शनिवार, १३ फेब्रुवारी, २०२१

आमचा Valentine Week - मोठी तिची साऊली

तीरगी की अपनी ज़िद है जुगनुओं की अपनी ज़िद |
ठोकरों की अपनी ज़िद है हौसलों की अपनी ज़िद ||

- प्रबुद्ध सौरभ

महान व्यक्तीला चांगल्या व्यक्तीपासून वेगळं करणारा हा एकमेव गुण - जि़द! एखादी गोष्ट मिळवण्यासाठीचा हट्टीपणा. यश मिळत नाही तोपर्यंत प्रयत्न करण्याचा चिवटपणा. यश मिळवण्यासाठी वाटेल ते आव्हान स्वीकारण्याचं धाडस. महान लोकांची एक जमात असते ती संकटांच्या नजरेला नजर भिडवून त्याच्याशी दोन हात करणार्‍यांची. पण काही लोकं तर त्याही पुढे जाऊन आव्हानांसमोर, संकटांसमोर धैर्यानी सोडा.... उर्मटपणानी, माजात उभी राहतात. आणि त्यामागे केवळ त्यांची बेफिकिरी नसते तर असतो त्यांचा प्रचंड आत्मविश्वास.

त्रिपुरासारख्या "मागास" राज्यातून आलेली - मग काय झालं?
मुलगी असून स्पोर्ट्समध्ये? - मग काय झालं?
जिमनॅस्टिक्सला भारतात कोणी विचारतं का? - मग काय झालं?
floor exercise चं मॅट असमान आहे - मग काय झालं?
uneven bars च्या मधलं अंतर standard ८० सेंमी नाहिये - मग काय झालं?
Vaulting table च्या जागी कोचच्या स्कूटरचं मागचं सीट वापरावं लागतंय - मग काय झालं?

आणि अंगावर काटा आणणारं म्हणजे

Produnova Vault ला - vault of death म्हणतात - जीवही जाऊ शकतो -------- मग काय झालं??

फेडररची नजाकत आणि विश्वनाथन आनंदची गहराई जर आमचा क्रश असेल तर आमचा हा क्रश म्हणजे मूर्तिमंत जिद्द, हट्टीपणा आणि धैर्य आहे. ४ फूट ११ इंच उंचीची मोठ्या सावलीची लहान बाहुली - दीपा दुलाल कर्माकर!
Dipa

अडचणींचा सामना करणं सोडा - त्यांना भीकच घालायची नाही हा काय दर्जाचा उर्मटपणा म्हणायचा? कुठल्या मुशीतून ही बाहुली घडली आहे हे तिचा कर्ताचं जाणे. वयाच्या १४व्या वर्षी "तुम्ही माझ्याकडून नीट प्रॅक्टिस करून घेत नाही" म्हणून आपल्या प्रशिक्षकानाच फैलावर धरणारी दीपा २००७ च्या ज्युनियर राष्ट्रीय स्पर्धेत ३ सुवर्ण आणि २ रौप्य पदकं जिंकली. २०११ च्या सीनियर नॅशनल्समध्ये तब्बल ५ सुवर्णपदकं मिळवून निर्विवादपणे भारताची सर्वोत्तम जिमनॅस्ट ठरली.

२०१४ च्या कॉमनवेल्थ खेळांमध्ये ब्रॉन्झ जिंकणारी दीपा पहिली भारतीय महिला जिमनॅस्ट. एशियन गेम्सला चौथी आली आणि त्याच वर्षी हिरोशिमा एशियन चॅम्पियनशिप्समध्ये तिने पुन्हा ब्रॉन्झ जिंकलं. २०१५ च्या वर्ल्ड चॅम्पियनशिप्समध्ये पात्र ठरणारी पहिली भारतीय ठरलेली दीपा पाचवी आली.

२०१६ रियो ऑलिम्पिक्सच्या पात्रता फेरीत ती राखीव खेळाडू होती. २४ खेळाडू पात्र ठरलेले आणि दीपा २६ वी. पण मार्चमध्ये कळालं की एका रशियन आणि एका कोरियन जिमनॅस्टनी माघार घेतल्यामुळे तिला रियोसाठी टेस्ट देण्याची संधी होती. आता तर ही मूर्तिमंत जिद्द इरेलाच पेटली. २३ दिवस आगरतळाच्या गैरसोयींकडे सोयिस्कररित्या दुर्लक्ष करत रात्रीचा दिवस करून तिने मेहनत घेतली आणि टेस्ट साठी रियोत दाखल झाली. तिथे ती केवळ क्वालिफाय झाली असं नाही तर २४ जिमनॅस्ट्समध्ये ७ वी आली.

७ ऑगस्ट २०१६ ला खुद्द ऑलिम्पिक्सच्या पहिल्या फेरीत ती ८ व्या क्रमांकावर अंतिम फेरीसाठी पात्र ठरली. आणि १४ ऑगस्ट २०१६ रोजी रियो - दि - जानेरो मध्ये घडला तो इतिहास!

