मंगळवार, २८ एप्रिल, २०२०

एका खेळियाने - लिएंडर पेस

१९९६ च्या अटलांटा ऑलिम्पिक्सच्या पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीआधीची गोष्ट. आंद्रे अगासी सारखा दिग्गज आपल्या प्रतिस्पर्ध्याबद्दल बोलत होता. एका पत्रकारानी त्याला विचारलं ‘आता तुला अंतिम फेरीचे वेध लागले असतील’. त्यावर अगासी म्हणाला – "You must be crazy – माझ्या प्रतिस्पर्ध्याचं नाव आहे लिएंडर पेस. त्याच्यासारखे चपळ खेळाडू सर्किटमध्ये फार कमी आहेत. आणि त्यातून हे ऑलिम्पिक्स आहे. मीच काय, इतर कोणीही त्याला कमी लेखण्याची घोडचुक करणार नाही. मला माझा सर्वोत्तम खेळ करावा लागेल.

एका वाक्यात अगासीनी लिएंडर पेस काय चीज आहे ते सांगितलं होतं. “आणि त्यातून हे ऑलिम्पिक्स आहे”.... म्हणजे जणू अगासीला म्हणायचं होतं.....लिएंडर त्याच्या देशासाठी खेळणार.....प्रेक्षकातून शेकडो लोकं “इंडिया इंडिया” म्हणून ओरडणार....ह्याला स्फुरण चढणार..... लोकं भारताचा झेंडा नाचवणार....हा माणूस अजून चवताळून खेळणार..... मुठी आवळून आवळून त्याच्या पूर्ण शक्तीनिशी मला झुंज देणार..... मी हमखास म्हणून मारलेले “विनर्स” अशक्यरीत्या परतवणार.....जिवाच्या आकांतानी कोर्ट कव्हर करणार......चित्त्यासारखी झडप घालून त्याच्या "व्हॉलीज" खेळणार.... कारण..... कारण “लिएंडर त्याच्या देशासाठी खेळणार” !

आणि लिएंडरनी अगासीचे बोल खरे ठरवले. पहिल्या सेट मध्ये २ सेटपोईंटस् वाचवून पेसला ७-५, ६-३ असं हरवताना अगासीचं खरंच घामटं निघालं. लिएंडर ती लढत हरला खरा... पण त्यानी फर्नांडो मेलिगेनीला हरवून आपल्या देशाला तब्बल ४४ वर्षांनंतर वैयक्तिक ऑलिंपिक पदक मिळवून दिलं. मनगटाला झालेली दुखापत विसरून केवळ देशासाठी पदक मिळवण्याच्या ईर्षेनं पेस झपाटल्यासारखा खेळला होता. १९५२ मध्ये हेलसिंकीमधल्या खाशाबा जाधवांच्या कांस्यपदकानंतर भारत पहिल्यांदा वैयक्तिक पदक मिळवत होता. आणि ते पदक अत्यंत अभिमानानी आपल्या छातीवर मिरवणारं नाव होतं लिएंडर वेस पेस !


अटलांटाच्या कांस्यपदकानंतरची ली ची प्रतिक्रिया होती “I can now see my father eye to eye. We both own Olympic medals!”. १९७२ च्या म्युनिक ऑलिंपिक्सच्या कांस्यपदकविजेत्या भारतीय संघात मिडफील्डर म्हणून खेळलेले वेस पेस आणि भारताची एकेकाळची बास्केटबॉल कर्णधार जेनिफर यांचा हा मुलगा अ‍ॅथलीट झाला नसता तरच नवल होतं. १२ वर्षांचा असताना आपल्याकडे मुंज करून गुरुगृही धाडतात तसा पेस घराण्याच्या कुळाचाराप्रमाणे ह्याच्या हातात रॅकेट देऊन ह्याला चेन्नईच्या "ब्रिटानिया अमृतराज टेनिस अ‍ॅकॅडमी"मध्ये धाडण्यात आलं. १७ वर्षांचा असताना त्याने प्रथम १९९० ची विंबल्डन ज्युनिअर चँपियनशिप जिंकली. ५९ मध्ये रामनाथन कृष्णन आणि ७९ मध्ये रमेश कृष्णन यांच्या नंतर हा पराक्रम करणारा तो तिसरा भारतीय ठरला. अमेरिकन ज्युनिअर्स खिताब जिंकून ली ज्युनिअर्स् च्या जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर पोहोचला. १९९१ मध्ये ली "प्रो" झाला... डेव्हिस कप मध्ये रमेश कृष्णनबरोबर दुहेरी सामने खेळू लागला. ९२च्या बार्सिलोना ऑलिंपिक्समध्ये ही जोडी उपांत्यपूर्व फेरीपर्यंत पोचली. तेव्हा भारतीय टेनिसला कृष्णन - अमृतराज चा वारस मिळाला असंच वाटलं.

