरोची भूमिका. पण त्यानी त्या भूमिकेतही कित्येक पिक्चर खाल्लेत. कित्येक वेळा हीरोंनी कच खाल्ल्यावर आपल्या "मेथॉडिकल अप्रोचनी" हिरॉइनला वाचवलंय. अनेकदा व्हिलनचे वार सहन करून, त्याला बोथट करून हीरोला फूटेज खायला मदत केली आहे. मुन्नाभाईसाठी "सर्किट" जसा त्याला हवा तेव्हा कुठूनही टपकतो तसा कधी ओपनर, कधी नं ३, कधी नं ५, कधी ६, कधी यष्टिरक्षक आणि कधी स्लिप्समधल्या भरवश्याच्या क्षेत्ररक्षकाच्या रूपात तो "टपकला" आहे. ह्या कृष्णानं कित्येक वेळा द्रौपदीचं वस्त्रहरण रोखलं आहे. एकापेक्षा एक अवलिया धुरंधर आक्रमक फलंदाजांच्या मांदियाळीत आपल्या अभिधानाला जागून बचावाची अभेद्य तटबंदी उभारणारा, अचाट hand eye co-ordination, अफलातून timing, डोळ्यांचं पारणं फेडणारी नजाकत ह्यासारखी कुठलीही नैसर्गिक देणगी नसताना केवळ आणि केवळ आपल्या कष्टांच्या जोरावर क्रिकेटच्या शिलालेखात आपलं नाव सुवर्णाक्षरांत कोरणारा राहुल शरद द्रविड !


राहुल द्रविडच्या कौतुकाचा "सीझन" असायचा. आयपीएलचा धुडगूस चालू असताना. निळ्या कपड्यांतले आपले खेळाडू मैदानं मारताना (अथवा मार खातांना) ह्याची कोणाला आठवणही व्हायची नाही. पण दिवाळीत जसा आंघोळीला उटण्याबरोबर "मोती" साबण तसा श्वेतवस्त्रांतल्या क्रिकेटमध्ये राहुल द्रविड. ग्रेस, ब्रॅडमन, हटन पासून कदाचित गावसकर, स्टीव्ह वॉ, अ‍ॅम्ब्रोसपर्यंत मंडळी जे क्रिकेट खेळली त्याचा चेतेश्वर पुजाराच्या आधीचा एकमेव पाईक. ह्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये रिव्हर्स स्वीप कर्तांना पाहणं हे पूर्ण कपड्यांतली मल्लिका शेरावत दिसण्याइतकं दुरापास्त. टेस्ट क्रिकेट म्हणजे पहिले दोन तास बोलरला देऊन, त्याची रग जिरेपर्यंत त्याला खेळून काढून खराब चेंडूची वाट बघणे - ह्यावर विश्वास असणार्‍या अल्पसंख्यक फलंदाजांपैकी एक. ह्या "खेळून काढण्यामध्ये" मग छातीवर बाऊन्सर्स घेणे, शंभर वेळा "बीट" झाला तरी निराश न होणे, ऑफस्टंपच्या बाहेरच्या चेंडूला अस्पृश्यतेने वागवणे, स्कोअरबोर्डकडे ढुंकूनही न पाहता तासनतास खेळपट्टीवर ठाण मांडून बसणे हे सगळं आलं. ह्या माणसाकडे इतका संयम होता की संयम हा जर बँकेत ठेवता आला असता तर हा थोरल्या अंबानींपेक्षा श्रीमंत असता ! गोलंदाजाला मान देऊन त्याच्याशी दोन हात करणं, आपल्या संधीसाठी संयमानी वाट बघणं, विकेटवर स्थिरावेपर्यंत कराव्या लागणार्‍या संघर्षातल्या "झपुर्झा" चा आनंद घेणं हे कोण्या येर्‍यागबाळ्याचे काम नोहे ! 


राहुल द्रविडबद्दल लिहायचं तर उगाच आकड्यांचे, विक्रमांचे संदर्भ देण्यात अर्थ नाही. कारण म्हणतात ना - stastics are like bikinis - what they reveal is interesting, but what they conceal is more vital. तसे द्रविडचे आकडे कुठल्याही मापदंडानी अचाटच आहेत. पण का कोण जाणे त्या आकड्यांच्या इतर मानकर्‍यांबरोबर त्याचं नाव त्याच दमात घेतलं जात नाही. "महान फलंदाज" म्हणून जितक्या पटकन सचिन, पाँटिंग, लारा, स्टीव्ह वॉ ही नावं घेतली जातात तितक्या चटकन राहुल द्रविड (आणि जाक्स कॅलिसदेखील) लोकांना आठवत नाही. ऑर्केस्ट्रामधल्या "सेकंड फिडल" सारखं राहुल द्रविडचं अस्तित्व त्याच्या रिटायरमेंट नंतरच जाणवायला लागलं.