रियोमध्ये अजूनही भारताचं पदकांचं खातं उघडलं नव्हतं. आपले शूटर्स, बॉक्सर्स, कुस्तिगीर, बॅडमिंटनपटू - सगळ्यांनाच ते ऑलिम्पिक पदक हुलकावणी देत होतं. आपली मदार होती आपल्या मुलींवर - पी.व्ही. सिंधू, साक्षी मलिक आणि ऑलिम्पिक्समध्ये खेळणारी पहिली भारतीय जिमनॅस्ट दीपा कर्माकर. १४ ऑगस्टच्या रात्री पूर्ण भारत जागा होता - आणि कुठल्या क्रिकेटपटूसाठी नाही तर जिमनॅस्टिक्ससारख्या खेळात भारताचा तिरंगा फडकवणार्‍याअ दीपासाठी. "अभी नहीं तो कभी नहीं" म्हणत दीपाने जीवघेण्या Produnova Vault ला हात घातला. Produnova - दीपाच्या आधी मोजून ४ जिमनॅस्ट्सनी यशस्वी केलेला एक अत्यंत थरारक व्हॉल्ट. ६.४ चा difficulty score असलेला अत्यंत अवघड, धोकादायक आणि जोखमीचा प्रकार.

पूर्ण देश श्वास रोखून बघत होता.... देशाला जिमनॅस्टिक्समधल पहिलं ऑलिम्पिक मेडल मिळवून देण्यासाठी जीव धोक्यात घालून दीपाने व्हॉल्टिंग टेबलकडे धाव घेतली. अक्षरशः जिवावर उदार होऊन तिने Produnova यशस्वीपणे पूर्ण केला. थोडे गुण लेग स्विंगमध्ये गेले... थोडे डीप लॅन्डिंग झाल्यामुळे. तिचं ऑलिम्पिक पदक अवघ्या ०.१५ गुणांनी हुकलं! ज्यासाठी आजवर रक्त आटवलं होतं ते स्वप्न थोडक्यासाठी अपूर्ण राहिलं होतं. दीपा जवळपास पाऊण - एक तास धाय मोकलून रडली. आणि मग कोच बिस्वेस्वर नंदीना म्हणाली "मला भूक लागलीये - मॅक्डोनल्ड्समध्ये जाऊया?"

इथे अवघा भारत - आणि भारतच का... जिमनॅस्टिक्सचा अजिबात इतिहास नसताना भारतासारख्या सोयी-सुविधा, मार्गदर्शन आणि त्याहीपेक्षा जिमनॅस्टिक्सचं बिलकुल आकर्षण नसलेल्या देशातल्या एका उगवत्या तारकेकडे खूप आशेने डोळे लावून बसलेला जगातला प्रत्येक क्रीडारसिक हळहळला. तिचं पदक हे कित्येक देशांमधल्या कित्येक मुला-मुलींना अपार प्रेरणा देऊन गेलं असतं.

पण अपयशाला भीक घालेल तर ती दीपा कर्माकर कुठली? तिने ह्या अपयशाला पुन्हा तोच प्रश्न विचारला जी ती कायमच अडचणींना आणि प्रतिकूल परिस्थितीला विचारत आली आहे - मग काय झालं? आणि भारतीय मुलीने ऑलिम्पिक्स जिमनॅस्टिक्समध्ये चौथं येणं हे अपयश थोडीच होतं? आज भारतातली कित्येक चिमुरडी मुलं-मुली एक दिवस दीपा कर्माकरसारखं व्हायचं स्वप्न बघायला लागली असतील हे यश कुठल्याही मेडलपेक्षा कितीतरी मोठं आहे.

दीपा आज २७ वर्षांची आहे. आंतरराष्ट्रीय जिमनॅस्टिक्समध्ये जिथे मुलींची जेमतेम ५-६ वर्षांची कारकीर्द वयाच्या १८-१९ व्या वर्षी संपते - तिथे २७ व्या वर्षी टोक्यो ऑलिम्पिक्सच्या मेडल पोडियमवर नजर ठेऊन मेहनत करणं बाकी लोकांसाठी अद्भुत, असामान्य, अशक्य गोष्ट असेल - पण आमच्या ह्या क्रश साठी एक साधा सोपा प्रश्न आहे - मग काय झालं?

© - आशुतोष थत्ते

बुधवार, १० फेब्रुवारी, २०२१

आमचा Valentine Week - आँखोंकी गहराइयाँ |

 इश्क़ पर ज़ोर नहीं है ये वो आतिश 'ग़ालिब' 

कि लगाए न लगे और बुझाए न बने | 

.

.

.

म्हणजे नक्की काय हे खरंतर आपल्यातल्या निम्म्या होऊन जास्त लोकांना कळालेलं नसतं. काही लोकं तर हा शेर ऐकून 3 idiots मधल्या प्रोफेसर सारखा "अरे कहना क्या चाहते हो?" असा चेहरा देखील करतात. पण एक तर 'ग़ालिब' आहे आणि इश्क सुद्धा आहे म्हणजेच काहीतरी जोरदार काम असणार इतकं आपल्याला कळतंच की. ऐकायला भारी वाटतंय, "दिल से" मधली काळ्या - पांढर्‍या कपड्यांत नाचणारी मनीषा कोईराला आठवतीये - वाईट काय त्यात? चांगलंच आहे की.


