शनिवार, ३० मे, २०२०

क्रीडायुद्धस्य कथा - The Rumble in the jungle

खेळ असो, कला असो वा उद्योग असो - हीरोज बरेच असतात पण काहीच जणं iconic म्हणवतात आणि एखाद दुसराच legend म्हणवून घेऊ शकतो.

बॉक्सिंग हा खरंतर वरकरणी रानटी वाटणारा खेळ. पण ह्या रानटी खेळातलं "सौन्दर्य" उलगडून दाखवणारा  खेळाडू म्हणजे मुहम्मद अली. अली केवळ आपल्या खेळाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणारा चँपियन नव्हता. आपल्या विचारांनी आणि कर्तृत्वानी तो People's Champion झाला होता. ३ जून रोजी ह्या चालत्या बोलत्या दंतकथेचा स्मृतिदिन. कलाकाराची आठवण त्याच्या कलाकृतीतून नाही काढायची तर अजून कशातून?

व्यावसायिक कारकीर्दीच्या शिखरावर असताना १९६६ च्या मार्च मध्ये अलीनेअमेरिकन सैन्यातून व्हिएतनाममध्ये लढायला जाण्यास नकार दिला. "I’m not going 10,000 miles from home to help murder and burn another poor nation simply to continue the domination of white slave masters of the darker people the world over"- हे तेव्हाचं त्याचं वाक्य. त्याच्यावर ५ वर्षांची बंदी घालण्यात आली. त्याचा जगज्जेत्याचा खिताब काढून घेण्यात आला. त्याचा पासपोर्ट जप्त करण्यात आला. मार्च १९६७ ते ऑक्टोबर १९७० अशी साडेतीन वर्षं अली व्यावसायिक बॉक्सिंगपासून दूर होता. पण अली आपल्या विधानापासून एक इंचदेखील मागे हटला नाही ह्यातच त्याचं असामान्य व्यक्तिमत्व दिसतं.

अली आणि अजून एक दंतकथा बनलेला जॉर्ज फोरमन ह्यांनी  ३० ऑक्टोबर १९७४ रोजी २०व्या शतकातली सर्वोत्कृष्ट मानली गेलेली बॉक्सिंग लढत घडवली. मुष्टियुद्धाच्या इतिहासातली सर्वांत बहुचर्चित आणि अविस्मरणीय लढत . दोन महान बॉक्सर्सनी बॉक्सिंग रिंगमध्ये मांडलेला बुद्धिबळाचा डाव. तेव्हाच्या झायर आणि आताच्या काँगो मध्ये दोन दिग्गज "कलाकारांनी" रंगवलेली मानवी शक्ती, चिकाटी आणि धैर्याची मैफल. "The Rumble in the Jungle".

upload.wikimedia.org/wikipedia/en/thumb/6/6d/Th...

६० च्या दशकातल्या Civil rights movement नंतर आफ्रिकन अमेरिकन लोकांच्या प्रतिभेचं जगाला दिपवून टाकणारं दर्शन घडवण्याचं डॉन किंगचं स्वप्न साकारलं तत्कालीन जगज्जेता जॉर्ज फोरमन आणि माजी जगज्जेता मुहंमद अली यांनी! तेव्हाच्या काळात कोट्यवधी डॉलर्स पणाला लागलेली, किंशासाच्या Stad du 20 Mai मध्ये ६० हजार प्रेक्षकांनी याची देही याचि डोळा अनुभवलेली आणि जगभर १ अब्जापेक्षा जास्त लोकांनी बघितलेली अफाट, अद्भुत, अविश्वसनीय, अकल्पनीय, अचाट लढत.

ह्या लढतीआधी फोरमन आणि अली दोघांनीही झायरमध्ये खूप दिवस मेहनत घेतली होती. अलीनी थोडी जास्त. कारण त्यानी लढतीआधी फोरमनसाठी खास कविता रचली !

