गँग ऑफ बदलापुर
"एस पी साहेब, एक विधायक को सरेआम थानेमें थप्पड मारनेके लिये कितना दिन जेल में जाना पडता है?"
काल गॅबावर ४५ ओव्हर्समध्ये १ बाद १०७ अशी परिस्थिती असताना ६ फूट ५ इंच उंचीच्या मिचेल स्टार्कला ३ चेंडूंत १४ धावा चोपतानाचा शुभमन गिलचा उर्मटपणा "गँग्स ऑफ वासेपुर" च्या सरदार खानपेक्षा काही कमी नव्हता. आणि वर "और एसपी साहब हमऊ जाएंगे अबतो अंदर" म्हणणार्या असगरच्या स्टाइलमध्ये पुजारानी अजून एक कानफटात मारली.
त्या परिस्थितीत - जेव्हा भारत मॅच वाचवण्याच्या पलिकडे काही करू शकेल हा विचारही कोणाच्या ध्यानीमनी नव्हता - ही आक्रमकता अनपेक्षित होती. पण त्यापेक्षाही जास्त अनपेक्षित होती ती शुभमन गिलची देहबोली. जेलमध्ये शिरता शिरता "विधायक जे पी सिंग को कूट दिये - एसपी आफिसमें" म्हणणार्या मनोज वाजपेयी इतक्याच शांतपणे तो १ सिक्स आणि २ चौकार मारल्यावर स्क्वेअरलेगला फिरून आला. हा होता पहिला बदल.
दुसरा प्रसंग - ७० ओव्हर्समध्ये ३ बाद १९५ स्कोअर असताना लॉयनचा एक चेंडू ऑफस्टंपच्या बाहेरच्या एका भेगेवर पडून मैलभर वळून डायरेक्ट स्लिप्समध्ये गेला. तेव्हा कॉमेन्टरीला असलेला निक नाईट म्हणाला "Pant will be cautious on the next ball". पण अजित आगरकरला ह्या नव्या भारतीय संघाची मानसिकता बरोब्बर कळाली होती. तो म्हणाला "Knowing Pant I feel he may step out and go over long on". आणि झालंही तेच. पुढे सरसावत पंतनी लॉयन ला लॉन्गऑनच्या वरून फेकून दिला. आणि तेव्हा पहिल्यांदा जाणीव झाली की एखाद दुसरा खेळाडू नाही.... ही सगळी गँगच वेगळी आहे.
क्रिकेट निर्विवादपणे भारताचा सर्वात लोकप्रिय खेळ. आणि सिनेमा हा सर्वात लोकप्रिय टाईमपास. कित्येक वर्षं ह्या दोन्हीमध्ये त्या त्यावेळेच्या समाजाचं प्रतिबिंब दिसायचं. नंतर नंतर सिनेमाचं Corporatization झालं आणि सिनेमाची सामान्य जनतेच्या इच्छा - आकांक्षा, स्वप्नं, समस्या ह्यांच्याशी असलेली नाळ तुटली. पण खेळांमध्ये पैसा नाही तर Performance बोलतो. आणि म्हणूनच भारतीय संघाच्या attitude मध्ये त्या त्या वेळेच्या भारताचंच चित्र दिसतं.
आधीच्या बुजर्या संघांनंतरचा १९७० च्या दशकातला आपली ओळख निर्माण करू बघणारा अजित वाडेकरचा संघ. मग आत्मविश्वास वाढलेले गावसकर - कपिल चे संघ. मग हातात पैसा खेळू लागल्यावर गोंधळलेला आणि थोडा भरकटलेला अझरचा संघ. महिन्याच्या शेवटी वाचलेले पैसे डोळे मिटून बँकेत किंवा पोस्टात टाकणार्या, त्यानंतर पुढे जाऊन LIC आणि इंदिरा विकास पत्र घेणार्या आणि मग १९९० आलं तसं पहिल्यांदाच शेअर्समध्ये पैसे गुंतवणार्या सामान्य मध्यमवर्गीय भारतीय मानसिकतेचंच दर्शन ह्या संघांत घडत होतं.