आणि कळत अथवा झेपत नसलेल्या गोष्टी आवडू नयेत असं थोडंच आहे? आता नाही आम्हाला चेस मधलं काही कळत. पण म्हणून बुद्धिबळ आवडू नये असं थोडंच आहे? लोकं तासनतास एका जागी बसून, चौकोनी चेह्ररे करून त्या बोर्डावर नक्की काय गडबड करतात ते बघावंच एकदा म्हणून त्या ६४ घरांच्या खेळाबद्दल कुतुहल निर्माण झालं. आणि वेगवेगळ्या मोहर्‍यांच्या चाली कळेपर्यंत मजल गेली. त्यात लहानपणी सकाळ मध्ये रघुनंदन गोखले अतिशय मनोरंजक समीक्षा लिहायचे. "कामस्कीच्या रे लोपेझला कार्पोवने क्वीन्स गॅम्बिटचे चोख प्रत्युत्तर दिले", "स्पास्कीने कारो-कान ची भक्कम तटबंदी उभारली", "गेलफंडने डाव्या फळीतून घुसून पांढर्‍या मोहर्‍यांची कत्तल करायला सुरुवात केली" असलं जबरदस्त वर्णन वाचून त्या पटावर खरोखरचं युद्ध सुरु असल्याचा भास व्हायचा. सिसीलियन डिफेन्स, किंग्ज इंडियन डिफेन्स, तोर्रे अ‍ॅटॅक, नाजदॉर्फ इंग्लिश अ‍ॅटॅक वगैरे नावं ऐकायला जाम भारी वाटायची. 

ह्याच वर्णनात वाहवत जाऊन कॉलेजमध्ये असताना आमच्या सुई, तार्‍या, गिगो वगैरे मित्रमंडळींना त्यांच्या मॅचेसच्या वेळी cheer करायला गेलो आणि दलेर मेहेंदीची कॉन्सर्ट समजून जावं आणि धृपद गायनाची मैफल निघावी तसं झालं. छ्या! इतकं गांभीर्य आपल्याला नाही झेपत. आणि पुन्हा इतका वेळ विचार करायचा? वर त्याला विरंगुळा, खेळ म्हणायचं? इथे आपला attention span इंजीनियरिंगच्या परीक्षेत कधी १० मिनिटांवर नाही गेला. तेवीस मिनिटांपेक्षा जास्त बूड एका जागी टिकत नाही हे उमगलं - तसा पौगंडावस्थेतील बहुतेक प्रेमप्रकरणांसारखा आमच्या ह्या क्रशचा देखील चक्काचूर झाला. आणि "ज्याला राजा actually मरण्यापूर्वीच तो मरणार हे कळतं - आणि जो आपला राजा आडवा करून शरणागती पत्करतो - तो भारी चेस प्लेयर" असा एक सोपा समज करून घेऊन आम्ही बुद्धिबळाला अलविदा केला.

जरी बुद्धिबळाशी सूत जमवण्याची शक्यता नाहीशी झाली तरी तोपर्यंत एक नाव हा क्रश निदान आठवणीत कायम राहील ह्याची खात्री देत होतं - "विश्वनाथन आनंद."

भारताचा सर्वांत तरुण "इंटरनॅशनल मास्टर" आणि पहिला वहिला "ग्रॅन्डमास्टर." साक्षात कार्पोव, कास्पारोव, कामस्की, क्रामनिक, मायकल अ‍ॅडम्स, टोपालोव सारख्या दिग्गजांच्या नजरेला नजर आणि बुद्धीला बुद्धी भिडवणारा "आपला" माणूस. दीड हजार वर्षांपूर्वी त्याच्याच परिसरातून एका महान दार्शनिकानी आसेतु हिमाचल फिरून सनातन धर्माची भारताला पुन्हा ओळख करून दिली होती. तद्वतच हिंदुस्थानात जन्मलेल्या खेळाची हिंदुस्थानाला पुन्हा ओळख करून दिली - ते स्फुल्लिंग पुन्हा चेतवलं ते विश्वनाथन आनंदने.

आनंदनी भारतात बुद्धिबळाचा एका अर्थी जागर केला. Candidates Tournament, FIDE cycle, PCA World Chess Championship, FIDE World Chess Championship... आनंद एकापाठोपाठ एक शिखरं पादाक्रांत करत गेला. काल मनिला मध्ये काय झालं? लिनारेसला माहौल कसा असेल? यंदा Wiijk aan Zee कधी? Dortmund चा ड्रॉ कसा लागतोय? अशी उत्सुकता पहिल्यांदा जागवली ती आनंदने. भारतीय खेळात भारताचा झेंडा जगभर फडकवत ठेवला तो आनंदने.