टेनिस हा खरंतर आपल्या भारतीय जातकुळीचा खेळच नाही. तो खेळावा तर युरोपियन्स, अमेरिकन्स आणि ऑस्ट्रेलियन्सनी. प्रचंड ताकद, अमर्याद दमसास लागणारा हा खेळ. हात-पाय मोडून घ्यायची.. छाती फुटायची कामं ! ती कामं करावी सव्वासहा, साडेसहा फुटी आडव्या अंगाच्या लोकांनी. आपण आपलं क्रिकेट खेळावं, बुद्धिबळाचे डाव मांडावेत, कॅरम चा वर्ल्डकप जिंकावा आणि गणित आणि फिजिक्स ऑलिंपियाडमध्ये पोत्यानी पदकं जिंकावीत. टेनिस, फुटबॉल, अ‍ॅथलेटिक्स वगैरेंच्या वाटेला फारसं जाऊ नये. टेनिसच्या हिशेबात ली ५'१०" म्हणजे बुटकाच! एकेरीत त्यानी मोजून एक एटीपी स्पर्धा जिंकली आहे. केवळ चणच नव्हे तर एकंदरच टेनिसला लागणारी ताकद आणि खरंतर सध्याच्या काळातलं टेनिसचं 'पॉवर' स्वरूप बघून लिएंडरनं दुहेरीवर जास्त लक्ष केंद्रित केलं आणि तो त्याच्या कारकीर्दीचा "टर्निंग पाँईंट" ठरला.

टेनिसमध्ये सिंगल्सचे दिग्गज सहसा डबल्स खेळत नाहीत. एकेरी आणि दुहेरीला लागणारे "स्किलसेट्स" देखील बर्‍यापैकी वेगळे असतात.  टेनिस दुहेरीत तुमची कोर्ट कव्हर करण्याची क्षमता, जोडीदाराबरोबरचा ताळमेळ, आपली तशीच जोडीदाराचीच नव्हे तर समोरच्या जोडीची सुद्धा बलस्थानं आणि कमकुवत जागा समजून योग्य "फॉर्मेशन" मध्ये खेळणं, समन्वय, जोडीदार चेंडू मारत असताना तुम्ही काय हालचाली करता, योग्य वेळी योग्य जागी असणं, "व्हॉली"चा (टप्पा न पडू देता बॉल मारण्याचा) अचूक अंदाज असणं ह्या सगळ्या गोष्टी अतिमहत्त्वाच्या असतात. आणि पेसनी नेमकी हीच गोष्ट हेरली.

सेबॅस्टियन लॉरोच्या साथीत पेस ९३ च्या यू एस ओपनच्या उपांत्य फेरीत पोचला. मग ९५ मध्ये केविन उल्येट बरोबर ऑस्ट्रेलियनची उपांत्यपूर्व फेरी गाठली. आणि मग ९६ साली भारतीय टेनिसच्या इतिहासातली सर्वांत शुभंकर गाठ मारली गेली! प्रत्येक स्पर्धेगणिक लिएंडर पेस - महेश भूपति जोडीचा खेळ बहरत होता. भूपतिचा "पॉवर गेम" आणि लिएंडरचा "रिफ्लेक्स गेम" एकमेकांना पूरक होते.



ली - हेश ही जोडी भारताचं नाव प्रत्येक मोठ्या स्पर्धेत रोशन करत होती. प्रत्येक सामन्यागणिक त्यांच्यातलं सामंजस्य वाढत होतं. ९७ मध्ये तर चारपैकी ३ ग्रँडस्लॅम्सच्या उपांत्य फेरीत ली - हेश पोचले. ९८ मध्ये तर त्यांनी कहर केला.... प्रत्येक ग्रँड्स्लॅमची अंतिम फेरी गाठली ! पैकी फ्रेंच आणि विंबल्डन जिंकले देखील ! इतिहासात पहिल्यांदाच मुख्य ग्रँड्स्लॅम्सच्या विजेत्यांमध्ये भारतीय नावं झळकत होती. अप्रतीम ताळमेळ आणि जबरदस्त "स्पिरिट"च्या जोरावर ली-हेश दुहेरीचं मैदान गाजवत होते. जगभरातल्या भारतीयांना फ्लशिंग मेडोज, रोलँ गॅरॉ आणि सेंटर कोर्टवर जायला एक कारण... का संधी - मिळाली ! वुडफर्ड - वुडब्रिज ह्या "वूडीज" बरोबर, बॉब-माइक ह्या ब्रायन बंधूंबरोबर त्यांच्या लढती रंगायला लागल्या. "इंडिया - इंडिया" चा जल्लोष.... भूपतिची जोरदार सर्व्हिस..... पेसचा वेगवान खेळ....... अप्रतीम को-ऑर्डिनेशन...... श्वास रोखून धरायला लावणार्‍या रॅलीज..... हल्ले-प्रतिहल्ले.... नवनवीन "फॉर्मेशन्स" ... मती गुंग करणारे डावपेच..... जीवाच्या आकांतानी प्रत्येक पॉइंटसाठी लढणं.... भूपतिच्या ताकदवान फटक्यानी पॉइंट "सेट-अप" करणं.... आलेल्या रिटर्नवर चित्त्यासारखी झेप घालून आपल्या "व्हॉली"नी पेसनं तो गुण मिळवणं.... "कंमॉssssssssssन" ची आरोळी आणि..............