You know I’m bad.
just last week, I murdered a rock,
Injured a stone, Hospitalized a brick.
I’m so mean, I make medicine sick.
I’m so fast, man,
I can run through a hurricane and don't get wet.
When George Foreman meets me,
He’ll pay his debt.
I can drown the drink of water, and kill a dead tree.
Wait till you see Muhammad Ali.

फोरमनची कारकीर्दही अली इतकीच दैदिप्यमान. दोघेही ६ फूट ३ इंच उंच. दोघांचीही वजनं शंभर किलोच्या वर. दोघांच्याही बाहूंत अमर्याद ताकद. दोघांचीही शरीरं मुशीतून शिश्याच्या मूर्ती काढाव्यात तशी - बलदंड. फोरमन २५ वर्षांचा तर अली ३२. दोघांनीही ऑलिंपिक सुवर्णपदकं जिंकली होती. दोघांचीही वृत्ती मुष्टियोद्ध्याला साजेशी. पाशवीच!

फोरमननी जगज्जेत्या "स्मोकिन जो" फ्रेझियरला अवघ्या २ मिनिटांत नॉक आउट करून जगज्जेतेपद पटकावलं होतं. त्याआधीच्या तब्बल ४० लढतींत फोरमन अजिंक्य राहिला होता. अलीनीही फ्रेझियर, केन नॉर्टन, सॉनी लिस्टनसारख्या धुरंधरांना अस्मान दाखवलं होतं. अली हा तंत्रशुद्ध खेळ आणि वेगवान हालचाली करणारा Out-fighter तर फोरमन हा आपल्या अमानवी ताकदीच्या जोरावर प्रतिस्पर्ध्याला बुकलणारा slugger. दोघांच्यात डाव-उजवं करणं कठीण - नव्हे अशक्य होतं.

ह्या लढतीची प्रचंड जाहिरात झाली होती. ह्या युद्धाचा विजेता जागतिक मुष्टियुद्धाचा अभिषिक्त सम्राट बनणार होता. अमेरिकेतच नव्हे तर जगभर लाखो करोडो रसिक टीव्हीवर हे अभूतपूर्व द्वंद्व पाहात होते. आव्हानवीर म्हणून प्रथम महंमद अली रिंगणात उतरला."अली - बोम्मा ये" (Ali - kill him) च्या जोरदार घोषात अलीचं स्वागत झालं. मग जागतिक विजेत्या जॉर्ज फोरमनचं आगमन झालं. दोघे पर्वतकाय मल्ल एकमेकांसमोर उभे राहिले. अली आपल्या टोमण्यांनी, प्रक्षोभक बोलण्यानी फोरमनची एकाग्रता भंग करायचा प्रयत्न करत होता. पण फोरमनला हे सगळं नवीन नव्हतं. त्या क्षणी तो मुष्टियुद्धाचा बादशहा होता - अजिंक्य होता. रेफरी Zack Clayton नं इशारा केला आणि मुष्टियुद्धातल्या "न भूतो न भविष्यति" अश्या लढतीला सुरुवात झाली.

अलीनी सुरुवातीलाच आपल्या जॅब्स आणि "काँबिनेशन्स"नी फोरमनवर घणाघाती हल्ला चढवला. पण काहीच क्षणांत फोरमन सावरला. नुसता सावरलाच नाही तर त्यानेही अलीवर जोरदार प्रतिहल्ला डागला. फोरमन तरुण होता, सळसळत्या रक्ताचा आणि अचाट ताकदीचा. ह्याउलट अली आपल्या कारकीर्दीच्या उताराला लागला होता. फोरमनच्या अमानुष ताकदीपुढे अलीचा टिकाव लागणं मुश्किल होतं. आणि अलीनी बॉक्सिंग रिंगमध्ये चाललेल्या ह्या बुद्धिबळाच्या डावाची आपली पहिली चाल खेळली. अलीच्या लक्षात आलं की नेहेमीसारखं खूप हालचाली करणं म्हणजे आपलीच जास्त दमछाक करून घेणं. दुसर्‍याच फेरीत अलीनी आपला "गियर" बदलला. फोरमनवर वार करण्यापेक्षा तो रोप्सला रेलून फोरमनचे पंचेस झेलू - चुकवू लागला.