Rapid chess चा बादशहा, तब्बल सात वर्षं FIDE चा विश्वविजेता, पद्मभूषण पुरस्कार दिला जाणारा पहिला खेळाडू आणि सर्वांत महत्वाचं म्हणजे अगणित मुला-मुलींना बुद्धिबळाचं वेड लावणारा स्फूर्तिस्तंभ - विश्वनाथन आनंद.

१९८७ मध्ये आनंद ग्रॅन्डमास्टर झाल्यावर दिव्येंदू बरुआ, प्रवीण ठिपसे, शशिकिरण कृष्णन, हरिकृष्णा, कोनेरू हंपी असा भारतीय ग्रॅन्डमास्टर्सचा जो धडाका सुरू झाला तो ह्या वर्षी १४ वर्षांच्या लिऑन मेंडोन्सापर्यंत चालू आहे. गेल्या ३४ वर्षांत भारताने जगाला ६७ ग्रॅन्डमास्टर्स दिले आहेत आणि ह्याची मुहूर्तमेढ रोवली ती विश्वनाथन आनंद ने.

त्याहीपेक्षा मोठी गोष्ट त्याने केली ती म्हणजे आमच्या क्रिकेटप्रेमात आंधळ्या झालेल्या देशाला एक वेगळा हीरो दिला. बुद्धीमान असण्याला - अभ्यासू / घासू असण्याला, स्कॉलर असण्याला ग्लॅमर दिलं! बुद्धिबळपटूंच्या ४-५ पिढ्या आनंदला बघत, त्याच्याशी एक दिवस खेळण्याचं स्वप्न उराशी घेऊन मोठ्या झाल्या आहेत हा त्याच्या प्रदीर्घ कारकीर्दीला भारताने केलेला सलाम आहे. बुद्धिबळ हा अत्यंत क्लिष्ट, कठीण आणि चिकाटीचा अंत पाहणारा खेळ आहे आणि भारताच्या बौद्धिक संपदेला ह्यापेक्षा तगडं आव्हान ते कोणतं? All India Chess Federation च्या कॅलेंडरवर वर्षभरात तब्बल ९२ अधिकृत स्पर्धा आहेत आणि त्यांना स्पर्धकांचा उदंड प्रतिसाद मिळतो आहे ह्यात कुठेतरी सिंहाचा वाटा मद्रासच्या ह्या कलंदराचा आहे.

"एक दूजे के लिये" आठवतोय? एकमेकांची भाषा कळत नसताना वासू आणि सपना आकंठ प्रेमात बुडतात. विश्वनाथन आनंदवर क्रश व्हायला बुद्धिबळ कशाला कळायला पाहिजे? आपण तर पांढरा पहिली मूव्ह करतानाच्या त्याच्या चेहर्‍यावर  दिसणार्‍या समुद्राच्या गांभीर्याच्या आणि नजरेतल्या अस्मानी खोलीच्या प्रेमात आहोत. 

समुद्राची खोली कळण्यासाठी scuba dive करण्याची गरज नसते. त्याच्या धीर-गंभीर गाजेवरूनच तिचा अंदाज येतो. आणि बुद्धिबळाची क्लिष्टता कळण्यासाठी तो खेळण्याची गरज नसते. विश्वनाथन आनंदच्या डोळ्यांतलं गहन गांभीर्य पुरेसं असतं.