....... आणि प्रत्येक भारतीय क्रीडा षौकीनाच्या मनात घर करून राहिलेली पेस-भूपतिची "चेस्ट-थंप" !!!!
क्रिकेटशिवाय कुठल्याच खेळात भारतीयांना इतका जल्लोष करण्याची संधी मिळाली नसेल जितकी टेनिस मध्ये! आणि ही संधी देणारा होता लिएंडर पेस. पेसनी दुहेरीत आत्तापर्यंत ज्या ५५ एटीपी डबल्स स्पर्धा जिंकल्या आहेत त्यातल्या २३ महेश भूपतिच्या जोडीने. त्याने ११ ग्रँड्स्लॅम्समध्ये पुरुष दुहेरीची अंतिम फेरी गाठली आणि त्यापैकी ६ वेळा विजेतेपद मिळवलं. मिश्र दुहेरीत मार्टिन नवरातिलोवा आणि कॅरा ब्लॅक च्या साथीत प्रत्येकी ४ आणि एकूण १० ग्रंडस्लॅम्समध्ये अंतिम फेरी गाठून ५ वेळा विजेतेपद मिळवलं !



 मार्टिनासारख्या दिग्गज खेळाडूबरोबर खेळताना जी एक गोष्ट घडली ती खेळाडू म्हणूनच नाही तर माणूस म्हणून पेसची महानता अधोरेखित करणारी आहे. २००३ मध्ये पेस - मार्टिना जोडीनी फ्रेंच आणि विंबल्डन स्पर्धा जिंकल्या. पण त्यानंतर ब्रेन-ट्यूमरच्या शत्रक्रियेसाठी पेसला अ‍ॅडमिट व्हावं लागलं. पुढे ते neurocysticercosis नावाचं इन्फेक्शन असल्याचं निष्पन्न झालं. पण त्यावर्षी लिएंडरला अमेरिकन ओपनला मुकावं लागलं. मार्टिनापुढे दुसर्‍या कोणा जोडीदाराबरोबर खेळण्याचा मार्ग खुला होताच. पण तिनी सांगितलं "वाट पाहिन पण पेसबरोबरच खेळीन" :) ! कारण पेस इतरांसारखा नुसता दुहेरीतला जोडीदार नव्हता, तर जिवाला जीव देणारा भरवशाचा सहकारी होता. मार्टिनानी अमेरिकन ओपन खेळायला नकार दिला आणि ती पुढल्या वर्षीच्या ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये पेसबरोबर खेळली आणि ह्या अजब जोडीनी उपविजेतेपद मिळवलं !



पेस आणि डेव्हिस कप हे तर एक अशक्य समीकरण. वर म्हटल्याप्रमाणे "पेस देशासाठी खेळतोय" हे एकच कारण त्याला त्याचा खेळ उंचावायला पुरेसं होतं. ३१ मार्च १९९० रोजी झीशान अली बरोबर जपान विरुद्ध पेस पहिल्यांदा डेव्हिस कपचा सामना खेळला. तेव्हापासून आजतागायत अनेक अशक्यप्राय विजय पेसनं मिळवले आहेत. डेव्हिस कपचा सामना म्हटला की वेगळाच पेस लोकांना दिसतो. प्रतिस्पर्ध्याचं एटीपी क्रमवारीतलं स्थान, त्याचं वय, मिळवलेली विजेतेपदं, त्याची आयुष्यभराची कमाई, उंची, लांबी, रुंदी वजन, मापं - सगळ्या सगळ्या गोष्टी गौण ठरतात ! कारण त्याचा सामना हा फक्त एका टेनिसपटूशी नसतो, तो असतो आयुष्यभर तिरंग्याचा अभिमान आपल्या उरावर अभिमानानं मिरवलेल्या एका झपाटलेल्या देशभक्ताशी ! अतिशयोक्ती वाटत असेल तर गोरान इव्हानिसेविक, हेन्री लेकाँते, अर्नॉड बॉश्च, टिम हेन्मन, ग्रेग रुजेडस्की, अँडी रॉडिक ह्या सबंध कारकीर्द "टॉप २०" मध्ये काढलेल्या लोकांना विचारा !

केवळ आपल्या देशबांधवांच्या आणि सहकार्‍यांच्या पाठिंब्याच्या जोरावर, आपल्या मर्यादित टेनिस कौशल्यानं देखील लिएंडर भल्या-भल्यांना माती चारतो. भल्या भल्यांच्या तोंडाला फेस आणतो डेव्हिस कप मध्ये खेळलेल्या ७० सिंगल्स लढतींपैकी ४८, आणि ५६ डबल्स लढतींपैकी तब्बल ४३ मध्ये विजय असं अचाट रेकॉर्ड लिएंडरचं आहे याचं कारणच त्याची देशासाठी झोकून देऊन खेळण्याची वृत्ती. आज तो ४४ वर्षांचा आहे पण केवळ त्याच दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर तो अजूनही भारताचा ध्वज त्याच्या समर्थ खांद्यांवर पेलतोय. मध्ये सहकार्‍यांबरोबर बेबनावाचे प्रकार घडले ते ह्या प्रेरणादायी कारकीर्दीला नजर लागू नये म्हणून :).