ही "रोप-अ-डोप" योजना कमालीची यशस्वी ठरली. फोरमन सगळी ताकद पणाला लावून अलीवर हल्ला चढवत होता. पण अली मात्र रोप्सच्या मधल्या भागावर रेलून आपल्या चपळ हालचाली आणि "रिफ्लेक्सेस"च्या मदतीनी फोरमनचे बहुतेक ठोसे चुकवत होता. फोरमनचे बरेचसे ठोसे अलीच्या पोटा - छातीवर लागत होते. पण फोरमन अलीच्या चेहर्‍याचा म्हणावा तसा वेध घेऊ शकत नव्हता. पुन्हा डावपेच असे की तीन मिनिटांच्या राउंडमध्ये २:३० मिनिटं फोरमनचा मार खाल्यावर शेवटच्या ३० सेकंदांत अली फोरमनवर आपल्या ताकदवान जॅब्सचा वर्षाव करायचा. बुद्धिबळाचा डाव चांगलाच रंगला होता!

आणि हो! प्रत्येक वेळी "they told me you could punch, George!" किंवा "Is that all you have" - "You punch like a sissy George"असं म्हणून त्याला चिथावत होता. अर्थात फोरमन अश्या sledging नी डोकं फिरवून घेणारा होता थोडाच? तो त्याच्या योजनेला धरून अलीवर हल्ले करत होता आणि त्याला कारण ही तसंच होतं. कित्येक लढतींत फोरमनला सहा मिनीटांच्या वर लढावं लागलं नव्हतं. त्याची १५ राउंड्स खेळायची तयारी नव्हतीच. आपल्या ताकदीच्या जोरावर लवकरात लवकर लढत संपवणे हीच फोरमनची सर्वोत्कृष्ट संधी होती. त्याचे मोहरे तो बरोब्बर खेळत होता.

पहिल्या ४ राउंडस मध्ये फोरमन अलीचा बचाव भेदू शकला नाही. थोड्या वेळानं फोरमन थकला. ती संधी साधून अलीनी नव्या जोमानी त्याला ठोसे हाणायला सुरुवात केली. प्रत्येक राउंडच्या शेवटी अली कट्स, आणि जॅब्सचा पाऊस पाडत होता. पण फोरमनही तितकाच लढवय्या होता. अलीच्या ठोश्यांनी त्याचा चेहरा पुरीसारखा सुजला होता. समोरचं नीट दिसतही नव्हतं. पण हार मानेल तर तो फोरमन कसला? त्यानीही आपल्या हुक्स आणि क्रॉसेसनं अलीला जेरीस आणलं होतं. सिंह आणि हत्तीच्या ह्या युद्धात हार तरी कोण मानणार?? दोघेही रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत झुंज देणारे खंदे वीर होते. कोणीच इंचभरही मागे हटायला तयार नव्हतं. ठोश्याला ठोसा, फटक्याला फटका दिला-घेतला जात होता. दोघं एकमेकांपेक्षा अणूभरही कमी नव्हते - ताकद, दमसास, जिद्द, चिकाटी, तंत्र, त्वेष, माज - कुठल्याच बाबतीत.


