... And a Forward Shortleg
आपण कॉमेंटरीमध्ये नेहेमी ऐकतो बघा - Kumble resumes from round the wicket with an aggressive field – 2 slips, a gully, silly point and a forward shortleg. येस! ... And a forward shortleg! एकदम "...आणि डॉ. काशिनाथ घाणेकर" स्टाईलमध्ये! कारण ती जागाच तशी आहे. फुटबॉल मधे स्वीपर किंवा लिबेरो, हॉकीमध्ये quarterback , बास्केटबॉल मधे point guard, कबड्डीमधला कोपरा रक्षक यांचा जो माज, जे ग्लॅमर तेच क्रिकेटमध्ये फॉरवर्ड शॉर्टलेगचं. इथे डायलॉगबाजी करून टाळ्या शिट्ट्या घेण्याची बात नाही - कडक रोलमध्ये पिक्चर खाण्याचा विषय आहे. हातात सोट्यासारखी बॅट घेतलेले तडाखेबंद फलंदाज खेळत असताना तिथे फील्डिंग करणं येड्यागबाळ्याचं कामच नाही! खरंतर इथे नॉर्मल माणसांचंच काम नाही - इथे गबाळा नसला तरी येडाच पाहिजे!
एक तर Forward Shortleg ला फील्डिंग करायला बॅट्समनपासून हातभर अंतरावर उभं राहावं लागतं. विकेटकीपर अगदी स्टंप्सच्या मागे उभा राहिला तरी बॉल अगदी बोलरच्या हातात असल्यापासून दिसत असतो. समोरून बॉल येत असल्यामुळे कीपरला त्या बॉलचा वेग, टप्पा, त्याची दिशा, स्विंग किंवा स्पिन ह्याचा अंदाज घेणं बर्यापैकी सोपं असतं. पण Forward Shortleg चा फील्डर बॅट्समन आणि बोलरच्या आणि पर्यायानी बॉलच्या दिशेच्या काटकोनात असतो. त्याला तिसर्या मितीचा (डेप्थचा) अंदाज नसल्याने बॉल ऑफ स्टम्पच्या बाहेर पडलाय की स्टंपात ह्याचा अंदाज येणं जवळ जवळ अशक्य असतं. त्यामुळे त्याला मिळणारा reaction time फार फार कमी असतो. पुन्हा बॉल त्याच्याकडे आलाच तर नक्की कुठल्या दिशेने आणि किती वेगाने ते ही सांगता येत नाही. बॅट-पॅड असेल तर बॅट्स्मनच्या पायाशी लोटांगण घालावं लागतं किंवा एखाद्याचा सणसणीत पुल किंवा स्वीप डोकं सुद्धा फोडू शकतो. रमण लांबासारख्या दर्जेदार खेळाडूला ह्या पोझिशनवर आपला जीव गमवावा लागला ह्यातूनच त्या जागी असलेल्या धोक्याची कल्पना येते.