लिएंडर पेस नावाच्या ह्या एका खेळियाने भारताला टेनिसमध्ये नवी ओळख मिळवून दिली. विचारपूर्वक दुहेरी खेळून आपल्या शारीरिक मर्यादांमध्ये सुद्धा आपण आंतरराष्ट्रीय स्तरावर सतत यशस्वी ठरू शकतो हे सिद्ध करून दाखवलं. एटीपी टूर वर अनेक स्पर्धा जिंकून देखील ऑलिंपिक्स अथवा एशियन गेम्सच्या वेळी इतर भारतीय खेळाडूंना जोरजोरात टाळ्या वाजवून, घोषणा देऊन प्रोत्साहन देणारा पेस म्हणूनच भारतीय क्रीडाषौकिनाच्या मनात अढळ स्थान प्राप्त करून जातो ! भारताचं प्रतिनिधित्त्व करताना "मी देशासाठी खेळतो आहे" ही एकच भावना त्याला त्याच्या मर्यादा ओलांडून out of his skins खेळायला प्रेरित करते. नुसते तिरंगा हातात असतानांचे त्याचे हे फोटो पहा !


भारताचं प्रतिनिधित्त्व करण्याचा अभिमान, आपण देशाला एक विजय मिळवून दिला ह्याचा आनंद, आपल्यामुळे आपल्या देशवासीयांना आनंद झाला आहे ह्याचं समाधान त्याच्या चेहर्‍यावरून ओसंडत असतं. कुठलाही खेळ खेळण्यासाठी भले जगातलं सर्वोत्तम कौशल्य नसलं तरी बेहेत्तर पण आमच्या लिएंडरसारखी जिगर हवी ! असे ११ लिएंडर मिळाले ना तर आपण केवळ त्यांच्या देशभक्तीच्या आणि इच्छाशक्तीच्या जोरावर फुटबॉलचा वर्ल्डकप देखील जिंकून. मला तर वाटतं की भारतीय क्रीडा संघात १३वा खेळाडू म्हणून लिएंडरला प्रत्येक दौर्‍यावर घ्यावं. भारतासाठी खेळणं काय असतं हे बाकीच्यांना त्याच्याकडे बघून समजेल !


रविवार, २६ एप्रिल, २०२०

एका खेळियाने - जेस्सी जैसा कोई नहीं

कुठल्याही खेळामध्ये अगदी शाळा - कॉलेज - विद्यापीठाकडून, जिल्हा किंवा राज्याचं प्रतिनिधित्त्व करायला मिळणं ही खरोखरंच अभिमानास्पद गोष्ट असते. काही मोजक्याच भाग्यवंतांना त्यांच्या देशाचं प्रतिनिधित्त्व करण्याच सौभाग्य लाभतं. पण जर कोण्या एका खेळाडूनं कुठल्या स्पर्धेत उभ्या मानवतेचं प्रतिनिधित्त्व केलं असेल तर तुम्ही त्याला काय म्हणाल? जर त्याला सांगण्यात आलं की "बाबा रे, ह्या एका स्पर्धेत मानवाचं, मानवीय संस्कृतीचं प्रतिनिधित्त्व करायची जबाबदारी तुझी आहे - you are competing for the mankind. तुझ्यावर जबाबदारी आहे मानवतेच्या शत्रुंना ओरडून सांगण्याची की सगळे मानव एक आहेत. जाती, देश, वंश, वर्ण, लिंग ह्यावरून तुम्ही करत असलेला भेदभाव हे निव्वळ थोतांड आहे. कुठलाही वर्ण, वंश, जात ही दुसर्‍यापेक्षा श्रेष्ठ - कनिष्ठ असू शकत नाही. तुला अशी कामगिरी करून दाखवायची आहे की सर्वांचा मानवता ह्या एकाच धर्मावरचा विश्वास अजून दृढ झाला पाहिजे!" तर? काय म्हणाल अश्या माणसाला? प्रेषित?

आपण त्याला म्हणू - जेम्स क्लीव्हलँड ओवेन्स !


जेम्स क्लीव्हलँड ओवेन्स - अलाबामातल्या हेन्री आणि एमा ओवेन्स ह्या शेतमजूर दांपत्याच्या ११ मुलांपैकी जेम्स ७ वा आणि एका गुलामाचा नातू. जन्म १२ सप्टेंबर १९१३. अशक्त, सतत खोकणारं, किरटं पोर. ब्राँकायटिस आणि न्युमोनिया तर पाचवीला पुजलेले. घरी अठराविश्वे दारिद्र्य. वयाच्या सातव्या वर्षी जेम्स कपाशीच्या शेतात दिवसाला जवळपास १०० पौंड कपाशीची पाठीवरून ने-आण करत असे. आजचं मरण उद्यावर ढकलायला ओवेन्स कुटंबीय ओकविल होऊन उत्तरेला ओहायो राज्यात क्लीव्हलंडला आले तेव्हा जेम्स ९ वर्षांचा होता. क्लीव्हलंडमधल्या शिक्षिकेनी नाव विचारलं. जेम्स त्याच्या सदर्नर अ‍ॅक्सेंटमध्ये बरळला "जे.सी. ओवेन्स (जेम्स क्लीव्हलंड ओवेन्स)". त्या शिक्षिकेला काही ते नीट ऐकू आलं नाही. तिनी लिहून घेतलं जेसी (Jesse) ओवेन्स. आणि पुढे जन्मभर हेच नाव जेम्सला चिकटलं. जेम्स ओवेन्सचा झाला जेसी ओवेन्स !

