शनिवार, ६ फेब्रुवारी, २०२१

We'll never die!

 ६ फेब्रुवारी १९५८ ....दुपारी ठीक ३ वाजून ४ मिनिटं.

अशी एक घटना घडली की आख्खं जग हादरलं. युरोपियन कपच्या उपांत्यपूर्व फेरीत Red Star Belgrade ला त्यांच्या मैदानावर हरवून परतत असताना मँचेस्टर युनायटेड संघाला घेऊन जाणारं विमान म्यूनिच विमानतळावर धावपट्टीवरून घसरून अपघातग्रस्त झालं.  डंकन एडवर्ड्स, मार्क जोन्स, जेफ बेन्ट, टॉमी टेलर, एडी कोलमनसारख्या आठ हरहुन्नरी - गुणी खेळाडूंचा नियतीनी घास घेतला. सचिव वॉल्टर क्रिकमार, व्यवस्थापक टॉम करी आणि बर्ट व्हेली, काही पत्रकार असे २३ जण मारले गेले. डेनिस व्हायोलेट, बॉबी चार्लटन आणि खुद्द मॅट बस्बीसारखे अनेक जखमी झाले. जॉन बेरी आणि जॅकी ब्लांकफ्लॉवर सारखे खेळाडू पुन्हा कधी खेळू शकणार नव्हते. 



एखादा क्लब, एखादी संस्था ही जर का एक व्यक्ती मानली तर आयुष्यभर अपंगत्व आणणारा हा अपघात होता. कणा मोडणारा. काळजावर आघात करणारा. पण माणसाची जिद्द काय चमत्कार घडवू शकते ह्याची आपण कमी उदाहरणं बघतो का?

१८७८ साली जन्मलेल्या मॅन यू नी आजवर काही कमी हाल सोसले नव्हते. १९०२ मध्ये क्लब कर्जबाजारी झाला होता. ११ मार्च १९४१ रोजी जर्मन बाँबहल्ल्यात "ओल्ड ट्रॅफर्ड" जमीनदोस्त झालं होतं. मॅट बस्बीने अश्रू, घाम आणि रक्त एकत्र करून संघ पुन्हा घडवला होता. पण १९५८ चा हा धक्का पचवणं खरंच कठिण होतं. "शो मस्ट गो ऑन" म्हणत त्यांनी त्यावर्षी लीगच्या १४ मॅचेस खेळल्या, पण एकच जिंकू शकले. हा "दुबळा" संघसुद्धा त्या वर्षी FA Cup च्या फायनल्समध्ये धडक मारून आला. तरी त्या अपघाताच्या धक्क्यातून संघ सावरला नव्हता.

पण खेळ तुम्हाला वाटेल ते अपयश, वाटेल ते धक्के सहन करण्याची शक्ती देतो. क्षेत्र कुठलंही असो, खरा चॅम्पियन संकटाना "तू हमें काटनेकी सजा पाएगा" म्हणत त्वेषानी शिंगावर घेतो. अपयशाच्या नजरेला नजर भिडवून विजयाची गर्जना करतो. आणि मॅन यू हा तर चॅम्पियन खेळाडूंचा चॅम्पियन संघ !



५९ साली एक दिवस ओल्ड ट्रॅफर्डच्या दारात एक कॅडिलॅक थांबली. दरवाजा उघडला गेला आणि खुद्द मृत्युशी दोन हात करणारा मॅट बस्बी दोन कुबड्यांच्या साहाय्यानी उभा राहिला.... काही मिनिटांत डेनिस व्हायोलेट आला... बॉब चार्ल्टन आला....सहाय्यक व्यवस्थापक जिमी मर्फी आला. आणि पोरं पुन्हा कामाला लागली. फाटलेलं आभाळ पुन्हा शिवायला लागली. डेनिस लॉ, जॉर्ज बेस्टसारख्या अफाट टॅलेंटेड खेळाडूंना करारबद्ध करण्यात आलं. पुन्हा नव्या जोमानं प्रॅक्टिसला सुरुवात झाली. असं म्हणतात की संकटं माणसांना जवळ आणतात. त्या एका घटनेनं सगळ्या संघालाच नाही तर हजारो.. लाखो पाठिराख्यांना, चाहत्यांना जवळ आणलं . "मँचेस्टर युनायटेड" हा आता केवळ एक फुटबॉल क्लब उरला नाही. "मॅन यू" आता जिद्दीनी लढणार्‍यांचं, शुन्यातून जग उभं करू पाहणार्‍यांचं, संकटांच्या छाताडावर पाय देऊन पराक्रमाचा झेंडा रोवणार्‍यांचं मंदिर झालं !

