गुरुवार, २३ जुलै, २०२०

ऑलिम्पिक्सच्या उदरातून


ऑलिम्पिक्स! पृथ्वीतलावरचा मानवी सृजनाचा सर्वात मोठा उत्सव. जवळपास २८०० वर्षांचा इतिहास असलेली माणसाच्या प्रगतीच्या ध्यासाचं द्योतक ठरलेली स्पर्धा. ह्यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव नसता तर २४ जुलै ते ९ ऑगस्ट दरम्यान २०६ देशांचे ११ हजारपेक्षा जास्त खेळाडू ३३ खेळांतल्या ३३९ सुवर्णपदकांसाठी झुंजले असते. ऑलिम्पिक्स चळवळीचं ब्रीद "Citius, Altius, Fortius' म्हणजेच " Faster, Higher, Stronger" सार्थ ठरवण्यासाठी वर्षानुवर्षं जिवाचं रान करणार्‍या अ‍ॅथलीट्सनी बाजी लावली असती.

पहिली ऑलिम्पिक्स स्पर्धा ख्रिस्तपूर्व ७७६ साली झाल्याचा उल्लेख सापडतो. ख्रिस्तपूर्व ६८४ सालापासून ती एका दिवसावरून तीन दिवसांची झाली आणि इसवीसन पूर्व पाचव्या शतकात ती पाच दिवसांची केली गेली. सुरुवातीला पळण्याच्या शर्यती, लांब उडी, थाळीफेक, गोळाफेक, भालाफेक, बॉक्सिंग आणि घोडेस्वारीच्या स्पर्धा होत. मग काही वर्षात कुस्तीचा समावेश झाला. पहिली अनेक वर्षं ना देशांच्या रंगांची भानगड होती ना स्पॉन्सरशिपची. भीती आणि लाज वगैरे गोष्टी सुद्धा विशेष लोकप्रिय नव्हत्या. मग सगळॅ स्पर्धक नग्नावस्थेतच खेळायचे. आणि म्हणूनच स्त्रियांना ऑलिम्पिक्स स्पर्धा बघायला बंदी होती. इसवी सनाच्या चौथ्या शतकानंतर थिओडोसियस राजाने ऑलिम्पिक्सवर बंदी घातली.


ऑलिम्पिक्सचं पुनरुज्जीवन व्हायला १८९६ साल उजाडलं. त्याचं झालं असं की ओटोमन साम्राज्यापासून स्वतंत्र झाल्यावर पॅनाजिऑटिस सुस्टॉस ह्या कवीनी प्रथम ऑलिम्पिक्सच्या पुनरुत्थानाची कल्पना मांडली. ईव्हॅन्जेलऑस झॅप्पास ह्या गर्भश्रीमंत दानशूराने १८५९ ची ऑलिम्पिक्स स्पर्धा चक्क स्पॉन्सर केली. १५ निव्हेंबर १८५९ रोजी पहिली ऑलिम्पिक्स स्पर्धा अथेसमध्ये भरवली गेली. झॅप्पासने १८६५ मध्ये आपल्या निधनापूर्वी ऑलिम्पिक्स ट्रस्ट फंडला घसघशीत देणगी देखील दिली. १८७० ते १८९० पर्यंत ग्रीस मध्ये ऑलिम्पिक्स स्पर्धा भरत होत्या. १८९४ मध्ये आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची स्थापना झाली आणि ६ ते १५ एप्रिल १८९६ दरम्यान पहिल्या "modern olympic games" अथेन्समध्ये भरवल्या गेल्या.




अ‍ॅथलेटिक्स, सायकलिंग, तलवारबाजी, जिमनॅस्टिक्स, नौकानयन, नेमबाजी, स्विमिंग, टेनिस, वेटलिफ्टिंग आणि कुस्ती अश्या दहा क्रीडाप्रकारांत ही स्पर्धा भरवली गेली. James B. Connolly ह्याने "hop, skip, and jump" म्हणजे आताच्या ट्रिपल जम्प प्रकारात पहिलं चांदीचं पदक जिंकलं. तेव्हापासून १९१६, १९४० आणि १९४४ ही महायुद्धांची वर्षं वगळता ऑलिम्पिक्सचा हा महायज्ञ अव्याहत चालू आहे. 