घाणेरीच्या रोपट्यासारखा कोणीही पाणी न घालता जेसी वाढत होता. नशीब एकच की आता मजुरीबरोबर शाळाही चालू होती. जेसी विशेष हुशार विद्यार्थी नव्हता पण सर्वांत वेगवान नक्कीच होता. फेअरमाउंट ज्युनियर हायस्कूल मध्ये चार्ल्स रायली नावाच्या क्रीडाप्रशिक्षकानी जेसीमधले गुण हेरले आणि त्याला शाळेच्या track and field संघात जागा मिळाली. १९३३ मध्ये ईस्ट टेक्निकल हायस्कूलकडून खेळताना त्याने १०० आणि २२० यार्ड धावण्यात आणि लांब उडीत (तेव्हा त्याला बोर्ड जंप म्हणत) शालेय राष्ट्रीय विक्रम नोंदवले. आणि इथून जेसीची कारकीर्द बहरायला लागली. ओहायोच्या (buckeye state) मधून आलेला जेसी buckeye bullet म्हणून ओळखला जाऊ लागला. शाळेची फी भरायला आणि पोटाची सोय करायला लायब्ररीत काम करणे, गॅसस्टेशनवर काम करणे, कपडे धुवून देणे, कोणाची फुटकळ कामे करणे चालू होतंच. पण खरी धमाल तर पुढे होती. १९३५ मध्ये उत्तर अमेरिकेतल्या "बिग टेन" राज्यांच्या मिशिगनमधल्या स्पर्धेत अवघ्या ४५ मिनिटांत जेसीनी ३ नवीन विश्वविक्रम प्रस्थापित केले होते तर एका विश्वविक्रमाशी बरोबरी केली! अ‍ॅथलेटिक्सच्याच नव्हे तर इतर कोणत्याही खेळाच्या इतिहासात कोण्या एका खेळियाने असा पराक्रम केलेला नव्हता आणि आजतागायत कोणी असा पराक्रम करू शकलेलं नाही. शब्दशः न भूतो न भविष्यति !

पण ह्याही पेक्षा मोठा आणि महत्त्वाचा पराक्रम अजून जेसीची वाट बघत होता. १९३६ चं बर्लिन ऑलिंपिक्स हे म्हणजे नाझी विरुद्ध इतर असं अघोषित युद्धच होतं. आर्यन वंशाच्या श्रेष्ठत्त्वाच्या आणि फॅसिस्ट विचारांनी हिटलर पिसाटला होता. नाझी जर्मनीचं वर्चस्व सिद्ध करण्यासाठी जमीन-आस्मान एक करण्याची त्याची तयारी होती. "काळ्या बांड्गुळांना" संघात स्थान दिल्याबद्दल जर्मनीत अमेरिकेची टर उडवली जात होती. एका जर्मन अधिकार्‍यानं ओवेन्स आणि इतर निग्रो अ‍ॅथलिट्स सारख्या non-humans ना खेळायची परवानगी दिल्याबद्दल तक्रार केली होती. जागोजागी काळ्या स्वस्तिकाचं चिन्ह असलेले लालभडक झेंडे फडकत होते. खाकी गणवेषातले Storm Troopers (जर्मन सैनिक) ठायी ठायी नाझी सॅल्युट करताना दिसत होते. नाझी राष्ट्रगीत "Deutschland Uber Alles" चे सूर उरात धडकी भरवत होते. नाझी सुप्रीमसी सिद्ध करायला हिटलर पेटून उठला होता. ऑलिंपिक्स हे "खेळ" न राहता धर्मांध शक्ती आणि मानवता ह्यांच्यातलं द्वंद्व बनले होते. पण जर्मन सरकार जरी नाझीझमचा डंका पिटत असलं तरी ३ ऑगस्ट १९३६ रोजी बर्लिनच्या ऑलिंपिक स्टेडियममध्ये जमलेले १ लाख दहा हजार प्रेक्षक आपला देश, धर्म, वंश, वर्ण.. सगळं विसरून त्यांच्या लाडक्या खेळाडूला पाठिंबा देत होते "येस्सी... येस्सी....येस्सी....येस्सी!"

३ ऑगस्टला जेसीनी १०० मीटर्सची शर्यत १०.३ सेकंदांत जिंकली. दुसरा आला तो त्याचा (कृष्णवर्णीय) देशबांधव राल्फ मेटकाल्फ. नाझी वर्चस्वाच्या हिटलरच्या दंभावर पहिला आघात झाला !

४ ऑगस्टला लांब उडीच्या स्पर्धेत जेसीचे पहिले २ प्रयत्न "फाऊल" ठरले होते. अजून एक फाऊल आणि जेसी स्पर्धेबाहेर जाणार होता. जेसी स्वतः त्या वेळेबद्दल सांगतो "I fought, I fought harder . . . but one cell at a time, panic crept into my body, taking me over." शेवटच्या प्रयत्नाच्या वेळी एका निळ्या डोळ्यांच्या, सोनेरी केसांच्या तरूण जर्मन अ‍ॅथलीटने जंपिंग लाईन पासून जेसीला हात केला. आणि खूण म्हणून आपला टॉवेल ट्रॅकच्या कडेला लाईनच्या थोडा मागे ठेवला. तो अ‍ॅथलीट होता जर्मनीचा लांब उडीचा पदकाचा प्रबळ दावेदार लुझ लाँग!