आठव्या फेरीच्या सुरुवातीला मात्र दोघेही प्रचंड दमले होते. असं म्हणतात की कसलेल्या बॉक्सरचा एक "पंच" कडक रमच्या "पतियाळा पेग" चं काम करतो. इथे तर त्या हिशोबात दोघांनी बाटल्यांवर बाटल्या रिचवल्या होत्या. दोघांच्या दमून झोकांड्या जात होत्या पण कोणीच एक इंच माघार घ्यायला तयार नव्हतं. फोरमननं अलीवर पुन्हा एकदा हल्ला चढवला. अलीनी पुन्हा एकदा आपल्या रणनीतीला अनुसरून रोपचा आसरा घेतला. फोरमनचे काही ठोसे खाल्ल्या आणि हुकवल्यावर अचानक अलीनी जीवाच्या करारानी फोरमनवर निकराचा मारा केला. डाव्या हाताच्या एका "हुक" नं फोरमनचं डोकं वर उचललं गेलं. दुसर्‍याच क्षणी अलीचा एक ताकदवान उजवा "पंच" फोरमनला चेहर्‍यावर बसला आणि फोरमन हादरला.... त्या जगज्जेत्याचे बुरूज ढासळले.... तटबंदी भेदली गेली. भेलकांडत फोरमन आपल्या पाठीवर पडला. George Foreman is down. He's fallen like a tree in the forest.


तो उठून परत आपल्या पायावर उभा राहीपर्यंत वेळ टळून गेली होती. नवा जागतिक विजेता हेवीवेट मुष्टियोद्धा होता "महंमद अली"!!!

ही लढत म्हणजे महंमद अलीच्या झळाळत्या कारकीर्दीवरचा सुवर्णकळस होता. नंतर अली बर्‍याच लढती खेळला. अगदी जो फ्रेझियरला देखील त्याने "Thrilla in Manilla" म्हणून प्रसिद्ध झालेल्या लढतीत हरवलं, ७६ मध्ये आधी त्याला हरवलेल्या केन नॉर्टनला हरवलं. पण Rumble in the Jungle च्या वेळेचा अली पुन्हा बघायला नाही मिळाला. लिऑन स्पिंक्स, लॅरी होम्स आणि शेवटी ट्रेव्हर बर्बिककडून हरल्यावर मात्र अलीनी निवृत्ती जाहीर केली.


१९९६ मध्ये  Rumble in the Jungle वरच्या लघुपटाला मिळालेलं ऑस्कर घेताना पार्किन्सन झालेल्या मुहम्मद अलीला स्टेजवर जाताना आधार देत होता त्याचा एकेकाळचा कडवा प्रतिस्पर्धी आणि आताचा परममित्र जॉर्ज फोरमन! कित्येक वेळा खेळाडूची महानता ही त्याच्या मैदानातल्या यशापेक्षादेखील जास्त त्याच्या मैदानाबाहेरच्या वागण्याने प्रत्ययाला येते.

महंमद अली नावाच्या या एका खेळियाने कविता केल्या, चित्रपटांत कामं केली, जगभरातल्या अक्षरशः कोट्यवधी गोरगरीबांसाठी देश, पंथ, वर्ण. कसलाही मुलाहिजा न ठेवता मदत केली. प्रचंड निधी जमवला, पार्किनसन्सग्रस्तांसाठी "मुहंमद अली पार्किनसन सेंटरची" स्थापना केली. आपल्या प्रतिस्पर्ध्याची टर उडवण्यार्‍या कविता करणार्‍या अलीचे आताचे शब्द होते "We all have the same God, we just serve him differently. Rivers, lakes, ponds, streams, oceans all have different names, but they all contain water. So do religions have different names, and they all contain truth, expressed in different ways forms and times. It doesn't matter whether you're a Muslim, a Christian, or a Jew. When you believe in God, you should believe that all people are part of one family. If you love God, you can't love only some of his children."

आपल्या सबंध कारकिर्दीत आपल्या प्रतिस्पर्ध्यांना मारणारा ठेचणारा, भलेबुरे बोलून आणि आपल्या विध्वंसक खेळानी त्यांना खच्ची करणारा अली आपल्या आयुष्यातल्या उत्तरार्धातल्या कतृत्वानं "एक महान मुष्टियोद्धा"ह्या पलिकडे सुद्धा महान माणूस बनला. दुर्लक्षित, दुर्बल आणि दुर्दैवी समाजघटकांना मदत करण्यात त्याने आपला वाटा उचलला.

