|| गे आये ऑलिम्पिकामाते ||
|| गे आये ऑलिम्पिकामाते ||
बा गजानना, मारोतीराया - भीमसेना.... ग्रीकांच्या क्रेटॉस देवा... अथेन्सच्या राणा झीअसा.... जापान्यांच्या सोजोबो देवा.... आज तुमां सांगणो करतंव महाराजा !
दर चार वर्षाप्रमानं आमी तुमची जी काय वेडीवाकडी सेवा केलेली हा... ती मान्य करूं घ्या... त्यात काय चूक-अपराध झालो असंल... तं लेकरांक क्षमा करा...आणि अलास्कापासून जपानपर्यंत आणि हिंदुस्तानापासून सेनेगलपर्यंत सर्वांची रखवाली करा.. सांभाल करा वो महाराजा |
आजपासून टोक्योमध्ये जो ऑलिम्पिक खेलांचा घाट घातला असा... तो जगभरातली पोराटोरा, म्हातारे कोतारे, बायाबापड्या साजारो करतत. ह्या खेळांक महामारी, असुरक्षा, अपघाता पासून दूर ठेवा... आणि जी काय इडा पिडा, वाकडा नाकडा असात तं दूर करा वो महाराजा !
कोनत्यापन देशाच्या कोनापन खेळाडूनी गेली पाच वर्षं आणि आयुष्यभर जीव तोडून मेहनत केली असेल... त्यांच्या देशाचं नाव उंचावायला, त्यांच्या खेलांमध्ये सगल्यांत चांगला होऊक ज्यांनी कोनी घाम गाळला असेल.... त्यांच्या कष्टांना फळ द्या वो महाराजा !
आमचे झील बजरंग पूनिया, नीरज चोप्रा, सौरभ चौधरी... आमची हॉकी खेलनारी पोरां... सार्यांनी खूप मेहनत केली असा... त्यांच्या हाताला यश द्या. सिंधू, मेरी कोम, विनेश फोगाट, दीपिका कुमारी, मनू भाकर ह्या आमच्या चेडवांक सोन्या - रुप्या - काश्यात मढवा वो महाराजा !
२०६ देशांची ही खेलनारी पोरां मानवजातीचो भविष्य हत. नेमबाजांचे आणि तीरंदाजांचे नेम बसूदे, धावनार्यांची धाव सुसाट सुटूदे, कुस्तिगीरांची - बॉक्सरांची ताकद अफाट वाढूदे, पोवनारे मासोळीगत पोवूदे, संघांमध्ये ताळमेळ असूदे. जुने विक्रम मोडूदे, नवे पराक्रम घडूदे. आजून वेगात, आजून उंच आणि आजून ताकदवान होताना ह्या खेलांच्या निमित्तानी जगातल्या सगल्या चांगल्या - चुंगल्या लोकांना एकत्र येन्याची आणि प्रेमाने राहान्याची बुद्धी द्या वो महाराजा !
होय महाराजा!!
आशुतोष थत्ते
२३ जुलै २०२१


0 टिप्पण्या:
टिप्पणी पोस्ट करा
याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]
<< मुख्यपृष्ठ