 कल्पना करा लाँगनं "काळ्या" ओवेन्सला हरवून सुवर्णपदक जिंकावं अशी खुद्द फ्युररची इच्छा होती. पण लाँग शेवटी हाडाचा खेळाडू होता! आपल्या सर्वांत मोठ्या प्रतिस्पर्ध्याला धीराचे चार शब्द ऐकवायला, त्याला मदत करायला, त्याला सल्ला द्यायला - आणि ते ही साक्षात फ्युरर समोर बसलेला असताना - हजारो लोकांसमोर पुढे यायला तो कचरला नाही. हिटलरचा वांशिक वर्चस्वाच्या कल्पनांचे बुरूज एका खेळाडूनं उध्वस्त केले. धर्म, जात, पंथ, वंश, वर्ण, देश, सगळ्या सगळ्या सीमा मिटून गेल्या. लाँग आणि ओवेन्स आणि इतर हजारो - लाखोंचा धर्म citius altius fortius, वांशिक श्रेष्ठत्त्वाच्या फुटकळ कल्पनांच्या चिधड्या उडवत होता.


लाँगच्या सल्ल्याप्रमाणे ओवेन्सनी पुढची उडी चांगली ४ इंच मागून घेतली आणि अंतिम फेरीसाठी पात्र ठरला. अंतिम फेरीतल्या पाचव्या प्रयत्नानंतर जेसी आणि लाँग संयुक्तपणे पहिल्या स्थानावर होते. पण नंतरच्या दोन प्रयत्नांत आपली कामगिरी उंचावत जेसीनी सुवर्णपदक पटकावलं तेव्हा त्याचं अभिनंदन करायला प्रथम धावला तो रौप्यपदकविजेता लाँग ! लाँगबद्दल जेसी म्हणतो "You can melt down all the medals and cups I have and they wouldn't be a plating on the 24-karat friendship I felt for Luz Long at that moment. Hitler must have gone crazy watching us embrace". लाँग दुसर्‍या महायुद्धात मरण पावला पण ओवेन्स त्याच्या कुटुंबीयांच्या कायम संपर्कात राहिला.

५ ऑगस्टला - दुसर्‍या दिवशी जेसीनी २०० मीटर्स शर्यत २०.७ सेकंदांचा नवीन ऑलिंपिक विक्रम प्रस्थापित करून जिंकली. नंतर मार्टी ग्लिकमन आणि सॅम स्टोलर ह्या ज्यू खेळाडूंना अचानक "काढून टाकल्यामुळे" ओवेन आणि मेटकाल्फला ४ बाय १०० मीटर्स रिले शर्यतीत भाग घेण्याची संधी मिळाली आणि जेसीनी आपलं चौथं सुवर्णपदक जिंकलं. जेसी परत आला आणि त्याच्या स्वागत एका बोर्डनी झालं ज्यावर लिहीलं होत Owens 4 - Hitler 0.

ओवेन्सच्या कामगिरीची चित्रफीत

पुढे दुसर्‍या महायुद्धामुळे ३६ ची स्पर्धा जेसीची पहिली आणि शेवटची ऑलिंपिक स्पर्धा ठरली. इतकंच नाही तर त्याची कारकीर्द महायुद्धामुळे संपुष्टात आली. दुर्विलास पहा, जेसी परत आला तेव्हा अमेरिकेत त्याचं कौतुक झालं, लोकं त्याच्याशी हात मिळवायचे, त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप मारायचे, त्याला मिठी मारायचे. पण कोणी त्याला नोकरी देऊ केली नाही. "When I came back to my native country, after all the stories about Hitler, I couldn't ride in the front of the bus, I had to go to the back door. I couldn't live where I wanted. I wasn't invited to shake hands with Hitler, but I wasn't invited to the White House to shake hands with the President, either." ४ ऑलिंपिक सुवर्णपदकांचा मानकरी आपलं आणि आपल्या कुटुंबाचं पोट भरण्यासाठी घोड्यांशी, कुत्र्यांशी शर्यती लावायचा. नंतर जेसीनी दिवाळखोरीचा अर्ज केला. तो मंजूर झाला आणि जेसी अमेरिकन सरकार साठी सदिच्छा दूत (goodwill ambassador) झाला. आपल्या प्रेरक भाषणांतून कष्ट, प्रामाणिकपणा, जिद्द आणि चिकाटीचं महत्त्व सांगत राहिला ते १९८० साली त्याचं निधन होईपर्यन्त.