२००० च्या दशकातला भारत आणि भारतीय क्रिकेट संघही आपली स्वतंत्र ओळख निर्माण करण्यासाठी धडपडत होता. त्यातच क्रिकेटचंही Corporatization झालं आणि खेळातल्या सृजनाला व्यावसायिकतेची जोड मिळाली की काय घडू शकतं हे दिसू लागलं. एकीकडे विशेषतः आयटी सारख्या क्षेत्रात भारतीय उद्योग आपलं अस्तित्व निर्माण करत असताच सौरव गांगुलीने एखाद्या बिझनेसमननी धडा घ्यावा अशी संघबांधणी सुरू केली. सचिन आऊट झाल्यावर टीव्ही बंद करायच्या सवयीतून आपल्याला बाहेर काढलं ते दादानी. आपला नेता नुसतं "पाठीवर हात ठेऊन लढ म्हणाला" की पोरं काय पराक्रम गाजवू शकतात ह्याची अनेक उदाहरणं बघायला मिळाली. टेस्टमध्ये ओपनिंगला पाठवलेला सेहवाग असो, ३ नंबरला प्रमोट केलेला धोनी असो किंवा "अब इज्जत तुम्हारे हाथमें है" म्हटल्यावर हातात नि:स्वार्थीपणे विकेटकीपिंगचे ग्लव्हज चढवणारा द्रविड असो. हरभजन, युवराज, कैफ, रैना, इरफान, झहीर, नेहरा, इशांत - दादानी मजबूत इमारत घडवायला घेतली होती. आणि ह्या इमारतीचे दगड मुंबई, दिल्ली बेंगलोरचेच नव्हे तर नजफगढ, जालंधर, रांची, श्रीरामपुर, बडोदा, लखनौ, मीरठ इथल्या खाणींतले होते. सचिनच्या खांद्यांवरचा भार हलका केला तो ह्या लोकांनी.
२००० चं दशक संपता संपता भारतीय कंपन्या जागतिक स्पर्धेला टक्कर देत होत्या - जगात नाव कमवायला लागल्या होत्या. २००८ साली आयपीएल चा वार्षिकोत्सव सुरू झाला आणि आपल्या छोट्या शहरांतल्या आणि गावातल्या रक्ताचं पाणी करणार्या क्रिकेटपटूंना देशातल्याच नव्हे तर जगातल्या सर्वोत्तम क्रिकेटपटूंच्या खांद्याला खांदा लावून खेळण्याची संधी मिळाली. आणि हळू हळू नजरेला नजर भिडवण्याचीही हिंमत आली. दादाच्या शेवटच्या कसोटीत त्याला नेतृत्व करायला लावणारा धोनी आणि धोनीच्या शेवटच्या सामन्यानंतर "You will always be my captain" म्हणणारा कोहली ह्यांनी दादाची मशाल योग्य हाती गेल्याची ग्वाही दिली.
गेल्या काही वर्षांपासून भारतात स्टार्ट-अप संस्कृती रुजायला लागली. नवीन विचार, नवी स्वप्नं, नव्या कल्पना साकारताना देखील सुरुवातीला धाकधूक होतीच की. पण हळू हळू उद्योगांचा आत्मविश्वासही वाढला, इतरांवर अवलंबून राहण्यापेक्षा ही तरुण पिढी "लाथ मारीन तिथे पाणी काढीन" अश्या मानसिकतेनी काम करायला लागली. आणि सर्वांत जास्त महत्वाचं म्हणजे अपयशाची भीती नाहीशी झाली. No risk no reward हे सूत्र ह्या पिढीने परफेक्ट ओळखलं. यशस्वी होण्यासाठी तुमच्यामागे दरवेळी कोणाची पुण्याई असण्याची गरज नाही हे ही त्यांना कळालं आणि यश हे फक्त मोठ्या शहरांमध्ये नाही हे ही. ह्या पिढीला संधीचं सोनं कसं करायच हे पक्कं ठाऊक आहे.