"Float like a butterfly, sting like a bee" ह्या वाक्याशी समरूप झालेल्या ह्या महान खेळियाला त्यानीच दिलेल्या अविस्मरणीय लढतीच्या आठवणीची ही आदरांजली!




© - आशुतोष थत्ते

बुधवार, २७ मे, २०२०

खासियत खेळियाची ५ - श्रीमंत थोरले वॉ साहेब

बॅलन्स - समतोल - संतुलन - ईक्विलिब्रियम हा सृष्टीचा नियम आहे. एकीकडे झीज झाली की दुसरीकडे भर पडतच असते, कुठे थंडी पडली तर अजून कुठे उष्णतेची लाट आलेली असते. इतकंच काय एखाद्या घरी आज जेवणात मीठ कमी पडलं तर कुणाकडे जेवण खारट झालेलंच असतं.

आज जरी कंटाळ्यातून असं गूढ गहन बोलत असलो तरी ह्या फिलोसॉफीचा शोध मला काही वर्षापूर्वीच लागला होता. "धूम ३" बघत होतो आणि एकदम न्यूटनच्या डोक्यावर सफरचंद पडावं तसा माझ्या डोक्यात प्रकाश पडला. "राम और श्याम"घ्या "सीता और गीता", "चालबाज", "अप्पू राजा", "कमीने", "किशन कन्हैय्या" अगदी "शर्मिली" सुद्धा. कुठल्याच चित्रपटात दोन जुळे एकसारख्या स्वभावाचे कधीच कसे दाखवत नाहीत? किंबहुना जुळे म्हटलं की दोघांचं वागणं दोन टोकांचंच असायला हवं का? एक भोळा भाबडा असेल तर दुसरा बारा**चा असलाच पाहिजे का? दोघीही जुळ्या बहिणी छान, म्रुदुभाषी, सुस्वभावी,  सुलक्षणी इत्यादी दाखवायला कायद्यानी बंदी आहे का?

पण मग विचार केला की कदाचित सृष्टीच्या ह्या नियमाला धरूनच २ जून १९६५ रोजी बेव्हर्ली वॉ ह्या माऊलीने जुळ्यांना जन्म दिला. आणि ह्या नियमाला अनुसरूनच एक जुळा भारतीय क्रिकेटप्रेमींच्या मनात भरायचा आणि दुसरा डोक्यात जायचा. पण दोघांनीही क्रिकेटवर आपली न पुसली जाणारी मोहोर उमटवली. गेल्या लेखात आपण मनात भरलेल्या मार्क बद्दल बोललो तर आता आपल्या डोक्यात जाणारे "थोरले"!

Herschelle Gibbs's reprieve enables Steve Waugh to play the ...