क्रिकेटच्या दोन्ही प्रकारांत मिळून ४६ हजार पेक्षा जास्त बॉल्समध्ये केलेल्या २३ हजारापेक्षा अधिक धावा आणि ४०० पेक्षा अधिक झेल हे कोणाचेही डोळे दिपावेत असेच आकडे आहेत. भारताच्या कसोटी विजयांमध्ये ६५.६९ आणि वनडे विजयांमध्ये ५० ची सरासरी राहुल द्रविडचं महत्त्व अधोरेखित करून जाते. स्लिप्समध्ये एक safe as a house कॅचर हा तर मिळालेला बोनस! पण वर म्हटल्याप्रमाणे ऑल टाईम ग्रेट्सच्या यादीत त्याचं नाव इतक्या सहजी घेतलं जात नाही. ह्याचं कारण म्हणजे क्रिकेटच्या मैदानातच नाही तर आयुष्यातसुद्धा त्यानी नेहेमीच केलला "अंडरप्ले". बोलिंगवर घणाघाती हल्ला चढवून तिच्या चिंधड्या उडवणं ही जशी त्याची प्रवृत्ती नाही तशीच वादग्रस्त विधानं करणं, रिअ‍ॅलिटी शोज मध्ये जाणं, भलत्याच जाहिराती करणं ही देखील नाही. "किंगफिशर" च्या एका जाहिरातीतही गेल, सेहवाग, डेव्हिड वॉर्नरसारख्या टग्यांबरोबर "उलाय् लाय ल ला ले ओ" करणारा द्रविड हा "ऑड मॅन आउटच" वाटायचा. कुठेतरी त्याच्याबद्दल वाचलं होत - "As he lets a scorcher past him or steps back to work the ball square of the wicket to the fence with balletic grace, he seems to tell the bowler: “Your move, please.”

Rahul Dravid's five finest Test innings – Adelaide, Leeds, Kolkata ...

खरोखर - क्रिकेटच्या मैदानावर बुद्धिबळाचा डाव मांडावा तो द्रविडनेच.

जग नेहेमी आक्रमक खेळावर फिदा होतं. अवलियांवर जीव ओवाळून टाकतं, निसर्गदत्त सौंदर्याला भुलतं, नेत्रसुखद गोष्टींवर भाळतं. आपण सगळेच चमत्काराला नमस्कार करतो. पण राहुल द्रविड ह्या एका खेळियाने आपल्याला कष्टांमधलं सौंदर्य दाखवलं. खडतर साधनेतल्या सुखाशी आपली ओळख करून दिली. मेहनत करून मिळवता येत नाही असं जगात काहीच नाही हे आपल्या कर्तृत्त्वानी दाखवून दिलं. When the going gets tough the tough get going ह्या उक्तीला अनुसरून प्रतिकूल परिस्थितीशी डोकं थंड ठेऊन दोन हात कसे करावेत हे शिकवलं. नि:स्वार्थीपणानी संघासाठी - सहकार्‍यांसाठी कसं झटावं, कठिण परिस्थितीत खांद्यावर जबाबदारी घेऊन ती कशी निभवावी ह्याचा आदर्श घालून दिला. विजय मिळवण्यासाठी प्रतिस्पर्ध्याचे प्रहार झेलायची तयारी हवीच हे आमच्या मनावर बिंबवलं. आपला वार करण्यासाठी योग्य क्षणाची वाट कशी बघावी हे सांगितलं. तुमच्या मनात, कष्टांत आणि कामात "सच्चाई" असेल तर यशाचं शिखर गाठणंही अशक्य नाही हे दाखवून दिलं.

कित्येक वेळा घडलंय बघा - भारताची पहिली विकेट लवकर पडायची. आपली चुळबुळ सुरु. "च्यायला नेहेमीचं आहे ह्यांचं फेकलीच शेवटी विकेट"वगैरे कमेंटस मारल्या जायच्या. विकेटबद्दल, आमच्या फलंदाजांच्या क्षमतेबद्दल नाना शंका कुशंकांनी मन पोखरायचं. इतक्यात आपली "शस्त्रं" परजत एक शिडशिडीत व्यक्ती आपल्या पूर्ण पेहेरावात - अंगभर पॅडिंग घालून मैदानात उतरायची. कोपरात वाकलेल्या हातांनी "गार्ड" घेतला जायचा. तिकडे मिळालेल्या विकेटचा उन्माद विसरून बोलर पुढे कराव्या लागणार्‍या कष्टांचा विचार करत परत आपल्या मार्ककडे जायचा. कॅमेरा झूम इन व्हायचाआणि कपाळावर अंमळ खाली आलेल्या हेल्मेटमधून आतला चेहरा दिसायचा. अत्यंत तंत्रशुद्ध असा "स्टान्स" घेतला जायचा. त्या चेहर्‍यावरचे त्रासिक भाव बदलायचा आणि तो आत्मविश्वासाचा आणि कणखरपणाचा चेहरा बनायचा. आता आम्ही इथे निर्धास्त व्हायचो. आता काही काळजी नाही. कारण आम्हाला ठाऊक होतं की आता विकेटवर आपल्यासाठी एक फलंदाज नाही तर जगातली कितीही भयप्रद गोलंदाजी नामोहरम करणारी एक भिंत उभी आहे. कारण त्या चेहर्‍याचं नाव होतं "राहुल - द वॉल - द्रविड" !

Will Rahul Dravid's record of playing most number of balls be ever ...

© - आशुतोष थत्ते


2 टिप्पण्या:

२३ मे, २०२० रोजी ११:१७ PM वाजता वाजता, Blogger Amit's Blog म्हणातात...

Apratim Toshya!

 
२४ मे, २०२० रोजी ४:२१ AM वाजता वाजता, Blogger आशुतोष थत्ते म्हणातात...

Dhanyawaad sir :-)

 

टिप्पणी पोस्ट करा

याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]

<< मुख्यपृष्ठ