काल गॅबावर आपल्या पूर्ण शक्तिनिशी उतरलेल्या एकेकाळच्या जगज्जेत्या ऑस्ट्रेलियन संघाला त्यांच्याच घरात घुसून धूळ चारणार्या आमच्या नवख्या संघात हीच मनोवृत्ती दिसली. जवळपास पूर्ण पहिली फळी नसताना ह्या पोरांनी गेली कित्येक वर्ष क्रिकेटजगतावर अधिराज्य गाजवणार्या, मुत्सद्देगिरीत मुरलेल्या ऑस्ट्रेलियन्सना वेडानी झपाटून जाऊन, out of their skins खेळून नव्हे तर अतिशय थंडपणे, calculated risks घेत, प्रतिस्पर्धी टाकत असलेल्या दबावाला न जुमानता अत्यंत व्यावसायिक पद्धतीने हरवलं.
आणि ही पोरं कोण?
पंजाबातल्या फझिलकाचा शुभमन, राजकोटचा पुजारा, हैदराबादच्या रिक्षावाल्याचा मुलगा सिराज, सेलमचा थंगरसू नटराजन, हरिद्वारचा ऋषभ पंत, चेन्नईचा वॉशिन्ग्टन सुंदर, कर्नालचा नवदीप सैनी, पालघरचा शार्दुल ठाकुर, काकीनाडाचा हनुमा विहारी. अक्षरशः भारताच्या कानाकोपर्यातून आलेले हे सळसळत्या रक्ताचे तरुण. अॅडलेडमध्ये ३६ धावांत उखडले गेल्यावर आपल्या धीरोदात्त कर्णधारामागे खंबीरपणे उभी राहणारी पोरं. सीनियर खेळाडू नसताना कमालीची परिपक्वता दाखवत आपल्या खांद्यावर जबाबदारी घेणारी पोरं. फास्ट बोलर्सचे घाव छातीवर झेलणारी पोरं, ऑस्ट्रेलियन खेळाडूच नाही, तर मीडिया आणि माजी खेळाडूंची तोंडं आपल्या बॅट - बॉलनी बंद करणारी पोरं. आणि हो - इतक्या अभूतपूर्व विजयाच्या उन्मादात वाहावत न जाता नेथन लॉयनला शंभराव्या कसोटीनिमित्त संस्मरणीय भेट देण्याची दिलेरी दाखवणारी पोरं.
आणि ह्यावरही कडी आहेच. इतका पराक्रम गाजवूनही ही पोरं टीममधली आपली जागा गृहित धरू शकत नाहीत. कारण इकडे मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये कितीतरी नव्या पोरांनी दरवाज्यावर थाप मारायला सुरुवात केली आहे. Welcome to new India. येणारी काही वर्षं तरी भारतीय क्रिकेटसाठी खूप आशादायक दिसत आहेत हे नक्की.
ऑस्ट्रेलिया झालं डेस्टिनेशन बदलापुर. ऑस्ट्रेलियन्सच्या वर्षानुवर्षाच्या वर्चस्वाचा बदला आणि भारतीय क्रिकेटमधला "बदल" अश्या दोन्ही अर्थानी.
सौरव गांगुलीसारखा नेता बीसीसीआयचा अध्यक्ष असताना आणि साक्षात द्रविड गुरुजींचे आशीर्वाद पाठीशी असताना ही पोरं भारतीय क्रिकेटमध्ये नवे पराक्रम घडवत राहोत आणि ही "गॅग ऑफ बदलापूर" अशीच प्रगती करो हीच सदिच्छा!
-- आशुतोष थत्ते

0 टिप्पण्या:
टिप्पणी पोस्ट करा
याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]
<< मुख्यपृष्ठ