स्टीवन रॉजर वॉ हे नाव घेतलं की मला १९९९ च्या वर्ल्डकपचा ऑस्ट्रेलिया वि दक्षिण आफ्रिका उपांत्य सामना आठवतो. आफ्रिका ९ बाद २०५. शेवटच्या षटकात ९ धावांची गरज आणि एकच विकेट हातात. पण "मॅन ऑफ द सीरीज" लान्स क्लूसनर खेळतोय. ते ही १२ चेंडूंत २३ धावा काढून. फ्लेमिंगचे पहिले २ चेंडू त्याने सीमेपार धाडले! संपलाच की खेळ ४ चेंडू आणि एकच धाव जिंकायला. आता नक्की लॉर्डसवर पाकिस्तान आणि आफ्रिका झुंजणार! आणि थोरले वॉ साहेब फक्त आपल्या लोकांना दोन्ही हातांनी "आत या" अशी खूण करतात. त्यांचा चेहरा नेहेमीसारखाच निर्विकार. आत चालू असलेल्या वादळाची पुसटशी कल्पना देखील येऊ नये इतका. ९ क्षेत्ररक्षक ती १ धाव अडवण्यासाठी वाघासारखे टपलेले. फ्लेमिंगचा पुढचा चेंडू डॉट पडतो. ३ चेंडू १ धाव - तरीही आवाक्यातच. पण क्लूसनर पुढचा चेंडू मिडऑफला मार्क वॉ कडे मारून पळत सुटतो. डोनाल्ड हालत नाही. फ्लेमिंग गिलख्रिस्टकडे चेंडू टाकतो आणि डोनाल्ड धावबाद होऊन क्रिकेटची एक नवी कंपनी जन्माला येते "ऑस्ट्रेलियन क्रिकेट इन्कॉर्पोरेटेड" ! सीईओ - स्टीवन रॉजर वॉ !

On this day in 1999: The greatest game of all time

थोरल्या वॉ साहेबांच्या डोक्यातच एक रेफ्रिजरेटर होता. आणि हीच त्यांची खासियत. मार्क टेलरकडून वारसाहक्काने मिळालेला ऑझी संघ खर्‍या अर्थाने जगज्जेता बनवला स्टीवने. हेडन, गिलख्रिस्ट, मॅक्ग्रा आणि वॉर्न जर ह्या संघाचे हात-पाय असतील तर ह्या संघाचं सिंहाचं काळीज होता स्टीव वॉ. त्याच्या नेतृत्त्वाने एका अत्युकृष्ट संघाला एक महान संघ बनवलं! १९९७ मध्ये एकदिवसीय आणि १९९९ मध्ये कसोटी संघाचं नेतृत्त्व हाती आल्यावर स्टीव वॉने क्रिकेटची अनेक समीकरणं बदलली. सातत्य, अपेक्षेपेक्षा उत्तम कामगिरी सतत करणे, क्रिकेट खेळण्याची पद्धत बदलणे,सर्वोत्तमतेचा ध्यास घेणे, पुनःपुन्हा स्वतःचेच विक्रम मोडणे असे अनेक आयाम स्टीव वॉनी ऑस्ट्रेलियन क्रिकेटला दिले.२-४ नाही तर सलग १६ कसोटींत ह्या संघाने प्रतिस्पर्ध्यांना धूळ चारली. वॉ खेळलेल्या १६८ कसोटींतल्या ५७ मध्ये तो कर्णधार होता. त्यांपैकी ४१ सामन्यांत त्याने विजय मिळवला. आणि केवळ ९ सामन्यांत पराभवाचा सामना केला.

स्टीव वॉच्या थंडपणा आणि कठोरपणाचं मूर्तिमंत प्रतीक म्हणजे त्याचा cow corner ला मारला जाणारा slog. बोलर डोईजड होत असेल किंवा परिस्थिती हाताबाहेर जात असेल तर थोरले वॉ साहेब हमखास हा फटका मारायचे. अगदी तणावाच्या परिस्थितीत, थंड डोक्याने जागा हेरून लाँगऑन आणि मिडविकेटच्या गॅप मधून मारलेला चौकार / षटकार हा त्याचा फटका इतका लोकप्रिय होता की स्टीवच्या शेवटच्या सामन्यात भारतीय विकेटकीपर पार्थिव पटेलनी फर्माइश केली. C'mon Steve, just one more of your popular slog sweeps before you quit! And Steve obliged!



We play to win matches, not to win friends ही मानसिकता ह्याच्या नसानसांत भिनलेला. पहिल्या टेस्ट मध्ये मिळालेली "बॅगी ग्रीन" शेवटपर्यंत अभिमानाने वापरणारा, खिशात लाल रुमाल ठेवणारा, कधीही हार न मानणारा, पराकोटीच्या दबावात देखील थंडपणे विचार करणारा आणि कठोरपणे निर्णय घेणारा चिवट आणि झुंजार संघाचा चिवट आणि झुंजार कर्णधार - स्टीव वॉ !