एक एक काडी गोळा करत पुन्हा उध्वस्त घरटं बांधायला सुरुवात झाली. चार्ल्टन, लॉ आणि बेस्टचं अफाट त्रिकूट जमून आलं. प्रतिस्पर्ध्याचा बचाव फासळ्यांसारखा कापत जाणारे रेड डेव्हिल्स पुन्हा इंग्लिश आणि युरोपियन फुटबॉल गाजवू लागले. "बस्बी बेब्ज"नी ६३ चा FA Cup जिंकला, ६५ आणि ६७ साली लीग जिंकली आणि ६८ मध्ये Benfica ला हरवून युरोपियन कप जिंकणारा पहिला इंग्लिश संघ हा मानही मिळवला. ह्या अदभुत प्रवासाचा शिल्पकार मॅट बस्बी ६९ मध्ये संघव्यवस्थापक म्हणून निवृत्त झाला आणि क्लबचा जनरल मॅनेजर झाला. 



अनेक चढ उतार बघत ८६ - ८७ च्या मोसमाच्या ऐन मध्यात पुन्हा रेलेगेशनची शक्यता दिसत असतानाच अ‍ॅटकिन्सनच्या जागी अ‍ॅलेक्स फर्ग्युसन ह्या अ‍ॅबरडीनच्या व्यवस्थापकाची नियुक्ती करण्यात आली. अ‍ॅलेक्सनी त्या मोसमात मॅन यू ला १९ व्या स्थानावरून ११ व्या स्थानापर्यंत आणलं. क्लबवर त्याची मांड बसायला काही काळ गेला खरा. पण १९९३ चा मोसम जिंकल्यावर मॅन यू चा जो धडाका चालू आहे तो आजपर्यंत. त्याच काळात अ‍ॅलेक्स फर्ग्युसन... माफ करा - "सर अ‍ॅलेक्स फर्ग्युसन" च्या हातात गॅरी पॅलिस्टर, रायन गिग्ज, डेव्हिड बेकहम आणि पीटर श्मायकलसारखे हिरे गवसले जे पुढे बरीच वर्षं मॅन यू चे आधारस्तंभ ठरले. २०१३ साली तब्बल २७ वर्षांच्या मॅन यू कारकीर्दीनंतर सर अ‍ॅलेक्स रिटायर झाले.

प्रीमियर लीग, लीग कप, चँपियन्स लीग, कम्यूनिटी शील्ड, फिफाचा क्लब फुटबॉलचा विश्वचषक... मॅन यू नी फुटबॉलमधली प्रत्येक प्रतिष्ठेची स्पर्धा जिंकलेली आहे. आज क्लबचं मूल्य जवळपास २ अब्ज डॉलर्स आहे. २४ देशांमध्ये त्यांच्या पाठिराख्यांचे २०० पेक्षा अधिक अधिकृत सपोर्ट क्लब्ज आहेत. काही कंपन्यांच्या अंदाजाप्रमाणे त्यांचे जगभरात ३० कोटींपेक्षा जास्त चाहते आहेत. आजही प्रीमियर लीगच्या त्यांच्या सामन्यांच्या प्रेक्षकांच्या उपस्थितीचे आकडे इतरांचे डोळे फिरवतात. फेसबुकवर त्यांचे जवळपास दोन कोटी चाहते आहेत. यांचे पाठिराखे आपल्या लाल टीशर्ट्सवर गेल्या १९७१ पासून बाळगलेला "क्रेस्ट" छातीवर अभिमानाने मिरवत आहेत. एक व्यावसायिक फुटबॉल संघ म्हणून मॅन यू कडे जगातला प्रत्येक मान, सन्मान, मरातब आहे... प्रचंड पैसा आहे आणि पाठिंबाही ! 



संगीतात जे स्थान "हार्मनीचं" तेच आमच्या खेळांत "टीमवर्कचं". वेगवेगळ्या सप्तकांमध्ये जेव्हा वेगवेगळ्या "टोन्स"चे सूर एकत्र येतात तेव्हा निर्माण होणारं नादब्रह्म आणि वेगवेगळी कौशल्यं घेऊन, वेगवेगळ्या "टॅलेन्ट" आणि "टेंपरामेंट"चे खेळाडू एकत्र येतात तेव्हा निर्माण होणारं सळसळतं चैतन्य ह्यात फरक तो काय? गायकानी समेवर येताना तबलजीकडे "ये बात है।" म्हणत टाकलेली नजर आणि स्ट्रायकरनी बॉल नेटमध्ये ढकलता ढकलता मिडफील्डरच्या पासला दिलेली दाद हे सारखेच की ! डग्ग्याच्या नादावर गायकाच्या सुरांशी एकरूप होणारा कसलेला साथीदार तबलावादक आणि आपल्या आक्रमकांची ताकद ओळखून त्यांना "फीड्स" देणारा व्हॉलिबॉलचा "सेटर" ह्या दोघांची जातकुळी एकच ! 

पण खेळ हा संगीतासारखाच कोण्या एका माणसाच्या करिश्म्यावर थोडेच चालतो? गीतरामायणात फक्त बाबूजी किंवा फक्त गदिमा असते तर? बासू चक्रवर्ती, मारुती कीर, मनोहारी सिंग, लूई बँक्स, केर्सी लॉर्ड ह्यांच्याशिवाय आर.डी. बर्मनच्या संगीताची कल्पना तरी करता येईल का? पॉल मॅकार्टनी, जॉर्ज हॅरिसन, जॉन लेनन किंवा रिंगो स्टार ह्यांच्यापैकी एकालाही बाजूला ठेऊन "बीटल्स" डोळ्यासमोर येऊ शकतील?