लहानपणी वीणा गवाणकरांचं "एक होता कार्व्हर" शेकडो वेळा अधाशासारखं वाचलं होतं. जेसी आणि जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांच्यातलं साम्य म्हणजे दोघेही कधीच कोणाविरुद्ध "लढले" नाहीत. दोघांच्याही वागण्यात, इतका अन्याय सहन करूनही, यत्किंचितही कटुता नव्हती. कोणाहीबद्दल आकस नव्हता, चीड नव्हती. म्हणूनच जेसी सच्चा "खेळाडू" होता. जेसी गेला तेव्हा राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर त्याच्याबद्दल म्हणाले "Perhaps no athlete better symbolized the human struggle against tyranny, poverty and racial bigotry". पण जेसी स्वतः म्हणायचा "मी बर्लिनला कोणाला हरवायला गेलो नव्हतो. माझी कोणाशीही स्पर्धा नव्हती. ऑलिंपिक्समध्ये तुम्ही कोणाला पराभूत करायला जात नाही, तुम्ही जाता तुमची सर्वोत्तम कामगिरी करायला. मला जर कोणाचा पराभव करायचा असेलच तर तो स्वतःचा."

असा होता जेसी. सगळी बंधनं लंघून केवळ एक अ‍ॅथलीट म्हणून, एक खेळाडू म्हणून काळाच्या दगडावर आपलं नाव कायमचं कोरून जाणारा. कुठल्या देशाचा न राहता पूर्ण मानवतेचं प्रतिनिधित्त्व करणारा. पदकं, विक्रम ह्यांच्या खूप खूप पलिकडे जाऊन आपल्या मैदानावरच्या कामगिरीने आणि मैदानाबाहेरच्या वागण्याने आदर्श ठेवणारा. म्हणूनच आजही 'सर्वोत्कृष्ट ऑलिंपियन कोण?' असा प्रश्न जेव्हा विचारला जातो तेव्हा सर्वांचं एकच उत्तर असतं "जेम्स क्लीव्हलंड ओवेन्स"

© - आशुतोष थत्ते

२६ एप्रिल २०२०

शुक्रवार, २४ एप्रिल, २०२०

पांढर्‍यावर काळे

Sport builds character म्हणतात ते उगाच नाही. लहानपणापासून कोणी कुठलाही खेळ (विशेषतः सांघिक) नियमित खेळत असेल तर त्याच्या व्यक्तिमत्त्वाला अनेक पैलू पडत जातात. कारण खेळ शिकणं म्हणजे फक्त त्या खेळात सरस ठरण्यासाठी लागणारी कौशल्य, तंत्र आत्मसात करणं नाही तर अजूनही खूप काही असतं. म्हणूनच खेळ हा केवळ शारीरिकदृष्ट्या सक्षमच नाही तर एक "सुसंस्कृत" नागरिक घडवतो.

विश्वनाथन आनंद टोपालोवला हरवलं म्हणून त्याच्या बुद्धीचे वाभाडे काढत नाही..... मायकेल हसी त्याच्या ओपनर्सना "फेकल्यात ना विकेट.. आता बसा बोंबलत.. मी नाही खेळणार" असं म्हणत नाही... "तिज्यायला हा फेडरर लई उडून र्‍हायलाय...तंगडं मोडायला पायजे *%$चं" असा विचार नदाल करत नाही.... किंवा "तुमच्या डबक्याचं पाणी फारच गार आहे ब्वॉ... नीट पोहता येत नाही इथे" असं फेल्प्स म्हणाल्याचंही ऐकिवात नाही. खरा खेळाडू citius - altius - fortius, faster - higher - stronger ह्या एकाच ध्यासानी आपल्या खेळाडू धर्माचं पालन करत असतो.

Winning isn't everything; it's the only thing असं मानणार्‍या जीवतोड स्पर्धेच्या जगात सुद्धा आपल्या प्रतिस्पर्ध्याच्या खेळाचं कौतुक केलं जातं, मुष्टियुद्धाच्या रानटी लढतीनंतरही एकमेकांना अलिंगन दिलं जातं आणि धक्कबुक्कीत खाली पडलेल्या प्रतिस्पर्ध्याला उठून उभं राहाण्यासाठी मदतीचा हात पुढे केला जातो. एकंदरच खेळ आणि खेळाडू ही आपल्या आयुष्यातली एक खूप पॉझिटिव्ह, खूप सकारात्मक, आनंद, उत्साह, उमेद देणारी गोष्ट आहे. खेळातलं कौशल्य आपल्या आयुष्यातल्या इतरही गोष्टींत दिसून येतं,

खेळानी दिलेला आत्मविश्वास आपल्या प्रत्येक कामात दिसतो. कधी विचार केलात? ऑलिंपिक्सच्या उद्घाटनाच्या वेळी वेगवेगळ्या देशांच्या खेळाडूंच्या देहबोलीत किती फरक असतो! काही अगदी छोटे, पदक मिळायची जरादेखील आशा नसलेले 'सिएरा लिओन', होंडुरास वगैरे देशांचे खेळाडू "आपण इथपर्यंत पोहोचलोय" हा आनंद लपवू शकत नाहीत तर अमेरिका, चीन, जर्मनी, ऑस्ट्रेलियासारख्या देशांचे खेळाडू "आम्ही आलो आहोत ते जिंकण्यासाठीच" अश्या आत्मविश्वासात चालत असतात ! पण खेळ हीच एक अशी चीज आहे जी ह्या सगळ्यांना एका ध्येयासाठी, एका भावनेसाठी एकत्र आणते citius - altius - fortius ! आज युनायटेड नेशन्सचे 193 सदस्य देश आहेत... इंटरनॅशनल ऑलिंपिक कमिटीचे 206....तर "फिफा"चे 211 ! भौगोलिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय.... कुठलीच बंधनं नसणार्‍या खेळांचं महत्त्व म्हणूनच अनन्यसाधारण आहे.