© - आशुतोष थत्ते

सोमवार, ८ फेब्रुवारी, २०२१

आमचा Valentine Week - क्रशामि क्रशावः क्रशामः

 C - R - U - S - H - CRUSH

ज्या काही थोड्याफार भाषा कळतात / समजतात किंवा आवडतात त्यामध्ये इंग्रजी Crush ला समर्पक समानार्थी शब्दच सापडत नाही हो. आमची मराठी मुळातच रांगडी आणि इरसाल. Crush च्या नाजुकपणाला इथे जागा कमीच. संस्कृत ही साक्षात देववाणी. तिथे Crush मधली अगतिकता नाही. हिंदी मध्ये Crush मधला छिछोरपणा नाही. उर्दू Crush सारख्या अर्धवट गोष्टींमध्ये इंटरेस्टच घेत नाही. तिथे म्हणजे एकदम तबाही का मंजर - आग का दर्या है और डूब जाना है वगैरे मयखान्यातला सीन. पंजाबीत "मर जावां गुड खाके" असलं तरी Crush मधलं अव्यक्त राहणं पंजाबीला मंजूर नाही. आपल्या इतर भाषांची परिस्थिते काही फार वेगळी असण्याची अपेक्षा नाही.
थोडक्यात काय, इंग्रजीत जशी "ओवाळणे" ही कन्सेप्टच नाही तशी आपल्याकडे Crush हे प्रकरण नाही. पण आम्हाला इंग्रजी चहा आणि क्रिकेटची सवय लागली तशी ह्या इंग्रजी Crush ची पण बाधा झाली. पण मुळात पिंड पहिलवानीच. तेव्हा आमचे Crush देखील भलतेच. "तीव्र मध्यम", "कोमल रिषभ आसावरी", "बिलासखानी तोडी" वगैरे ऐकल्यावर एखाद्या क्लासिकलवाल्याच्या चेहर्यावर जशी "मीठी टीस सुहानी" उमटतते, तशीच काहीशी वेदना आम्हाला drag flick, slam dunk, inswinging yorker वगैरे आठवल्यावर होते.
Valentine's week च्या निमित्तानं आमच्या काही क्रशेसची ही उजळणी.
आमचा पहिला क्रश म्हणजे साक्षात Poetry in Motion. परिकथेतला राजकुमार.
कितीही महान खेळाडू असो - मुहंमद अली, नादिया कोमानेच, बोल्ट, तेंडुलकर, नदाल, मायकल जॉर्डन, ब्रॅडमन - कोणीही घ्या. त्यांच्या बाबतीत त्यांचं मनुष्यत्व दाखवणारी एखादी तरी गोष्ट असते. पण रॉजर रॉबर्ट फेडरर ह्या विभूतीला कष्ट, अपयश, गरीबी, नैराश्य असल्या गोष्टी शिवत असतील असं वाटतच नाही. "मधुराधिपते अखिलम मधुरम" तसं ह्याचं सगळंच दैवी. जन्म देखील भूलोकीच्या स्वर्गातला - स्वित्झर्लंड मधला. स्विस जर्मन, जर्मन, इंग्लिश, फ्रेंच, इटालियन, स्वीडिश आणि मोडकी-तोडकी का होईना - स्पॅनिश अश्या भाषा ह्याला येतात. मिर्कावहिनींसारखी गोड, साधी, सालस जोडीदार - दोन जुळ्या मुली आणि दोन जुळी मुलं असं दृष्ट लागण्यासारखं षटकोनी कुटुंब. पैसा, प्रतिष्ठा, प्रसिद्धी. ह्याच्या बाबतीत सुखाचे सगळे चेक बॉक्सेस टिक झाल्यासारखे दिसतात.
पण ह्या सगळ्या "पिक्चर पर्फेक्ट" चित्रातला सगळ्यात महत्वाचा पैलू म्हणजे त्याची खेळातली सहजता. टेनिस सारखा वेगवान, ताकदीचा, अॅथलेटिक खेळ सुद्धा ह्याच्यासमोर सोपा होतो की काय अशी शंका येते. इतर लोकं कोर्ट "कव्हर" करतात - हा कोर्टवर विहरत असतो. बाकीचे जीव तोडून धावतात - ह्याचा रथ pre - नरोवा कुंजरोवा धर्मराजासारखा जमिनीच्या वरून दोन अंगुळे फिरत असतो. बाकीचे दात ओठ खाऊन पूर्ण ताकदीनिशी बॉलवर तुटून पडतात - हा चित्रकारानी कॅनव्हासवर ब्रश फिरवावा तसा रॅकेट फिरवतो. इतर खेळाडू यशाच्या उन्मादात, अपयशाच्या नैराश्यात गर्जना करतात, ओरडतात - हा यशात उजवी मूठ दोन वेळा हलवणे आणि अपयशात दोन्ही हात कमरेवर ठेवणे ह्यापलिकडे काही जात नाही.
जमाना हुस्न नजाकत बला जफा शोखी |
सिमटके आ गये सब आपकी अदाओंमें ||
म्हणावंसं वाटावं इतकं आकर्षक टेनिस. आणि त्यात त्याचा तो single handed backhand. C - R - U - S - H - CRUSH.



एक तर आता टेनिस हा इतका आक्रमक आणि ताकदीचा खेळ झालाय की single handed backhand म्हणजे सोज्वळ दिसणार्या सनी लियोन इतकं दुरापास्त झालंय. हा मुळातच अतिशय majestic - राजेशाही फटका. महाभारतात ब्रह्मास्त्र जसं निवडकच योद्ध्यांना अवगत होतं तसं हा फटका भात्यात असणारे वीर खूप कमी. आणि majestic गोष्टीवर फेडररपेक्षा जास्त अधिकार कोणाचा असणार? त्यात फेडररच्या बॅकहॅन्डमधली सहजता, तो मूर्तीमंत डौल, ती ग्रेस, ते राजसि व्यक्तिमत्व, तो ठहराव म्हणजे एखादी कसलेली कथक नृत्यांगना अवधड आवर्तन पूर्ण करून सहजपणे समेवर यावी तसा अपार नेत्रसुख देऊन जातो. असं म्हणतात की simplicity is the ultimate sophistication. त्या बॅकहँडमागच्या वेगाची, ग्रिपचा बदल, रॅकेटचा अँगल, मनगटातली ताकद, फटक्याची दिशा ह्या सार्या गणिती गोष्टींची जाणीवही न होणं आणि तो फटका अतिशय साधा सरळ सोपा वाटणं ह्यातच सगळं आलं. त्या फटक्याची उपयोगिता, परिणामकारकता, सयुक्तिकता, अचूकता वगैरे प्रकार तिथे गौण ठरतात. एकदा का Crush असला की आपण त्याला / तिला भुगोलात किती मार्कं होते विचारतो का? तसंच हे पण. आपण फक्त त्या Crush चा आस्वाद घ्यायचा आणि "क्या बात है" म्हणायचं.
© - आशुतोष थत्ते
९ फेब्रुवारी २०२१

शनिवार, ६ फेब्रुवारी, २०२१

We'll never die!