अशी १७६० लफडी असताना बहुधा संघातल्या नवख्या बॅट्समनला बळीचा बकरा बनवलं जातं ह्यात आश्चर्य ते काय? एरवी कोण राजी-खुषीने आणि अक्कलहुशारीने त्या आगीत उडी मारेल? जीव धोक्यात घालून कॅच पकडायला थांबायची कामं करणार कोण?
पण फॉरवर्ड शॉर्टलेगला आपला ठसा उमटवणारे वीर-बहाद्दर देखील होतेच की. बॅट्समनची बॅट पुल किंवा स्वीपसाठी कितीही जोरात फिरली तरी डोळ्याची पापणी न मिटणारे, इतक्या धोकादायक पोझिशनला देखील थंड डोक्याने, शांत चित्ताने, पाय रोवून उभे राहाणारे धुरंधर निपजतातच की. इतर कुठल्याही पोझिशनला फिल्डिंग करण शिकता येतं, पण फॉरवर्ड शॉर्टलेगला स्वतःहोऊन फील्डिंग करणारा फील्डर जन्मावा लागतो.
इथे नियमितपणे फील्डिंग करणारा प्राणी साधा सरळ मनुष्यप्राणी असून चालत नाही. तो composite लागतो. चित्त्याची चपळता, बगळ्याची एकाग्रता, वाघाचा संयम, गरुडाची नजर, मांजरीचं संतुलन, वटवाघळाचे पंजे आणि सर्वांत महत्वाचं म्हणजे - सिंहाचं काळीज. आणि त्यात जर माकडाची टवाळी असेल तर तो बोनस!
काही खेळियांनी ही फील्डिंग पोझिशन अजरामर केली. ह्या निडर क्षेत्ररक्षकांचा मेरुमणि म्हणजे एकनाथ धोंडू सोलकर. जुने जाणते क्लासिकलवाले जसे आपल्या गुरुजनांचं नाव घेताना कान चिमटीत पकडतात तसं अझरपासून रविंद्र जडेजापर्यंत लोकांनी सोलकरचं नाव घेताना आपले कान पकडले पाहिजेत. एकी सोलकरनं फॉरवर्ड शॉर्टलेगच्या जागेचा ७/१२ आपल्या नावावर करून घेतला होता. एकी नुसता निर्भय नव्हता तर अचाट anticipation आणि अफाट निरीक्षणशक्ती असलेला क्षेत्ररक्षक होता. असं म्हणातात की तो बॅट्समनच्या फूटवर्कवरून त्याच्या फटक्याचा अंदाज बांधायचा. त्याची नजर कायम बॉलवर असायची आणि म्हणूनच हेल्मेट किंवा कुठलीही संरक्षक साधनं न वापरण्याच्या काळात देखील त्याला एका हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या वेळासुद्धा बॉल लागला नसेल.
१९७१ मध्ये अॅलन नॉटने त्याला बाद करताना एकीने घेतलेल्या कॅचवर खुष होऊन त्याला आपली बॅट भेट दिल्याचीही कथा आहे आणि एकदा बॅट्समनने मारलेला पुल सोलकरच्या डोक्याला लागून मिडऑफला उभ्या असलेल्या प्रसन्नाने झेलल्याचीही. बॅट्समन पुल किंवा स्वीप करताना देखील एकी आपले पंजे चेहर्यासमोर ठेऊन चेहरा वाचवायचा पण बॉलवरची नजर कधी काढायचा नाही. आणि म्हणूनच चंद्रा - बेदी - प्रसन्ना - वेंकटराघवन च्या चौकडीच्या यशात एकनाथ सोलकरचाही मोठा वाटा होता. केवळ २७ टेस्ट्समध्ये घेतलेले ५३ झेल हे प्रमाण अजूनपर्यंत कोणी नॉन - विकेटकीपर गाठू शकलेला नाही. त्याला शेक्सपिअर ऑफ शॉर्ट-लेग किंवा बीथोवेन ऑफ बॅट-पॅड्स म्हणायचे ते उगाच नाही!
पुढे हेल्मेट्स आली, शिन-गार्डस, चेस्ट-गार्ड्स आली आणि फील्डर्सना त्या जागी फील्डिंग करण्यासाठी हिंमत यायला लागली. पण तरीही कारकीर्दीच्या शिखरावर फॉरवर्ड शॉर्टलेगला उभे राहणारे लोक विरळाच. ब्रायन क्लोज, टोनी लॉक, डेव्हिड बून, विंडीजचा गस लोगी, राहुल द्रविड, किंवा आताचे कुसल मेंडिस आणि चेतेश्वर ह्यांनी फॉरवर्ड शॉर्टलेगला कितीतरी अप्रतीम कॅचेस घेतलेले आहेत.


क्रिकेट हा नुसता मैदानी खेळ नाही. बोलरनी बॉल टाकला - बॅट्समननी मारला - बॅट्समन चुकला आणि आऊट झाला इतका सरळ हिशोब इथे नाही. एका वेळी शरीर, बुद्धी आणि मन ह्या तिन्हीचा कस बघणारा हा खेळ आहे. कसोटी क्रिकेटमधे तर मैदानावर बुद्धिबळाचा डावही मांडलेला असतो आणि इंटरव्ह्यूची खुर्ची सुद्धा! बोलर सतत प्रश्न विचारत असतो आणि त्यात फॉरवर्ड शॉर्टलेगला तगडा फील्डर असेल तर कसलेल्या बॅटसमनलादेखील घाम फुटतो. तिथे उभा असलेला खंदा फील्डर नुसत्या त्याच्या अस्तित्वानी बॅट्समनवर प्रचंड दबाव टाकू शकतो हाच त्या जागेचा महिमा!
बॅट्समनला बाद करायला जाळं लावणारा बोलर असेल - पण त्या जाळ्यात बॅट्समनला ओढणारा अस्सल शिकारी असतो फॉरवर्ड शॉर्टलेग! बोले तो बोलर बस ससी कपूर होता है... असली बच्चन तो कोई और है!


0 टिप्पण्या:
टिप्पणी पोस्ट करा
याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]
<< मुख्यपृष्ठ