संदर्भांच्या शोधात
आज बरोब्बर दोन महिने झाले पांढर्यावर काळं करून. किंबहुना व्यक्त होण्यासाठी विषयच सापडत नव्हता. आजकालची परिस्थिती बघता "किंबहुना" या एका शब्दावर एक लेखमाला लिहिली जाऊ शकेल हा भाग अलाहिदा!
बहुतेक वेळा मी क्रिकेट आणि इतर खेळांबद्दल लिहितो कारण खेळांमधली सकारात्मक ऊर्जा मला भावते. पण सध्या चालू असलेल्या क्रिकेटचा देखील काही संदर्भ लागत नाही हो. आधी त्या अतिभव्य रिकाम्या स्टेडियम्समध्ये उगाच रतीब टाकल्यासारख्या टी-२० आणि वन डे खेळवल्या गेल्या. ते पण एकीकडे विजय हजारे ट्रॉफीसारखी महत्वाची डोमेस्टिक स्पर्धा चालू असताना आणि जुलै - ऑगस्टमध्ये पुन्हा इंग्लंडचा दौरा असताना. आणि आता ती आयपीएल नामक सर्कस! नाही. आयपीएल बद्दल कोणता आकस नाही. पण सध्याच्या परिस्थितीत, ४ महिन्यांपूर्वी हीच स्पर्धा झालेली असताना, बायो बबलमध्ये थकलेल्या, वैतागलेल्या खेळाडूंनिशी, रिकाम्या प्रेक्षागारासमोर पुन्हा हाच तमाशा करण्याची गरज काय? हा सगळा अट्टाहास कशासाठी? रविवारच्या "सकाळ" मध्ये दोन ज्येष्ठ क्रीडा समीक्षकांच्या दोन लेखांमध्ये त्याचं उत्तर मिळालं. "पैसा"!
किती पैसा??? आकडे काय घेऊन बसलात? आमच्या दादाला, आमच्या "थाला"ला, व्हेरी व्हेरी स्पेशल माणसाला "एक का एक करोड बनाओ" किंवा "दिमाग लगाओ" म्हणत सरळ सरळ जुगार खेळा असं लोकांना सांगायला लावण्याइतका पैसा. आमच्या तज्ञ, मर्मज्ञ, आपल्या वर्णनानी सामना जीवंत करणार्या कॉमेंटेटर्सना ऐन सामना रंगात आलेला असताना एका गाडीची तोंड फाटेस्तोवर स्तुती करायला लावण्याइतका किंवा क्रेडिटकार्डची बिलं भरायची आठवण करायला लावण्याइतका पैसा. आताशा कोणी वीवो चीनी कंपनी आहे किंवा ड्रीम ११ हा एक प्रकारचा जुगार आहे अशी तक्रार करताना ही दिसत नाही आणि खेळाडूंचे जीव धोक्यात घालून हा तमाशा चालवण्याची काही गरज आहे का असं विचारतानाही दिसत नाही.
अर्थात आम्ही तरी काय वेगळं करतोय म्हणा. एव्हाना परिस्थितीने आम्हाला आमची देशभक्ती, नीती, तत्वं, सदसद्विवेकबुद्धी, सारासार विचार वगैरे गोष्टी किती सोयिस्कर, बेगडी, फुटकळ आणि पोकळ आहेत हे दाखवून दिलं आहेच. तेव्हा आता ह्या विक्रेत्यांना तर सोडाच - पण सामना खिशात असताना बेजबाबदार फटका मारून बाद होणार्या किंवा ऑफस्टंपच्या मैलभर बाहेरचा चेंडू स्क्वेअरलेगला मारायचा प्रयत्न करत बॉल वाया घालवणार्या फलंदाजांना, आपल्या सर्वांत प्रभावी बोलरला पूर्ण षटकं न देणार्या कॅप्टनला काही बोलण्याचा अधिकार आम्हाला नाही. प्रत्येक सामना १९-२० व्या षटका पर्यंत चालणारच. चालायलाच हवा. त्याशिवाय आम्हाला आमची क्रेडिटकार्डची बिलं कशी भरावीत, कुठला पान मसाला खावा, आमच्या मुलांनी कसं शिक्षण घ्यावं, आमचा (नसलेला) पैसा कुठे आणि कसा गुंतवावा ह्याची माहिती कशी कळणार?? That's what we have signed up for.
तेव्हा हा तमाशा असाच चालणार. बघायचा असेल तर बघा - नाहीतर रिमोट तुमच्या हातात आहेच.
मी बघतो हा तमाशा - पण इंग्रजीत म्हणतात ना - with a pinch of salt. एकतर क्रिकेट बाकी कुठल्याही daily soap पेक्षा प्रेक्षणीयच असतं. हे खेळाडू खरोखरंच अफलातून आहेत. आपल्या तरुण खेळाडूंना जगातल्या सर्वोत्तम खेळाडूंच्या खांद्याला खांदा लावून खेळायची संधी मिळते आहे. कधी कधी जाम उत्कंठावर्धक होतात सामने. पण आयपीएल मध्ये भावनिक गुंतवणुक कधीच झाली नाही आणि आता तर ती होणं ही शक्य नाही. आम्ही ज्या क्रिकेटवर मनापासून प्रेम केलं ते हे नव्हे. आम्हाला आवडणारं क्रिकेट आम्हाला कदाचित वर्षात १-२ महिनेच बघायला मिळतं आणि आम्हाला ते बघायला मिळतं ह्याचंच समाधान आहे.
पण खरंतर सध्या आमची भावनिक गुंतवणूक असायला हवी ऑलिम्पिक विजेत्या आर्जेन्टिनाला त्यांच्या घरात घुसून २-१ असं हरवणार्या आमच्या हॉकी संघात. अंशू आणि सोनम मलिकच्या पहिल्या ऑलिम्पिक मध्ये. बजरंग पूनिया, सिंधू, मेरी कोम, विनेश फोगाट, विकास कॄष्णन, मनू भाकरच्या पदकांच्या आशेमध्ये. टोक्योमध्ये भारतीय जर्सी घालायला मिळावी म्हणून रक्ताचं पाणी करणार्या आमच्या बॉक्सर्स, शूटर्स आणि अॅथलीट्समध्ये. अपार कष्ट आणि त्याग करून देखील पैसा आणि प्रसिद्धीपासून मैलोनमैल दूर असलेल्या आमच्या कितीतरी गुणी, मेहनती खेळाडूंमध्ये. आमच्या क्रिकेटर्सची नवी पिढी गुणी आहेच पण पाठीवर हात ठेऊन लढ म्हणायची गरज आहे ती चार वर्षातून एकदा होणारा ऑलिम्पिक्सचा महाकुंभ अजून एका वर्ष लोटलं तरी अनिश्चित असताना सुद्धा जिद्दीने घाम गाळणार्या आमच्या ऑलिम्पिकवीरांना.
तेव्हा आम्ही मनोरंजनासाठी आयपीएल अगदी रात्री जागून बघू - पण रोज सकाळी त्याहीपेक्षा जास्त उत्सुकतेने वृत्तपत्राचं शेवटचं पान आधी उघडू - आमच्या ऑलिम्पिकवीरांच्या कामगिरीच्या बातम्यांसाठी. हळू हळू संदर्भ लागत जातील, ज्योती पेटत जातील आणि "पैसा फेक तमाशा देख" पलिकडचा खेळ आम्हाला पुन्हा बघायला मिळेल.
© - आशुतोष थत्ते