 ६ फेब्रुवारी १९५८ ....दुपारी ठीक ३ वाजून ४ मिनिटं.

अशी एक घटना घडली की आख्खं जग हादरलं. युरोपियन कपच्या उपांत्यपूर्व फेरीत Red Star Belgrade ला त्यांच्या मैदानावर हरवून परतत असताना मँचेस्टर युनायटेड संघाला घेऊन जाणारं विमान म्यूनिच विमानतळावर धावपट्टीवरून घसरून अपघातग्रस्त झालं.  डंकन एडवर्ड्स, मार्क जोन्स, जेफ बेन्ट, टॉमी टेलर, एडी कोलमनसारख्या आठ हरहुन्नरी - गुणी खेळाडूंचा नियतीनी घास घेतला. सचिव वॉल्टर क्रिकमार, व्यवस्थापक टॉम करी आणि बर्ट व्हेली, काही पत्रकार असे २३ जण मारले गेले. डेनिस व्हायोलेट, बॉबी चार्लटन आणि खुद्द मॅट बस्बीसारखे अनेक जखमी झाले. जॉन बेरी आणि जॅकी ब्लांकफ्लॉवर सारखे खेळाडू पुन्हा कधी खेळू शकणार नव्हते. 



एखादा क्लब, एखादी संस्था ही जर का एक व्यक्ती मानली तर आयुष्यभर अपंगत्व आणणारा हा अपघात होता. कणा मोडणारा. काळजावर आघात करणारा. पण माणसाची जिद्द काय चमत्कार घडवू शकते ह्याची आपण कमी उदाहरणं बघतो का?

१८७८ साली जन्मलेल्या मॅन यू नी आजवर काही कमी हाल सोसले नव्हते. १९०२ मध्ये क्लब कर्जबाजारी झाला होता. ११ मार्च १९४१ रोजी जर्मन बाँबहल्ल्यात "ओल्ड ट्रॅफर्ड" जमीनदोस्त झालं होतं. मॅट बस्बीने अश्रू, घाम आणि रक्त एकत्र करून संघ पुन्हा घडवला होता. पण १९५८ चा हा धक्का पचवणं खरंच कठिण होतं. "शो मस्ट गो ऑन" म्हणत त्यांनी त्यावर्षी लीगच्या १४ मॅचेस खेळल्या, पण एकच जिंकू शकले. हा "दुबळा" संघसुद्धा त्या वर्षी FA Cup च्या फायनल्समध्ये धडक मारून आला. तरी त्या अपघाताच्या धक्क्यातून संघ सावरला नव्हता.

पण खेळ तुम्हाला वाटेल ते अपयश, वाटेल ते धक्के सहन करण्याची शक्ती देतो. क्षेत्र कुठलंही असो, खरा चॅम्पियन संकटाना "तू हमें काटनेकी सजा पाएगा" म्हणत त्वेषानी शिंगावर घेतो. अपयशाच्या नजरेला नजर भिडवून विजयाची गर्जना करतो. आणि मॅन यू हा तर चॅम्पियन खेळाडूंचा चॅम्पियन संघ !



५९ साली एक दिवस ओल्ड ट्रॅफर्डच्या दारात एक कॅडिलॅक थांबली. दरवाजा उघडला गेला आणि खुद्द मृत्युशी दोन हात करणारा मॅट बस्बी दोन कुबड्यांच्या साहाय्यानी उभा राहिला.... काही मिनिटांत डेनिस व्हायोलेट आला... बॉब चार्ल्टन आला....सहाय्यक व्यवस्थापक जिमी मर्फी आला. आणि पोरं पुन्हा कामाला लागली. फाटलेलं आभाळ पुन्हा शिवायला लागली. डेनिस लॉ, जॉर्ज बेस्टसारख्या अफाट टॅलेंटेड खेळाडूंना करारबद्ध करण्यात आलं. पुन्हा नव्या जोमानं प्रॅक्टिसला सुरुवात झाली. असं म्हणतात की संकटं माणसांना जवळ आणतात. त्या एका घटनेनं सगळ्या संघालाच नाही तर हजारो.. लाखो पाठिराख्यांना, चाहत्यांना जवळ आणलं . "मँचेस्टर युनायटेड" हा आता केवळ एक फुटबॉल क्लब उरला नाही. "मॅन यू" आता जिद्दीनी लढणार्‍यांचं, शुन्यातून जग उभं करू पाहणार्‍यांचं, संकटांच्या छाताडावर पाय देऊन पराक्रमाचा झेंडा रोवणार्‍यांचं मंदिर झालं !