The unofficial practice of never replacing a baggy green cap began ...Steve Waugh bids adieu - Times of India

असे हे दोघे अचाट जुळे. धाकला मार्क जर कलाकार असेल तर थोरला स्टीव हा योद्धा होता. मार्कच्या हाती चित्रकाराच्या कुंचल्यासारखी वाटणारी बॅट स्टीवच्या हातात ग्लॅडिएटरच्या तलवारीसारखी वाटायची. कॉलर वर करून गॉगल घालून ऑफस्पिन टाकणारा मार्क Rockstar तर कॉलर वर करून मीडियम पेस टाकणारा स्टीव Workhorse. मार्कची शांतता म्हणजे तळ्याचं पाणी तर स्टीवची शांतता म्हणजे खदखदणारा ज्वालामुखी. जुळे असूनही म्हणा किंवा जुळे असल्यामुळे म्हणा - chalk and cheese सारखे वेगळॅ.

पण दोघांच्यात साम्य देखील होतंच की. दोघांनीही क्रिकेटरसिकांना भरभरून आनंद दिला, अविस्मरणीय क्षण दिले, कडू - गोड आठवणी दिल्या. एकानी आमरसाचा गोडवा दिला तर एकानी मटण-रश्श्याचा झणका. पण दोघांनीही मझा आणला! अश्या रॉजरकाका आणि बेव्हर्लीकाकुंच्या पोरांना २ जूनच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

It's time for WAUGH - Brothers Steve vs Mark in cricket

© - आशुतोष थत्ते

रविवार, २४ मे, २०२०

खासियत खेळियाची ४ - मेकिंग अ मार्क

Crush - हो हो ! तुम्हाला अभिप्रेत आहे तोच crush. ह्याला का कोणास ठाऊक मराठीत प्रतिशब्द सापडतच नाही. आणि नाही सापडत तेच बरंय. Crush मधला भाबडेपणा, त्यातली निरागसता आणि निर्भेळ असं प्रेम हे तसंही इतर कुठल्या शब्दात व्यक्त होणं अवघडंच.

क्रिकेट आपलं पहिलं प्रेम असेल तर क्रिकेटमधला आपला पहिला क्रश म्हणजे मार्क वॉ. "कितने भी तू करले सितम, हस हसके सहेंगे हम" हे गाणं मार्क वॉ इतकं कोणाला चपखल बसत नसेल. ह्या माणसात मुळातच एक आपलेपणा वाटायला लावणारं काहीतरी होतं. "ना समझे वो अनाडी है" म्हणणारी नूतन जशी कुठल्याही मेकअप, कॉस्चूम शिवाय देखील कमालीची सुंदर दिसायची तसंच काहीसं. मार्क वॉ नी आपल्या विरुद्ध सेंच्युरी मारून मॅच काढली, मोक्याच्या वेळेला कोणाला रन आउट केलं, इतकंच काय १९९६ च्या वर्ल्डकप मध्ये सचिनला वाईड टाकून आउट केलं तरीही आम्हाला कधी मार्क वॉचा राग आला नाही. कदाचित त्याच्या बॅटिंगमध्ये असणार्‍या साध्या सरळ सौंदर्यानी आम्हाला भुरळ घातली होती.