Sport builds character म्हणतात ते उगाच नाही. लहानपणापासून कोणी कुठलाही खेळ (विशेषतः सांघिक) नियमित खेळत असेल तर त्याच्या व्यक्तिमत्त्वाला अनेक पैलू पडत जातात. कारण खेळ शिकणं म्हणजे फक्त त्या खेळात सरस ठरण्यासाठी लागणारी कौशल्य, तंत्र आत्मसात करणं नाही तर अजूनही खूप काही असतं. म्हणूनच खेळ हा केवळ शारीरिकदृष्ट्या सक्षमच नाही तर एक "सुसंस्कृत" नागरिक घडवतो. विश्वनाथन आनंद टोपालोवला हरवलं म्हणून त्याच्या बुद्धीचे वाभाडे काढत नाही..... मायकेल हसी त्याच्या ओपनर्सना "फेकल्यात ना विकेट.. आता बसा बोंबलत.. मी नाही खेळणार" असं म्हणत नाही... "तिज्यायला हा फेडरर लई उडून र्‍हायलाय...तंगडं मोडायला पायजे *%$चं" असा विचार नदाल करत नाही.... किंवा "तुमच्या डबक्याचं पाणी फारच गार आहे ब्वॉ... नीट पोहता येत नाही इथे" असं फेल्प्स म्हणाल्याचंही ऐकिवात नाही. खरा खेळाडू citius - altius - fortius, faster - higher - stronger ह्या एकाच ध्यासानी आपल्या खेळाडू धर्माचं पालन करत असतो.

Winning isn't everything; it's the only thing असं मानणार्‍या जीवतोड स्पर्धेच्या जगात सुद्धा ऑलिम्पिक्समध्ये आपल्या प्रतिस्पर्ध्याच्या खेळाचं कौतुक केलं जातं, मुष्टियुद्धाच्या लढतीनंतरही एकमेकांना अलिंगन दिलं जातं आणि फुटबोलमध्ये धक्कबुक्कीत खाली पडलेल्या प्रतिस्पर्ध्याला उठून उभं राहाण्यासाठी मदतीचा हात पुढे केला जातो. एकंदरच खेळ आणि खेळाडू ही आपल्या आयुष्यातली एक खूप पॉझिटिव्ह, खूप सकारात्मक, आनंद, उत्साह, उमेद देणारी गोष्ट आहे. खेळातलं कौशल्य आपल्या आयुष्यातल्या इतरही गोष्टींत दिसून येतं, खेळानी दिलेला आत्मविश्वास आपल्या प्रत्येक कामात दिसतो. ऑलिंपिक्सच्या उद्घाटनाच्या वेळी वेगवेगळ्या देशांच्या खेळाडूंच्या देहबोलीत किती फरक असतो! काही अगदी छोटे, पदक मिळायची जरादेखील आशा नसलेले 'सिएरा लिओन', होंडुरास वगैरे देशांचे खेळाडू "आपण इथपर्यंत पोहोचलोय" हा आनंद लपवू शकत नाहीत तर अमेरिका, चीन, जर्मनी, ऑस्ट्रेलियासारख्या देशांचे खेळाडू "आम्ही आलो आहोत ते जिंकण्यासाठीच" अश्या आत्मविश्वासात चालत असतात ! पण खेळ हीच एक अशी चीज आहे जी ह्या सगळ्यांना एका ध्येयासाठी, एका भावनेसाठी एकत्र आणते citius - altius - fortius ! आज युनायटेड नेशन्सचे १९२ सदस्य देश आहेत... इंटरनॅशनल ऑलिंपिक कमिटीचे २०६. कुठलीच बंधनं नसणार्‍या ऑलिम्पिक्स खेळांचं महत्व म्हणूनच अनन्यसाधारण आहे.


ऑलिम्पिक्सनी आपल्याला मानवाच्या शारिरिक क्षमतेला आणि कौशल्यालाच नाही तर खिलाडू वृत्तीला आणि सचोटीला नवीन परिमाण देणारे खेळाडू आणि मानवाच्या सृजनावरचा विश्वास दृढ करणारे क्षण दिले. अश्याच काही खेळाडू आणि खेळांच्या काही प्रेरणादायक, काही ह्र्द्य तर काही मजेदार आठवणी जागवूयात "ऑलिम्पिक्सच्या उदरातून" ह्या मालिकेत.

© - आशुतोष थत्ते