एक एक काडी गोळा करत पुन्हा उध्वस्त घरटं बांधायला सुरुवात झाली. चार्ल्टन, लॉ आणि बेस्टचं अफाट त्रिकूट जमून आलं. प्रतिस्पर्ध्याचा बचाव फासळ्यांसारखा कापत जाणारे रेड डेव्हिल्स पुन्हा इंग्लिश आणि युरोपियन फुटबॉल गाजवू लागले. "बस्बी बेब्ज"नी ६३ चा FA Cup जिंकला, ६५ आणि ६७ साली लीग जिंकली आणि ६८ मध्ये Benfica ला हरवून युरोपियन कप जिंकणारा पहिला इंग्लिश संघ हा मानही मिळवला. ह्या अदभुत प्रवासाचा शिल्पकार मॅट बस्बी ६९ मध्ये संघव्यवस्थापक म्हणून निवृत्त झाला आणि क्लबचा जनरल मॅनेजर झाला. 



अनेक चढ उतार बघत ८६ - ८७ च्या मोसमाच्या ऐन मध्यात पुन्हा रेलेगेशनची शक्यता दिसत असतानाच अ‍ॅटकिन्सनच्या जागी अ‍ॅलेक्स फर्ग्युसन ह्या अ‍ॅबरडीनच्या व्यवस्थापकाची नियुक्ती करण्यात आली. अ‍ॅलेक्सनी त्या मोसमात मॅन यू ला १९ व्या स्थानावरून ११ व्या स्थानापर्यंत आणलं. क्लबवर त्याची मांड बसायला काही काळ गेला खरा. पण १९९३ चा मोसम जिंकल्यावर मॅन यू चा जो धडाका चालू आहे तो आजपर्यंत. त्याच काळात अ‍ॅलेक्स फर्ग्युसन... माफ करा - "सर अ‍ॅलेक्स फर्ग्युसन" च्या हातात गॅरी पॅलिस्टर, रायन गिग्ज, डेव्हिड बेकहम आणि पीटर श्मायकलसारखे हिरे गवसले जे पुढे बरीच वर्षं मॅन यू चे आधारस्तंभ ठरले. २०१३ साली तब्बल २७ वर्षांच्या मॅन यू कारकीर्दीनंतर सर अ‍ॅलेक्स रिटायर झाले.

प्रीमियर लीग, लीग कप, चँपियन्स लीग, कम्यूनिटी शील्ड, फिफाचा क्लब फुटबॉलचा विश्वचषक... मॅन यू नी फुटबॉलमधली प्रत्येक प्रतिष्ठेची स्पर्धा जिंकलेली आहे. आज क्लबचं मूल्य जवळपास २ अब्ज डॉलर्स आहे. २४ देशांमध्ये त्यांच्या पाठिराख्यांचे २०० पेक्षा अधिक अधिकृत सपोर्ट क्लब्ज आहेत. काही कंपन्यांच्या अंदाजाप्रमाणे त्यांचे जगभरात ३० कोटींपेक्षा जास्त चाहते आहेत. आजही प्रीमियर लीगच्या त्यांच्या सामन्यांच्या प्रेक्षकांच्या उपस्थितीचे आकडे इतरांचे डोळे फिरवतात. फेसबुकवर त्यांचे जवळपास दोन कोटी चाहते आहेत. यांचे पाठिराखे आपल्या लाल टीशर्ट्सवर गेल्या १९७१ पासून बाळगलेला "क्रेस्ट" छातीवर अभिमानाने मिरवत आहेत. एक व्यावसायिक फुटबॉल संघ म्हणून मॅन यू कडे जगातला प्रत्येक मान, सन्मान, मरातब आहे... प्रचंड पैसा आहे आणि पाठिंबाही ! 



संगीतात जे स्थान "हार्मनीचं" तेच आमच्या खेळांत "टीमवर्कचं". वेगवेगळ्या सप्तकांमध्ये जेव्हा वेगवेगळ्या "टोन्स"चे सूर एकत्र येतात तेव्हा निर्माण होणारं नादब्रह्म आणि वेगवेगळी कौशल्यं घेऊन, वेगवेगळ्या "टॅलेन्ट" आणि "टेंपरामेंट"चे खेळाडू एकत्र येतात तेव्हा निर्माण होणारं सळसळतं चैतन्य ह्यात फरक तो काय? गायकानी समेवर येताना तबलजीकडे "ये बात है।" म्हणत टाकलेली नजर आणि स्ट्रायकरनी बॉल नेटमध्ये ढकलता ढकलता मिडफील्डरच्या पासला दिलेली दाद हे सारखेच की ! डग्ग्याच्या नादावर गायकाच्या सुरांशी एकरूप होणारा कसलेला साथीदार तबलावादक आणि आपल्या आक्रमकांची ताकद ओळखून त्यांना "फीड्स" देणारा व्हॉलिबॉलचा "सेटर" ह्या दोघांची जातकुळी एकच ! 

