शनिवार, ९ मे, २०२०

खासियत खेळियाची २ - स्ट्रेटड्राईव्ह तेंडूलकरस्य

खासियत खेळियाची या मालिकेत आपण  पहिल्या लेखात सुद्धा सचिन तेंडुलकरच्या right hand over left फ्लिकचा आस्वाद घेतला. पुढची खासियत ही खरंतर कोण्या वेगळ्या खेळाडूची असायला हवी होती. पण किशोर कुमार आणि यॉडलिंग ह्यांचा उल्लेख झाल्याशिवाय ज्याप्रमाणे सिनेसंगीताची चर्चा पुढे जाऊ शकत नाही त्याप्रमाणेच सचिन तेंडुलकर आणि स्ट्रेट ड्राईव्ह ह्यांच्याबद्दल लिहिल्याशिवाय क्रिकेटची कुठलीही चर्चा पुढे कशी जाणार?

स्ट्रेट ड्राईव्ह हा क्रिकेटमधला सर्वांत आकर्षक फटका. एखाद्या कथक नर्तकीच्या तत्कारामध्ये तिचा थाट, आब, नजाकत, सौंदर्य दिसतं म्हणतात - तसंच एखाद्या फलंदाजाच्या स्ट्रेट ड्राईव्ह मधून त्याची तयारी, परिपक्वता, त्याचा आत्मविश्वास दिसतो. स्ट्रेट ड्राईव्ह सगळेच मारतात. आणि प्रत्येकाच्या स्ट्रेट ड्राईव्हमधून त्या फलंदाजाच्या "बॅटीचा स्वभाव" दिसतो. पाँटिंगची बॅट त्याच्या स्ट्रेट ड्राईव्हच्या फॉलो थ्रू मध्ये त्याच्या डोक्यापर्यंत यायची - अगदी त्याच्या आक्रमक बॅटिंगसारखी. द्रविडचे कष्ट त्याच्या "हार्ड पुश" स्ट्रेट ड्राईव्हमध्ये दिसायचे. जाक्स कॅलिसच्या व्यक्तिमत्वातला दरारा त्याच्या स्ट्रेट ड्राईव्हमध्ये देखील दिसायचा.



अगदी त्याचप्रमाणे सचिनच्या स्ट्रेट ड्राईव्हमध्ये त्याची स्थिरता, त्याचा आत्मविश्वास, भक्कम टेक्नीक आणि एका अस्सल कलाकाराची कलंदरी दिसायची. सुरुवात व्हायची ती स्टान्सपासूनच. रॉक ऑफ जिब्राल्टरची स्थिरता. असं वाटावं की आपण डोळे मिटून भीमसेन जोशींचा खर्जातला षड्ज ऐकतोय. दोन्ही पायांनी बॅलन्स असा सांभाळावा की वादळ आलं तरी माणूस टस से मस हलणार नाही. ती १.५ किलोची बॅट २ वेळा पायामागे टेकवून अशी काय स्थिर बॅटलिफ्ट की पोपटाचा डोळा फोडायला बाण चढवलेला अर्जुन जणू. बोलरवर रोखलेली नजर. मधूनच "हा - ये" अश्या अर्थाची वाटणारी मानेची हालचाल. चेहर्यावर प्रचंड एकाग्रता. एखादा शास्त्रीय गायक किंवा वादक सुरुवात करण्याच्या आधी जो क्षणभराचा पॉझ घेतो तसा पॉझ.



आता जवळपास ४० मीटर्सवरून धावत येणारा गोलंदाज - सहा फूट दोन इंच उंचीचा... दणकट पिळदार  देहयष्टीचा, फलंदाजांचा कर्दनकाळ, वेगाचा बादशहा ब्रेट "बिंगा" ली. स्टेशनवरून सुटलेल्या लोकलसारखा लवकरच तो वेग पकडतो आणि धडधडत अंपायरच्या पुढे येतो. आपल्या रन अप च्या परिसीमेवर एक लांब उडी घेत डावा पाय क्रीजवर वाघा बॉर्डरवरच्या सैनिकासारखा आपटतो. आणि आपल्या मजबूत खांद्याचा आणि पाठीचा पूर्ण जोर लावून तो पांढरा गोळा सुसाट वेगाने सोडतो. ऑफस्टंपच्या किंचित बाहेर, गुडलेंग्थच्या किंचित अलिकडे, टप्पा पडून बाहेर जाणारा सणसणता आऊटस्विंगर. खेळायला निव्वळ अशक्य - unplayable. मागे विकेटकीपर कडे जाता जाता तो बॉल फलंदाजाच्या बॅटच्या कडेचं चुंबन घेऊन जाणार की नाही हीच काय ती उत्सुकता! अश्या चेंडूवर बाद होण्यात काहीच कमीपणा नसतो. अश्या चेंडूवर विकेट मिळणं त्या बोलरचा अधिकार असतो.

पण त्याच वेळी ली पासून २० यार्डावर अजून एक चमत्कार घडत असतो. ताशी १५० किमी वेगानी तो चेंडू २० यार्ड जाईपर्यंत समोरच्या फलंदाजाचा उजवा पाय किंचित मागे जातो.... डावा पाय ऑफस्टंपच्या बाहेर येतो...... गरुडासारखी धारदार नजर चेंडूच्या दिशा आणि टप्प्याचा अचूक अंदाज घेते... पूर्ण संतुलन राखत फलंदाज चेंडूच्या रेषेत येतो..... बॅट किंचित वर उचलली जाते..... आणि पापणी लवण्याच्या तलवारीच्या पात्यासारखी खाली येते.... डोकं बरोब्बर चेंडूच्या वर येतं.... आणि .... आणि बापानी खांद्यावरच्या पोराला बागेत खेळायला सोडताना त्याच्या ढुंगणावर हलकेच चापट मारावी फलंदाज त्या भयानक चेंडूला हलकेच चापट मारतो.... आणि ते कार्टं सुद्धा वारं प्यायल्यागत सुसाट बाउंड्रीलाईनकडे धावत सुटतं.


मिडऑन आणि मिडऑफ एकमेकांकडे बघतात. इकडे एखाद्या नर्तकीने तिहाईवर सम गाठल्यावर ती ज्या डौलाने प्रेक्षकांकडे बघते त्याच मूर्तिमंत ग्रेसनी तो फलंदाज आपणा प्रेक्षकांना नजरेत साठवून ठेवण्यासाठी पोझ देतो. त्या पोझचं मनातून कधीही न पुसलं जाणारं एक चित्र तयार होतं आणि त्या चित्राखाली सही असते - सचिन रमेश तेंडुलकर!


2 टिप्पण्या:

१० मे, २०२० रोजी ४:४७ AM वाजता, Blogger Adwait म्हणातात...

Salaaam _/\_
As you rightly said pratyekachi wegli style of straight drive. But Sachin cha straight drive kayamcha memory madhe ahe.
The video you have shared .. Seriously salaam. Chal theeke parat taak ball sangitlya sarkhi casual body language

 
१० मे, २०२० रोजी ११:२८ PM वाजता, Blogger आशुतोष थत्ते म्हणातात...

Totally yaar... mhanje bowler la asa vatla pahije ki zakk marli n hyala bowling karayla lagli :-D

 

टिप्पणी पोस्ट करा

याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]

<< मुख्यपृष्ठ