आपल्या नशिबानी अनेक वेळा असे "एकसे बढकर एक" खेळिये एकत्र आले आणि आपल्या सांघिक खेळानी त्यांनी जग जिंकलं. न्यूझीलंडची "ऑल ब्लॅक्स" रग्बी टीम, १९९६ - २००८ पर्यंतचा ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ, ८० च्या दशकातला विंडीजचा संघ, अमेरिकेची बार्सिलोना ऑलिम्पिक्सची बास्केटबॉलची "ड्रीम टीम", ५० च्या दशकातली रेयाल माद्रिद, ७० च्या दशकातली ब्राझीलची फुटबॉल टीम, यँकीज, लेकर्स, बुल्सचे संघ.... अगणित असे संघ आहेत ज्यांनी त्या त्या खेळाला नव्या उंचीवर नेऊन ठेवलं. 

मँचेस्टर युनायटेड हे त्यातलं एक अग्रगण्य नाव.

आपल्याकडे "वास्तुपुरुष" ही संकल्पना आहे. प्रत्येक वास्तुला आपलं असं एक व्यक्तिमत्व असतं म्हणतात. आपले गड-कोट महाराजांच्या पराक्रमाच्या कथा सांगतात तर नवी अपार्टमेंट्स त्यात राहणार्‍या कारकुनांच्या व्यथा ! संध्याकाळी कधी शनिवारवाड्यात गेलात तर तो नुकतीच पगडी काढून शेंडीची गाठ सोडलेला वयस्कर पण तेजःपुंज चेहरा तुम्हाला त्याचा इतिहास सांगतो. गारद्यांच्या गर्दीत सापडलेल्या नारायणरावांचा "काका मला वाचवा" असा आक्रोश कानांवर येतो. महादरवाज्यावर सोसाट्याच्या वार्‍यात छातीचा कोट करून, भक्कम पाय रोवून, हातात नंगी तलवार घेऊन आणि पाठीला ढाल बांधून आपल्या आकडेबाज मिशांना पीळ देणारा रायगड बघितला आहात कधी? पहाटे पावणेतीन वाजता सी एस टी वरच्या शांततेत कधी बग्गीच्या टापांचा आवाज ऐकू आलाय तुम्हाला? बालगंधर्व रंगमंदिरात नाटक बघायला शिरताना अवचित अत्तराचा शिडकावा झाल्याचा भास झालाय कधी तुम्हाला? 

ह्याच वास्तुपुरुषांसारखं जर मँचेस्टर युनायटेड फुटबॉल क्लबचं काही व्यक्तिमत्त्व असेल तर ते अस्सल रांगड्या इंग्लिशमनचं आहे. ह्याचे हात कोणे काळी शेतात राबून राठ झालेले असले तरी त्याचे कपडे स्वच्छ आहेत. सूट खुंटीवर लटकवलेला आहे.. टायची गाठ सैल आहे... ताठ कणा, भरदार छाती, मजबूत खांद्यांचा हा उंचापुरा गडी आहे. हातांत त्याची आवडती बियर आहे. तोंडात पाईप आहे...खुरटी सोनेरी दाढी आहे.. चेहर्‍यावर बाssssरिक लाल - तांबूस ठिपके आहेत, निळे - विलक्षण बोलके डोळे आहेत. त्यांमध्ये अगदी लहान मुलाची निरागसता आहे.. ओठांवर स्मित आहे. फुटबॉलवर याचं निरतिशय प्रेम आहे. ज्यो स्पेन्स, बॉब चार्लटन, जॉर्ज बेस्ट ही त्याची दैवतं आहेत...आर्थर अ‍ॅलबिस्टन, ब्रायन रॉबसन, एरिक कँतोनाच्या कथा तो रंगवून रंगवून सांगतो...रॉय कीन, निकि बट, बेकहम, पॉल श्कोल्स, वेन रूनीचे दिवस आठवून तो "गेले ते दिन गेले" म्हणत उसासे टाकतो...डेव्हिड डी जिया, हुआन माता, पॉल पॉग्बासारख्या खेळाडूंचा "the new kids on the block" असा उल्लेख करताना त्याच्या डोळ्यांतून कौतुक ओसंडून वाहत असतं. प्रचंड पैसा आणि मानसन्मान असतानादेखील ह्याने आपली मूल्य, आपली "रूट्स" जपलेली आहेत. आणि म्हणूनच मॅन यू... द मँचेस्टर युनायटेड फुटबॉल क्लब आमच्यासाठी केवळ एक संघ नाही... आमचं आयुष्य अजून समृद्ध करणारा एक खेळिया आहे ! 

© आशुतोष थत्ते

६ फेब्रुवारी २०२१

0 टिप्पण्या:

टिप्पणी पोस्ट करा

याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]

<< मुख्यपृष्ठ