आपल्या काही मिनिटांनी मोठ्या असलेल्या गंभीर, खवचट जुळ्या बंधूंच्या तुलनेत मार्क वॉ म्हणजे कार्ल्याच्या कापांच्या शेजारी रसाळ पायरी जणू! ह्या माणसाच्या हातात बॅट म्हणजे व्हायोलनिस्टच्या हातात बो! आणि म्हणूनच ह्याची फलंदाजी म्हणजे संगीत होतं ! ह्याच्या फटक्यांना "शॉट" म्हणणं म्हणजे सोज्वळ निशिगंधा वाडला अँजेलीना जोली म्हणण्यासारखं ! "अहिंसा परमो धर्मः" म्हणत हा चेंडूला कुरवाळायचा - थोपटायचा - क्वचित कधीतरी प्रेमानी एक टपली मारायचा ! स्क्वेअर ड्राईव्ह असो वा लेग ग्लांस, फ्लिक असो वा सरळ उचलेला षटकार - ह्याचा प्रत्येक फटका एक सुरेल composition असायचं. पण मला भावणारी धाकल्या वॉ साहेबांची खासियत म्हणजे त्यांचं कॅचिंग!

पहिल्या / दुसर्‍या स्लिपमध्ये गडी असा उभा राहायचा जणू सवेरासमोरून जाणारी फर्ग्युसनची हिरवळ बघतोय! निवांतपणा personified. बरं हा निवांतपणा म्हणजे इंझमामचा आळसावलेला निवांतपणा नव्हता बरं का! ह्या निवांतपणातही एक चलाखी होती. कसली घाई नाही, गडबड नाही, चिंता नाही. हा निवांतपणाच मार्क वॉला सर्वोत्तम स्लिप्स फील्डर बनवून गेला.


स्लिप्समधल्या फील्डरकडे बॅटीची कड घेतल्यावर बॉल अनपेक्षित वेगात आणि विचित्र कोनात येतो. त्याचा अंदाज घेणं म्हणजे कर्मकठीण काम. पण म्हणतात ना - A sure sign of greatness is making difficult things look easy. इथेच मार्क वॉ "उत्तमते"च्या सीमा ओलांडून महानतेकडे जायचा. त्याला येणार्‍या चेंडूचा अचूक अंदाज तर असायचाच पण शिवाय त्याच्या मनासारखंच त्याचं शरीरही relaxed असायचं. अत्यंत चपळाईने तो त्या चेंडूच्या रेषेत यायचा आणि प्रेयसीनं टाकलेलं गुलाबाचं फूल झेलावं तसा अलगदपणे तो कॅच घ्यायचा. मग तो अगदी जमिनीलगत असो किंवा डोक्याच्या वर. बरं हे सगळं दिसायला जितकं साधं सोपं दिसायचं तितकंच ते प्रत्यक्षात कठीण आणि कसबाचं काम होत. त्यामागे देखील तंत्रशुद्ध अभ्यास होता. मार्क वॉ त्याला "narrow stance technique" म्हणायचा. पायात अंतर कमी ठेवलं की "सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी" च्या बाहेर पटकन हालचाल करता येते. तुमचे हात जेवढे रिलॅक्स्ड असतील तितका तो चेंडू त्यांत पिशवीत कोबी टाकावा तसा सामावतो. फक्त त्यात जर तुम्हाला ती नजाकत हवी असेल तर मात्र तुम्हाला ते देणं जन्माला येतानाच घेऊन यावं लागतं.


आजकाल तर फील्डिंग कधी नव्हती इतकी सुधारली आहे. चपळता, अचूकता, वेग सर्वच बाबतीत आजकालचे फील्डर्स निर्विवादपणे सरस आहेत. पण फील्डिंगमधलं "ग्लॅमर" वाढलं असलं तरी "सौंदर्य" कुठेतरी हरवत चाललेलं दिसतं. मार्क म्हणायचा “Don’t try and catch the ball, let the ball catch you.” पण आजकालच्या swipe left swipe right करणार्‍या tinder पिढीला नुसत्या चोरट्या कटाक्षांतून व्यक्त होणारा रोमान्स कळावा तरी कसा? पोरांनो - मार्क वॉचं स्लिप्स मधलं कॅचिंग बघा - तुम्हाला थोडा अंदाज येईल.

© - आशुतोष थत्ते