खासियत खेळियाची ४ - मेकिंग अ मार्क
Crush - हो हो ! तुम्हाला अभिप्रेत आहे तोच crush. ह्याला का कोणास ठाऊक मराठीत प्रतिशब्द सापडतच नाही. आणि नाही सापडत तेच बरंय. Crush मधला भाबडेपणा, त्यातली निरागसता आणि निर्भेळ असं प्रेम हे तसंही इतर कुठल्या शब्दात व्यक्त होणं अवघडंच.
क्रिकेट आपलं पहिलं प्रेम असेल तर क्रिकेटमधला आपला पहिला क्रश म्हणजे मार्क वॉ. "कितने भी तू करले सितम, हस हसके सहेंगे हम" हे गाणं मार्क वॉ इतकं कोणाला चपखल बसत नसेल. ह्या माणसात मुळातच एक आपलेपणा वाटायला लावणारं काहीतरी होतं. "ना समझे वो अनाडी है" म्हणणारी नूतन जशी कुठल्याही मेकअप, कॉस्चूम शिवाय देखील कमालीची सुंदर दिसायची तसंच काहीसं. मार्क वॉ नी आपल्या विरुद्ध सेंच्युरी मारून मॅच काढली, मोक्याच्या वेळेला कोणाला रन आउट केलं, इतकंच काय १९९६ च्या वर्ल्डकप मध्ये सचिनला वाईड टाकून आउट केलं तरीही आम्हाला कधी मार्क वॉचा राग आला नाही. कदाचित त्याच्या बॅटिंगमध्ये असणार्या साध्या सरळ सौंदर्यानी आम्हाला भुरळ घातली होती.
आपल्या काही मिनिटांनी मोठ्या असलेल्या गंभीर, खवचट जुळ्या बंधूंच्या तुलनेत मार्क वॉ म्हणजे कार्ल्याच्या कापांच्या शेजारी रसाळ पायरी जणू! ह्या माणसाच्या हातात बॅट म्हणजे व्हायोलनिस्टच्या हातात बो! आणि म्हणूनच ह्याची फलंदाजी म्हणजे संगीत होतं ! ह्याच्या फटक्यांना "शॉट" म्हणणं म्हणजे सोज्वळ निशिगंधा वाडला अँजेलीना जोली म्हणण्यासारखं ! "अहिंसा परमो धर्मः" म्हणत हा चेंडूला कुरवाळायचा - थोपटायचा - क्वचित कधीतरी प्रेमानी एक टपली मारायचा ! स्क्वेअर ड्राईव्ह असो वा लेग ग्लांस, फ्लिक असो वा सरळ उचलेला षटकार - ह्याचा प्रत्येक फटका एक सुरेल composition असायचं. पण मला भावणारी धाकल्या वॉ साहेबांची खासियत म्हणजे त्यांचं कॅचिंग!
पहिल्या / दुसर्या स्लिपमध्ये गडी असा उभा राहायचा जणू सवेरासमोरून जाणारी फर्ग्युसनची हिरवळ बघतोय! निवांतपणा personified. बरं हा निवांतपणा म्हणजे इंझमामचा आळसावलेला निवांतपणा नव्हता बरं का! ह्या निवांतपणातही एक चलाखी होती. कसली घाई नाही, गडबड नाही, चिंता नाही. हा निवांतपणाच मार्क वॉला सर्वोत्तम स्लिप्स फील्डर बनवून गेला.
स्लिप्समधल्या फील्डरकडे बॅटीची कड घेतल्यावर बॉल अनपेक्षित वेगात आणि विचित्र कोनात येतो. त्याचा अंदाज घेणं म्हणजे कर्मकठीण काम. पण म्हणतात ना - A sure sign of greatness is making difficult things look easy. इथेच मार्क वॉ "उत्तमते"च्या सीमा ओलांडून महानतेकडे जायचा. त्याला येणार्या चेंडूचा अचूक अंदाज तर असायचाच पण शिवाय त्याच्या मनासारखंच त्याचं शरीरही relaxed असायचं. अत्यंत चपळाईने तो त्या चेंडूच्या रेषेत यायचा आणि प्रेयसीनं टाकलेलं गुलाबाचं फूल झेलावं तसा अलगदपणे तो कॅच घ्यायचा. मग तो अगदी जमिनीलगत असो किंवा डोक्याच्या वर. बरं हे सगळं दिसायला जितकं साधं सोपं दिसायचं तितकंच ते प्रत्यक्षात कठीण आणि कसबाचं काम होत. त्यामागे देखील तंत्रशुद्ध अभ्यास होता. मार्क वॉ त्याला "narrow stance technique" म्हणायचा. पायात अंतर कमी ठेवलं की "सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी" च्या बाहेर पटकन हालचाल करता येते. तुमचे हात जेवढे रिलॅक्स्ड असतील तितका तो चेंडू त्यांत पिशवीत कोबी टाकावा तसा सामावतो. फक्त त्यात जर तुम्हाला ती नजाकत हवी असेल तर मात्र तुम्हाला ते देणं जन्माला येतानाच घेऊन यावं लागतं.
आजकाल तर फील्डिंग कधी नव्हती इतकी सुधारली आहे. चपळता, अचूकता, वेग सर्वच बाबतीत आजकालचे फील्डर्स निर्विवादपणे सरस आहेत. पण फील्डिंगमधलं "ग्लॅमर" वाढलं असलं तरी "सौंदर्य" कुठेतरी हरवत चाललेलं दिसतं. मार्क म्हणायचा “Don’t try and catch the ball, let the ball catch you.” पण आजकालच्या swipe left swipe right करणार्या tinder पिढीला नुसत्या चोरट्या कटाक्षांतून व्यक्त होणारा रोमान्स कळावा तरी कसा? पोरांनो - मार्क वॉचं स्लिप्स मधलं कॅचिंग बघा - तुम्हाला थोडा अंदाज येईल.
© - आशुतोष थत्ते

0 टिप्पण्या:
टिप्पणी पोस्ट करा
याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]
<< मुख्यपृष्ठ