वेगवेगळ्या खेळांनी आपल्याला मानवाच्या शारिरिक क्षमतेला आणि कौशल्यालाच नाही तर खिलाडू वृत्तीला आणि सचोटीला नवीन परिमाण देणारे खेळाडू दिले. अगदी ४ मिनिटांच्या आत एक मैल धावण्याचा पराक्रम पहिल्यांदा करणार्‍या रॉजर बॅनिस्टरपासून ते चेल्सीसाठी जिवाचं रान करणार्‍या दिदिएर ड्रॉग्बापर्यंत.... कर्करोगाशी यशस्वी झुंज देऊन टूर दि फ्रान्स जिंकणार्‍या लान्स आर्मस्ट्राँगपासून ते "ड्रॅगफ्लिकचा बादशहा" सोहेल अब्बासपर्यंत.... मार्गरेट कोर्टपासून ते आमची बॅडमिंटनची राजकन्या साईना नेहवालपर्यंत ! ह्या सर्वच खेळाडूंनी आपल्या खेळानं आमच्यावर अशी काही मोहिनी घातली की "दुनिया देखती रह गयी". आपल्या कौशल्याने, आपल्या खेळाने आलम दुनियेला मंत्रमुग्ध करणारे हे खेळियेच. अश्याच काही महान खेळाडू आणि त्यांनी आपल्या पराक्रमाने गाजवलेल्या लढती ह्यांचा आनंद घेण्यासाठी हे पांढर्‍यावर काळे!

© - आशुतोष थत्ते

२४ एप्रिल २०२०

श्रीगणेशा

१०
२०
३०
४०
५०
६०
७०
८०
९०
१००
रेडिक्का??????????

भिंतीकडे, झाडाच्या बुंध्याकडे तोंड करून, दोन्ही हातांचे तळवे चेहर्‍यावर ठेऊन आपण सगळ्यांनीच ही गिनती केलेली आहे! "आंड्या इष्टॉप"... "गड्या गड्या माझं राज्य वाचव".... "रडीचा डाव खडी" असली वाक्यं लहानपणी न म्हणालेला कोणी सापडेल का? खेळ ह्या प्रकाराशी बहुतेकांची ओळख लपंडाव, रुमाल-पाणी, लंडन-लंडन, आप्पारप्पी, लगोरी असल्याच प्रकारांनी होते. आणि मग "अर्धं लिंबू अस्से" - "भिंतीवर डायरेक्ट बॉल लागला तर आउट" - "त्या उंबर्‍याच्या पलिकडे गेला की टू डी" वगैरे नियम घालून खेळणं सुरू होतं.

जसजसे आपण मोठे होत जातो तसतसं खेळांतली क्लिष्टता वाढत जाते... नियम वाढतात, विविध साधनं उपयोगात आणली जातात. आपल्या लंगडी, खो-खो, कबड्डी सारख्या "फ्री-हँड" खेळांपासून, क्रिकेटसारख्या क्लिष्ट, बरीच साधनं लागणार्‍या खेळापर्यंत आपण सगळेच खूप खेळ खेळतो. खेळ खेळायची पद्धत, त्याचे नियम वेगवेगळे असतात पण एक नियम अगदी लपंडावापासून ते स्नूकरपर्यंत invariably लागू असतो तो म्हणजे - "चिडीची बात नस्से"! जे काही खेळताय ते तुम्ही चांगल्या मनाने, नैतिकता जपून, आपल्या सहकार्‍यांबद्दलच नव्हे तर स्पर्धकांबद्दलही आदर बाळगून, प्रामाणिकपणे खेळायचं ! विजयाइतकाच पराभवदेखील खुलेपणाने स्वीकारायचा. आणि पुढच्या वेळी विजय मिळवण्यासाठी पुन्हा कष्ट करायचे, प्रयत्न करायचे ! आणि ह्या सगळ्या गुणांच्या समुच्चयाला आम्ही म्हणतो "खिलाडू वृत्ती" "sportsman spirit".

अहो खेळ ह्या गोष्टीची व्याख्याच मुळी केली जाते ती - An organised, competitive and skilful physical activity requiring commitment and fair play अशी. बघा... शिस्तही आली, स्पर्धाही आली, कौशल्यही आलं, झोकून देणंही आलं आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे प्रामाणिकपणा आला. मग मला सांगा, "खेळाडू" ह्या संज्ञेस पात्र ठरलेला कोणीही एक आदर्श व्यक्ती, नागरिक असला तर आश्चर्य ते काय?

आणि म्हणूनच खेळांचा आनंद आणि खेळाडूंंच्या कामगिरीचा रसास्वाद घेण्यासाठी आज साक्षात सचिन तेंडुलकरच्या जन्मदिनी - २४ एप्रिल २०२० रोजी ह्या नव्या ब्लॉगचा श्रीगणेशा - एका खेळियाने.

© - आशुतोष थत्ते

२४ एप्रिल २०२०