पण खेळ हा संगीतासारखाच कोण्या एका माणसाच्या करिश्म्यावर थोडेच चालतो? गीतरामायणात फक्त बाबूजी किंवा फक्त गदिमा असते तर? बासू चक्रवर्ती, मारुती कीर, मनोहारी सिंग, लूई बँक्स, केर्सी लॉर्ड ह्यांच्याशिवाय आर.डी. बर्मनच्या संगीताची कल्पना तरी करता येईल का? पॉल मॅकार्टनी, जॉर्ज हॅरिसन, जॉन लेनन किंवा रिंगो स्टार ह्यांच्यापैकी एकालाही बाजूला ठेऊन "बीटल्स" डोळ्यासमोर येऊ शकतील?

आपल्या नशिबानी अनेक वेळा असे "एकसे बढकर एक" खेळिये एकत्र आले आणि आपल्या सांघिक खेळानी त्यांनी जग जिंकलं. न्यूझीलंडची "ऑल ब्लॅक्स" रग्बी टीम, १९९६ - २००८ पर्यंतचा ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ, ८० च्या दशकातला विंडीजचा संघ, अमेरिकेची बार्सिलोना ऑलिम्पिक्सची बास्केटबॉलची "ड्रीम टीम", ५० च्या दशकातली रेयाल माद्रिद, ७० च्या दशकातली ब्राझीलची फुटबॉल टीम, यँकीज, लेकर्स, बुल्सचे संघ.... अगणित असे संघ आहेत ज्यांनी त्या त्या खेळाला नव्या उंचीवर नेऊन ठेवलं. 

मँचेस्टर युनायटेड हे त्यातलं एक अग्रगण्य नाव.

आपल्याकडे "वास्तुपुरुष" ही संकल्पना आहे. प्रत्येक वास्तुला आपलं असं एक व्यक्तिमत्व असतं म्हणतात. आपले गड-कोट महाराजांच्या पराक्रमाच्या कथा सांगतात तर नवी अपार्टमेंट्स त्यात राहणार्‍या कारकुनांच्या व्यथा ! संध्याकाळी कधी शनिवारवाड्यात गेलात तर तो नुकतीच पगडी काढून शेंडीची गाठ सोडलेला वयस्कर पण तेजःपुंज चेहरा तुम्हाला त्याचा इतिहास सांगतो. गारद्यांच्या गर्दीत सापडलेल्या नारायणरावांचा "काका मला वाचवा" असा आक्रोश कानांवर येतो. महादरवाज्यावर सोसाट्याच्या वार्‍यात छातीचा कोट करून, भक्कम पाय रोवून, हातात नंगी तलवार घेऊन आणि पाठीला ढाल बांधून आपल्या आकडेबाज मिशांना पीळ देणारा रायगड बघितला आहात कधी? पहाटे पावणेतीन वाजता सी एस टी वरच्या शांततेत कधी बग्गीच्या टापांचा आवाज ऐकू आलाय तुम्हाला? बालगंधर्व रंगमंदिरात नाटक बघायला शिरताना अवचित अत्तराचा शिडकावा झाल्याचा भास झालाय कधी तुम्हाला? 

ह्याच वास्तुपुरुषांसारखं जर मँचेस्टर युनायटेड फुटबॉल क्लबचं काही व्यक्तिमत्त्व असेल तर ते अस्सल रांगड्या इंग्लिशमनचं आहे. ह्याचे हात कोणे काळी शेतात राबून राठ झालेले असले तरी त्याचे कपडे स्वच्छ आहेत. सूट खुंटीवर लटकवलेला आहे.. टायची गाठ सैल आहे... ताठ कणा, भरदार छाती, मजबूत खांद्यांचा हा उंचापुरा गडी आहे. हातांत त्याची आवडती बियर आहे. तोंडात पाईप आहे...खुरटी सोनेरी दाढी आहे.. चेहर्‍यावर बाssssरिक लाल - तांबूस ठिपके आहेत, निळे - विलक्षण बोलके डोळे आहेत. त्यांमध्ये अगदी लहान मुलाची निरागसता आहे.. ओठांवर स्मित आहे. फुटबॉलवर याचं निरतिशय प्रेम आहे. ज्यो स्पेन्स, बॉब चार्लटन, जॉर्ज बेस्ट ही त्याची दैवतं आहेत...आर्थर अ‍ॅलबिस्टन, ब्रायन रॉबसन, एरिक कँतोनाच्या कथा तो रंगवून रंगवून सांगतो...रॉय कीन, निकि बट, बेकहम, पॉल श्कोल्स, वेन रूनीचे दिवस आठवून तो "गेले ते दिन गेले" म्हणत उसासे टाकतो...डेव्हिड डी जिया, हुआन माता, पॉल पॉग्बासारख्या खेळाडूंचा "the new kids on the block" असा उल्लेख करताना त्याच्या डोळ्यांतून कौतुक ओसंडून वाहत असतं. प्रचंड पैसा आणि मानसन्मान असतानादेखील ह्याने आपली मूल्य, आपली "रूट्स" जपलेली आहेत. आणि म्हणूनच मॅन यू... द मँचेस्टर युनायटेड फुटबॉल क्लब आमच्यासाठी केवळ एक संघ नाही... आमचं आयुष्य अजून समृद्ध करणारा एक खेळिया आहे ! 

© आशुतोष थत्ते

६ फेब्रुवारी २०२१